(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Delhi News: पियुष गोयल आणि स्मृती इराणींच्या ओएसडींची अचानक हकालपट्टी, कारण गुलदस्त्यात
केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयुष गोयल आणि केंद्रीय महिला बाल विकास मंत्री स्मृती इराणी यांच्या ओएसडींना मुदतीआधीच हटवण्यात आले आहे.
नवी दिल्ली: केंद्रीय उद्योग व वाणिज्यमंत्री पीयुष गोयल तसेच, केंद्रीय महिला व बालकल्याण मंत्री स्मृती इराणी यांच्या विशेष कार्यकारी अधिकाऱ्यांना (ओएसडी) अचानक डच्चू देण्यात आला आहे. पीयुष गोयल, स्मृती इराणी या दोन मंत्र्यांच्या ओएसडींना अचानक हटवण्यात आलंय. ज्या अपॉईंटमेंट कमिटीत मोदी आणि शाह हे दोघे सदस्य आहेत. त्याच कमिटीनं हा निर्णय घेतल्यानं यात नेमकं कुठलं धक्कातंत्र आहे याची चर्चा सध्या राजधानी दिल्लीत रंगली आहे.
केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयुष गोयल आणि केंद्रीय महिला बाल विकास मंत्री स्मृती इराणी यांच्या ओएसडींना मुदतीआधीच हटवण्यात आले आहे. मोदी आणि शाह..त्यांच्या धक्कातंत्राबद्दल, बेधडक निर्णयांबद्दल ओळखले जातात. त्याच शैलीतलं हे आणखी एक उदाहरण.. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या नियुक्त समितीने सोमवारी दोन वेगवेगळ्या आदेशाद्वारे ओएसडी म्हणून नेमलेल्या दोन्ही खासगी व्यक्तींचा कार्यकाळ संपुष्टात आणला आहे. या कारवाई मागील नेमके कारण स्पष्ट झाले नसले तरी आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
गोयल, स्मृती यांच्या ओएसडींना तडकाफडकी का हटवलं?
- पीयुष गोयल यांचे ओएसडी अनुज गुप्ता, स्मृती इराणी यांच्या ओएसडी देवांशी विरेन शाह यांना मुदतीपूर्व त्यांच्या पदावरुन हटवलंय
- अनुज गुप्ता हे 2016 पासून गोयल यांच्यासोबत होते, 2021 मध्ये त्यांना पुन्हा मुदतवाढ दिली होती
- ओसएडींचा कार्यकाळ सहसा पाच वर्षे किंवा मंत्र्यांची इच्छा असेपर्यंत असा असतो
- पण कॅबिनेट कमिटी ऑन अपॉईंटमेंट, ज्यात पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शाह हे दोघेच आहेत त्यांनी हा निर्णय घेतला आहे
- मुदतीआधीच हटवण्यामागचं कारण काय ते स्पष्ट नाही.
मंत्र्यांच्या ओएसडींना हटवणं म्हणजे तो मंत्र्यांसाठीही संदेश मानला जातोच. पण अनुज गुप्ता, देवांशी शाह या दोघांचंही म्हणणं आहे की त्यांनी वैयक्तिक कारणामुळे पद सोडलं आहे. अनुज गुप्ता यांनी 2014 च्या आधी खासगी क्षेत्रात काम केलं आहे. आयआयटी मद्रास, आयआयएम बंगलोरमधून त्यांनी त्यांचं शिक्षण पूर्ण केलं आहे. 2016 पासून ते गोयल यांच्यासोबत आहेत.
मंत्रिमंडळाच्या यादीत मोदी-शाहांचं धक्कातंत्र काय असतं याचा अनुभव सर्वांना आहे. हर्षवर्धन, रवीशंकर प्रसाद, प्रकाश जावडेकर यांनी त्याचा अनुभव घेतला आहे. राष्ट्रपती निवडणूक असो की लोकसभा अध्यक्षांची निवड..कुणाच्या ध्यानीमनी नसलेलीच नावं ऐनवेळी पुढे येतात. त्याच धक्कातंत्राची झलक सध्या बड्या मंत्र्यांच्या ओएसडींबाबतही पाहायला मिळत आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या :