(Source: ECI/ABP News/ABP Majha)
जनतेची दिशाभूल करू नका, अॅलोपॅथीवरील वक्तव्यावर उच्च न्यायालयाने बाबा रामदेव यांना झापलं
Delhi High Court On Baba Ramdev: कोरोना काळात केलेल्या अॅलोपॅथीवरील योगगुरू बाबा रामदेव यांच्या वक्तव्यावरून दिल्ली उच्च न्यायालयाने त्यांना खडेबोल सुनावले आहेत.
Delhi High Court On Baba Ramdev: कोरोना काळात केलेल्या अॅलोपॅथीवरील योगगुरू बाबा रामदेव यांच्या वक्तव्यावरून दिल्ली उच्च न्यायालयाने त्यांना खडेबोल सुनावले आहेत. दिल्ली उच्च न्यायालयाने बाबा रामेदव यांना जनतेची दिशाभूल करू नका, असं म्हटलं आहे. ''तुमचे अनुयायी, शिष्य आणि तुमच्यावर विश्वास ठेवणार्या अशा लोकांचे स्वागत आहे, मात्र अधिकृत काहीही बोलून कोणाचीही दिशाभूल करू नये, असे उच्च न्यायालयाने म्हटले आहे. बाबा रामदेव यांच्यावर कोविड-19 च्या उपचाराबाबत चुकीची माहिती पसरवल्याचा आरोप आहे.
बाबा रामदेव यांनी कोरोना काळात डॉक्टरांच्या उपचार पद्धतीवर टीका केली होती. 2021 मध्ये त्यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. ज्यात त्यांनी कोरोना विषाणूच्या संसर्गावर उपचार करण्यासाठी वापरल्या जाणार्या काही औषधांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. तसेच ते या व्हिडीओत बोलताना दिसत आहेत की, 'कोविड-19 साठी अॅलोपॅथिक औषधे घेतल्यानंतर लाखो लोक मरण पावले आहेत.' या टीकेला डॉक्टरांच्या संघटनांनी तीव्र विरोध केला होता. त्याचवेळी दिल्ली मेडिकल असोसिएशनने दिल्ली उच्च न्यायालयात याविरोधात याचिका दाखल केली होती.
दिल्ली मेडिकल असोसिएशनच्या याचिकेवर सुनावणी करताना न्यायमूर्ती भंबानी म्हणाले की, "माझी चिंता आयुर्वेदाचे नाव आणि प्रतिष्ठा वाचवण्याची आहे. अॅलोपॅथीच्या विरोधात कोणाचीही दिशाभूल होऊ नये, हा माझा उद्देश आहे. '' न्यायमूर्ती पुढे म्हणाले की, ''मी लस घेणार नाही असे म्हणणे वेगळी गोष्ट आहे. लसीला विसरा ही निरुपयोगी आहे, पण ती घ्या, असं म्हणणं ही एक वेगळी गोष्ट आहे.''
बाबा रामदेव यांनी माफी मागावी, आयएमएने केली होती मागणी
इंडियन मेडिकल असोसिएशनने (IMA) बाबा रामदेव यांच्या अॅलोपॅथी आणि अॅलोपॅथिक डॉक्टरांविरुद्ध केलेल्या कथित वक्तव्याबद्दल त्यांना अब्रुनुकसानीची नोटीस बजावली होती, 15 दिवसांच्या आत त्यांनी माफी मागावी अशी मागणी केली होती. असं न केल्यास 1,000 कोटी रुपयांची भरपाई करण्याची मागणी त्यांनी केली होती. दिल्ली उच्च न्यायालयाने गेल्या वर्षी बाबा रामदेव यांना ही नोटीस पाठवली होती.
महत्त्वाच्या बातम्या: