Delhi MCD Election : 'आप' नगरसेवक तुंबलेल्या गटारात उतरला, सफाईनंतर दुग्धाभिषेक
दिल्लीप आप नगरसेवकाने अनिल कपूरच्या 'नायक' चित्रपटातील एका दृश्याची आठवण करुन दिली. या नगरसेवकाने तुंबलेल्या गटारात उडी मारुन साफसफाई केली. नगरसेवक बाहेर आल्यावर कार्यकर्त्यांनी दुग्धाभिषेक केला.
नवी दिल्ली : दिल्लीतील महापालिका निवडणुकीच्या धामधुमीत, आम आदमी पक्षाच्या नगरसेवकाने अनिल कपूरच्या 'नायक' चित्रपटातील एका दृश्याची आठवण करुन दिली. या नगरसेवकाने तुंबलेल्या गटारात उडी मारुन साफसफाई केली. नगरसेवक बाहेर आल्यावर कार्यकर्त्यांनी त्यांचा दुग्धाभिषेक केला. निवडणुकीच्या तोंडावर आप नगरसेवकाने साफसफाई केली असली तरी त्यांनी नवा पायंडा पाडला आहे. यामुळे त्यांचं सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. शिवाय याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
हसीब उल हसन असं या नगरसेवकाचं नाव आहे. त्यांनी मंगळवारी (22 मार्च) पूर्व दिल्लीत भेट दिली. परंतु तिथे एका ठिकाणी तुंबलेला नाला त्यांना दिसला, ज्यामधून दुर्गंधी येत होती. मग काय, नगरसेवक हसीब-उल-हसन यांनी फावडे हातात घेऊन त्या नाल्यात उडी मारली आणि साफसफाई सुरु केली. प्रसारमाध्यमे तिथे दाख होताच लोकांचीही मोठी गर्दी झाली. हसन यांनी नागरिकआणि प्रसारमाध्यमांसमोर स्वच्छताही केली आणि दुधाने आंघोळही केली.
नालेसफाई करताना नगरसेवक हसन यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला. शास्त्री पार्कमध्ये भाजपचे नगरसेवक आहे, खासदारही भाजपचा आहे. पण हे लोक काहीच काम करत नसल्याने लोकांना घाणीत राहावं लागत आहे, असं हसन म्हणाले.
नाला साफ करताना हसीब उल हसन मीडियाशी बोलत होते. नाल्याची सफाई करण्यासाठी अनेकवेळा वरिष्ठांना सांगितलं, पण त्याचा काही उपयोग झाला नसल्याचं ते म्हणाले. त्यामुळे आज तो स्वत: फावडे घेऊन नाला साफ करण्यासाठी उतरलो.
ही बातमी समजताच भाजपचे नेते जागे झाले. भाजप नेत्यांनी या संपूर्ण घटनेचं वर्णन राजकीय नाटक असं केलं. ते म्हणाले की, दिल्लीत कुठेही पाणी साचले तर त्याची जबाबदारी दिल्ली सरकारच्या अखत्यारित येणाऱ्या पूर विभागाची आहे. अशाप्रकारे भाजप नेत्यांनी तुंबलेल्या नाल्याची जबाबदारी झटकली.