Belgaum News: महाराष्ट्राचे तीन मंत्री आणि खासदारांना जिल्हाबंदी; बेळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांकडून आदेश जारी
Belgaum News: महाराष्ट्राचे तीन मंत्री आणि खासदारांवर बेळगाव जिल्ह्याबंदी घालण्यात आली आहे. 31 ऑक्टोबर रोजी सकाळी सहा वाजल्यापासून ते 2 नोव्हेंबर सायंकाळपर्यंत ही जिल्हाबंदी असणार आहे.
Maharashtra Belgaum News: महाराष्ट्राचे मंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai), चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil), दीपक केसरकर (Deepak Kesarkar) आणि खासदार धैर्यशील माने (Dhairyasheel Mane) यांना बेळगाव शहर (Belgaum) आणि जिल्ह्यात प्रवेश करण्यास बंदी घातल्याचा आदेश बेळगावचे जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी बजावला आहे.
महाराष्ट्र एकीकरण समितीच्या (Maharashtra Ekikaran Samiti) एक नोव्हेंबर रोजी होणाऱ्या काळा दिन कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी तीन मंत्री आणि खासदार येण्याची शक्यता असल्यानं जिल्हाधिकाऱ्यांनी हा आदेश बजावला आहे. 31 ऑक्टोबर रोजी सकाळी सहा वाजल्यापासून ते 2 नोव्हेंबर सायंकाळपर्यंत हा प्रवेश बंदीचा आदेश जारी करण्यात आला आहे.
एक नोव्हेंबर रोजी महाराष्ट्र एकीकरण समिती काळा दिन पाळून रॅली काढून नंतर मराठा मंदिर येथे सभा आयोजित करणार आहे. काळा दिन कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी मंत्री शंभूराज देसाई, मंत्री चंद्रकांत पाटील, मंत्री दीपक केसरकर आणि खासदार धैर्यशील माने येणार असल्याची शक्यता आहे. त्यांच्या भाषणामुळे कन्नड आणि मराठी भाषिकात तेढ निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या मंत्र्यांना आणि खासदारांना कन्नड संघटनेचे कार्यकर्ते घेराव घालण्याची शक्यता आहे. त्यामुळे भाषिक तेढ निर्माण होऊन कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवण्याची शक्यता आहे. त्या बरोबर सार्वजनिक संपत्तीचं नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मंत्री शंभूराज देसाई, चंद्रकांत पाटील, दीपक केसरकर आणि खासदार धैर्यशील माने यांना बेळगाव शहरात आणि जिल्ह्यात प्रवेश करण्यास बंदी घातली असल्याचं जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी आदेशात नमूद केलं आहे.
यापूर्वीही घातलेली महाराष्ट्रातील नेत्यांवर जिल्हाबंदी
काही दिवसांपूर्वीही बेळगावचे जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी महाराष्ट्रातील नेत्यांसाठी जिल्हाबंदीचा आदेश जाही केला होता. सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यामधील 40 गावांवर कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी दावा केल्यानंतर सीमावाद पेटलेला. एकीकडे कर्नाटक शासनाकडून सीमाभागातील बेळगावसह परिसरातील नागरिकांवर अन्याय अत्याचार केले जात होते. तर दुसरीकडे मात्र जत तालुक्यातील गाावांसह अक्कलकोट, पंढरपूर गावांवही कर्नाटक सरकारकडून दावा करण्यात आलेला. त्यामुळे हा वाद आता प्रचंड वाढला आहे. कर्नाटक-महाराष्ट्राचा सीमावाद मिटवण्यात यावा, यासाठी महाराष्ट्र सरकाकडून त्यासाठी दोन मंत्र्यांचीही निवड करण्यात आली. कारण सीमावाद तात्काळ सोडवून त्यावर तोडगा काढण्यासाठी मंत्री चंद्रकांत पाटील आणि शंभूराजे देसाई यांची निवड करण्यात आली होती. महाराष्ट्रातील मंत्री बेळगावला जाण्याच्या तयारीत असतानाच महाराष्ट्रातील मंत्र्यांना बेळगाव जिल्हा प्रवेश बंदी करण्यात आली आल्याचे आदेश बेळगावचे जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी काढलेले.