Jahangirpuri Demolition Drive : जहांगीरपुरीत ऑपरेशन बुलडोझर सुरु राहणार? आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी
Jahangirpuri Demolition Drive : जहांगीरपुरीत ऑपरेशन बुलडोझर सुरु राहणार? आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार असून निकालाकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे.
Jahangirpuri Demolition Drive : दिल्लीतील जहांगीरपुरीमध्ये (Jahangirpuri) पुन्हा बुलडोझर चालणार का, याचा निर्णय आज येऊ शकतो. एमसीडीच्या अतिक्रमणविरोधी मोहिमेविरोधात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. दिल्लीच्या जहांगीरपुरी येथे झालेल्या हिंसाचारानंतर एमसीडीनं येथील बेकायदा बांधकामांवर बुलडोझर फिरवला, ज्यामुळे बराच गदारोळ झाला आणि आता हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात आहे. आता सुप्रीम कोर्टाचे कोणते खंडपीठ या प्रकरणावर सुनावणी करणार आहे हे देखील सांगण्यात आलेलं आहे.
सर्वोच्च न्यायालयात महत्त्वाची सुनावणी
सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एल नागेश्वर राव आणि न्यायमूर्ती बीआर गवई यांच्या खंडपीठासमोर जहांगीरपुरीतील अतिक्रमणविरोधी मोहिमेची सुनावणी होणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. या संदर्भात अनेक याचिकाकर्त्यांनी सुनावणीची मागणी केली होती. यासोबतच अनेक भाजपशासित राज्यांमध्ये सुरू असलेल्या बुलडोझर कारवाईविरोधात जमियत उलेमा-ए-हिंदच्या याचिकेवरही सर्वोच्च न्यायालय सुनावणी करणार आहे.
सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिला होता
यापूर्वी मंगळवारी रात्री उशिरा एमसीडी जहांगीरपुरीतील बेकायदा बांधकामांवर कारवाई करणार असल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर सकाळी नऊच्या सुमारास ही कारवाई सुरू झाली. याची माहिती मिळताच याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेत या प्रकरणाची सुनावणी घेण्याची मागणी केली. सुप्रीम कोर्टाने तात्काळ सुनावणी केली नाही, मात्र कारवाई तूर्तास थांबवून स्थगिती कायम ठेवण्याचे आदेश दिले. मात्र, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही अनेक तास बुलडोझर सुरूच होता. अखेर सुप्रीम कोर्टाने पुन्हा पोलीस आयुक्त आणि एमसीडी अधिकाऱ्यांना कारवाई थांबवण्यास सांगण्यास सांगितलं. त्यानंतर ही संपूर्ण कारवाई थांबवण्यात आली.
राजकीय आरोप-प्रत्यारोपांचं सत्र सुरू
या संपूर्ण प्रकरणावरून राजकीय आरोप-प्रत्यारोपांत्या सत्राला सुरुवात झाली आहे. सर्व विरोधी पक्षांनी भाजप आणि केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. भारतीय राज्यघटनेवर भाजपचा हा बुलडोझर चालवण्यात आला आहे, असं काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी म्हणाले. त्याचवेळी भाजपकडून त्याला प्रत्युत्तर देण्यात आलं असून, राहुल गांधी पराभवानं निराश झाले आहेत, त्यामुळेच ते अशी वक्तव्यं करत आहेत, असं म्हणत भाजपकडून काँग्रेसवर टीकेची झोड उठवण्यात आली आहे. तर दुसरीकडे, दिल्लीत सत्तेत असलेल्या आम आदमी पक्षानं म्हटलं आहे की, भाजप हे मुद्दाम करत आहे, कारण त्याचा फायदा पक्षाला होतो. तर भाजप मुख्यालयावर बुलडोझर चालवा, असं दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया म्हणाले.