(Source: ECI/ABP News/ABP Majha)
मोठी बातमी! सिंचन घोटाळ्यासंबंधी अजित पवार यांना दिलेली क्लीन चिट दोन वर्षांपासून हायकोर्टात प्रलंबित
Ajit Pawar : उपमुख्यंत्री अजित पवार यांना एसीबीने दिलेली क्लीन चिट अद्याप मुंबई उच्च न्यायालयाने स्वीकारला नसल्याचं समोर आलं आहे.
मुंबई: एकीकडे मोहित कंबोज यांनी केलेल्या ट्वीटवरुन राजकिय वातावरण तापले असतानाच दुसरीकडे तत्कालीन जलसंपदा मंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या बाबतची आणखी एक मोठी माहिती समोर आलेली आहे. अजित पवार यांना सिंचन घोटाळ्याच्या प्रकरणातून एसीबीकडून देण्यात आलेल्या क्लीन चिटचा रिपोर्ट अजूनही उच्च न्यायालयाने स्वीकारला नाही. मुंबई उच्च न्यायालयाने अजूनही हा रिपोर्ट प्रलंबित ठेवला असल्याची माहिती एबीपी माझाच्या हाती लागलेली आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार हा रिपोर्ट अजूनही कोर्टाने स्वीकारला नाही आणि फेटाळला देखील नाही. कोर्टानं मागील दोन वर्षांपासून हा रिपोर्ट प्रलंबित ठेवला आहे. अजित पवारांना 2019 साली सिंचन घोटाळ्यातून क्लीन चिट देण्यात आली होती. परमबीर सिंह यांनी ही क्लीन चिट दिली होती. पण तो अहवाल अद्याप मुंबई उच्च न्यायालयाने स्वीकारला नसल्याचं समोर आलं आहे. दोन वर्षांच्या काळात कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने हा अहवाल स्वीकारला नसल्याचं समोर आलं आहे.
अजित पवारांना 2019 साली सिंचन घोटाळ्यातून क्लीन चिट देण्यात आली होती. परमबीर सिंह यांनी ही क्लीन चिट दिली होती. पण तो अहवाल अद्याप मुंबई उच्च न्यायालयाने स्वीकारला नसल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे अजित पवार यांना पूर्णपणे या प्रकरणातून क्लीन चिट मिळाली नसून त्यांच्यावर अद्याप टांगती तलवार कायम असल्याचं स्पष्ट झालंय.
भाजपचे नेते मोहित कंबोज यांनी कालच एक ट्वीट करुन सिंचन घोटाळ्याचा पुन्हा एकदा तपास व्हावा अशी मागणी केली होती. तसेच राष्ट्रवादीचा एक नेता लवकरच तुरुंगात जाणार असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. त्यानंतर आज ही मोठी बातमी समोर आली आहे.
अजित पवार यांना या प्रकरणात अडकवण्यासाठी हे देवेंद्र फडणवीस यांनी आखलेलं षडयंत्र असल्याचं राष्ट्रवादीच्या नेत्या विद्या चव्हाण यांनी म्हटलंय. भाजपचे नेते प्रवीण दरेकर यांनी सिंचन घोटाळ्याची पुन्हा एकदा चौकशी करावी अशी मागणी केली आहे. या प्रकरणी फक्त एसीबीने क्लीन चीट दिली आहे, पण न्यायालयाने तो अहवाल अद्याप स्वीकारला नाही असंही ते म्हणाले.
आजपासून राज्याचे पावसाळी अधिवेशन सुरू झालं असताना आता या प्रकरणाची माहिती समोर आली आहे. त्यामुळे सिंचन घोटाळ्यावरुन पुन्हा एकदा राज्यातील राजकारण तापण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.