राज्यातील साखर कारखानदारीच्या मुद्द्यावर आज देवेंद्र फडणवीस अमित शाहांना भेटणार
महाराष्ट्राचे विधानसभा विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात साखर कारखानदारीचा अनुभव असलेले काही भाजप नेते केंद्रीय गृहमंत्री आणि सहकारमंत्री अमित शाहांची भेट घेणार आहेत.
नवी दिल्ली : सहकाराच्या मुद्द्यावर राजधानी दिल्लीत एक महत्वाची बैठक होणार आहे. महाराष्ट्राचे विधानसभा विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात साखर कारखानदारीचा अनुभव असलेले काही भाजप नेते केंद्रीय गृहमंत्री आणि सहकारमंत्री अमित शाहांची भेट घेणार आहेत. देशाचे नवे सहकार मंत्री म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर या क्षेत्रासाठी केंद्र सरकारचे नेमके धोरण काय याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. या पार्श्वभूमीवरती ही महत्त्वाची बैठक आज होत आहे. देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत आज राधाकृष्ण विखे पाटील, हर्षवर्धन पाटील हे नेते असणार आहेत.
दिल्लीतील नॉर्थ ब्लॉक या ठिकाणी केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी बोलावलेल्या या बैठकीसाठी सहकार क्षेत्राशी संबंधित सर्व उच्चस्तरीय अधिकाऱ्यांना देखील हजर राहण्यास सांगितले गेले आहे. राज्यातल्या सहकारी साखर कारखान्यांना जवळपास दहा हजार कोटी रुपयांच्या वसुलीची नोटीस इन्कम टॅक्स खात्याने नुकतीच पाठवली आहे. त्याबाबत कारखान्यांना दिलासा मिळावा अशी सुद्धा मागणी या शिष्टमंडळाकडून केली जाणार असल्याचं कळत आहे. याशिवाय कारखान्यांची दीर्घ मुदतीची कर्जे पुनर्गठित करण्यात यावीत, निर्यात सबसिडी वाढवून मिळावी या संदर्भातल्या देखील मागण्या या शिष्टमंडळाकडून सहकार क्षेत्रासाठी केल्या जाणार आहेत.
राज्यातील सहकारी साखर कारखाने आधीच अडचणीत आहेत. त्यातच 60 हून अधिक सहकारी साखर कारखान्यांना आयकर खात्यानं दहा हजार कोटी रुपये आयकर भरण्यासाठी नोटीस पाठवली आहे. या सहकारी साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांना दिलेल्या निर्धारित दरापेक्षा ऊस खरेदीसाठी दिलेली अधिकची रक्कम कारखान्याचा नफा आहे असं कर सूत्र लावून हा कर आकारण्यात आलाय. दुसरीकडे खासगी कारखान्यांना मात्र हे सूत्र न लावता त्याचा समावेश ऊस खरेदी खर्च सदरात केलाय. शेतकऱ्यांना लाभ मिळावा म्हणून सहकारी तत्त्वावरील केलेल्या चांगल्या प्रयत्नांना आयकर खात्याच्या या निर्णयामुळे फटका बसला आहे. हा मुद्दा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांच्यापर्यंत नेला आहे.
आज होणाऱ्या बैठकीत केंद्रीय मंत्री अमित शाह राज्यातील साखर उद्योगाला अडचणीतून बाहेर काढण्यासाठी काय निर्णय घेतील याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Maharashtra Income Tax Raids : कारखान्यांवर झालेल्या धाडसत्रांबाबत शरद पवार यांची पहिली प्रतिक्रिया..
- राज्यातील 40 बंद साखर कारखाने सुरु होणार, उसाचे क्षेत्र जास्त झाल्यामुळे राज्य शासनाचा निर्णय
- Maharashtra Incom Tax Raid : 'सरकारी पाहुण्यांचा' मुक्काम वाढला; अजित पवारांच्या निकटवर्तीयांच्या कंपन्यांची सलग चौथ्या दिवशी 'आयकर'कडून चौकशी