C Voter Survey : मनिष सिसोदियांनी भाजप नेत्याच्या कथित कॉलचा खुलासा करावा का? जाणून घ्या काय म्हणाले मतदार
Delhi Liquor Policy Case : दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया (Manish Sisodia) ईडी आणि सीबीआय (CBI) तपासांमध्ये अडकल्यानंतर आप (AAP) आणि भाजप (BJP) यांच्यातील राजकीय वाद आणखी तीव्र झालाय
Delhi Liquor Policy Case : दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया (Manish Sisodia) ईडी आणि सीबीआय (CBI) तपासांमध्ये अडकल्यानंतर आप (AAP) आणि भाजप (BJP) यांच्यातील राजकीय वाद आणखी तीव्र झालाय. केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टीने याला 2024 ची निवडणूक लढाई म्हटलेय. पण या सर्व प्रकरणावर सर्वसामान्य जनतेला काय वाटतेय? या प्रकरणाकडे जनता कशी पाहते? याबाबात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न एबीपी न्यूजनं केले आहे. त्यासाठी एबीपी न्यूजसाठी सी-व्होटरने (C-Voter) सर्व्हे घेत देशातील जनतेला मूड जाणून घेण्याचा प्रयत्न केलाय.
आप आणि भाजपच्या वादावर सी व्होटरनं सर्व्हे केला आहे. यामध्ये देशभरातील दोन हजार 102 लोकांनी सहभाग घेतला होता. मनिष सिसोदियांनी भाजप नेत्याच्या कथित कॉलचा खुलासा करावा का? असा प्रश्न सर्व्हेमध्ये विचारण्यात आला होता. यामध्ये आश्चर्यचकीत करणारे उत्तर मिळालं आहे. तब्बल 70 टक्के लोकांनी होय... मनिष सिसोदिया यांनी कथित कॉलचा खुलासा करावा, असे म्हटले आहे. तर 30 टक्के लोकांनी नाही असं उत्तर दिलेय.
मनिष सिसोदियांना दिलेल्या ऑफरचे कॉल रेकॉर्डिंग असल्याचा 'आप'चा दावा
भाजपात या, तुम्हाला मुख्यमंत्री करू, सीबीआय चौकशी बंद करू, अशी ऑफर भाजपनं मनिष सिसोदिया यांना दिली असून त्याचं रेकॉर्डिंग असल्याचा दावा आप पक्षानं केला आहे. आवश्यकता भासल्यास हे कॉल रेकॉर्डिंग बाहेर काढू असे 'आप'ने म्हटले आहे.
भाजपचे ऑपरेशन लोटस अयशस्वी - केजरीवाल
आपल्याला भाजपमध्ये येण्याची ऑफर देण्यात आली आहे. मी भाजपमध्ये गेलो तर सीबीआय आणि ईडीकडून सुरू असलेली चौकशी बंद करू अशी भाजपने मला ऑफर दिली आहे. परंतु, मी महाराणा प्रताप यांचा वंशज आहे, मी राजपूत आहे. मी माझे डोके कापून टाकीन, परंतु भ्रष्ट-कारस्थानी लोकांसमोर झुकणार नाही. माझ्यावरील सर्व खटले खोटे आहेत. तुम्हाला जे करायचे ते करा, असे ट्विट सिसोदिया यांनी केले आहे. सिसोदिया यांच्या या ट्विटला केजरीवाल यांनी उत्तर देत दिल्लीतील भाजपचे ऑपरेशन लोटस अयशस्वी झाल्याचे म्हटले आहे.
ईडीकडून गुन्हा दाखल -
सीबीआय दिल्लीच्या मद्य धोरणाची चौकशी करत आहे. या तपासाअंतर्गत सीबीआयने दिल्ली एनसीआरमध्ये अनेक ठिकाणी छापे टाकले. दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या घरावरही सीबीआयने छापा टाकला. यानंतर दिल्लीच्या राजकारणात भूकंप झाला आहे. आम आदमी पक्ष आणि भाजपमध्ये राजकीय युद्ध रंगले आहे. आरोप-प्रत्यारोप आणि प्रश्नोत्तरांचाच्या फेऱ्या देखील दोन्ही पक्षांमध्ये सुरू झाला. याच प्रकरणी दोन्ही पक्षांनी अनेक पत्रकार परिषदाही घेतल्या. आज मनिष सिसोदिया यांच्यावर ईडीनं गुन्हा दाखल केला आहे.