Delhi Excise Policy Case : कथित अबकारी धोरण घोटाळा प्रकरणात सीबीआय अरविंद केजरीवालांची चौकशी करणार; भाजप आणि आपमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काही मद्यविक्रेते आणि दक्षिण लॉबी यांच्या बाजूने धोरणात बदल करून जमा केलेला पैसा AAP द्वारे निवडणुकीच्या उद्देशांसाठी वापरला जात असल्याचा संशय आहे.
Delhi Excise Policy Case : कथित अबकारी धोरण घोटाळ्याप्रकरणी सीबीआयने शनिवारी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना समन्स बजावले आहे. आम आदमी पक्षाने (आप) हा कट असल्याचे म्हटले आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी चौकशीला समोर जाणार असल्याचे सांगितले आहे. दरम्यान, केजरीवाल यांना समन्स बजावल्यानंतर केंद्र आणि विरोधी पक्षांमध्येही आरोप प्रत्यारोपांची मालिका सुरू झाली आहे.
CBI अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार अरविंद केजरीवाल यांना चौकशीसाठी रविवारी (16 एप्रिल) सकाळी 11 वाजता मुख्यालयात उपस्थित राहण्यास सांगण्यात आले आहे. एजन्सीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार काही मद्यविक्रेते आणि दक्षिण लॉबी यांच्या बाजूने धोरणात बदल करून जमा केलेला पैसा AAP द्वारे निवडणुकीच्या उद्देशांसाठी वापरला जात असल्याचा संशय आहे. या प्रकरणी केंद्रीय तपास यंत्रणेने दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना यापूर्वीच अटक केली आहे.
दिल्लीत तगडा बंदोबस्त
थेट मुख्यमंत्र्यांची चौकशी होणार असल्याने दिल्ली पोलिस सीबीआय मुख्यालयाबाहेर निमलष्करी दलाच्या कर्मचार्यांसह 1000 हून अधिक सुरक्षा कर्मचारी तैनात करणार आहेत. राऊस एव्हेन्यू येथील आम आदमी पार्टीच्या कार्यालयाबाहेरही सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात येणार आहे.
मुख्यमंत्री केजरीवाल यांना अटक करण्याचा कट
सीबीआयने अदानी प्रकरणावर बोलण्यासाठी दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांना समन्स बजावल्याचा आरोप आम आदमी पक्षाने केला आहे. अशा नोटीसमुळे त्यांचा भ्रष्टाचाराविरुद्धचा लढा थांबणार नाही. सीबीआयचे समन्स म्हणजे मुख्यमंत्री केजरीवाल यांना अटक करण्याचा कट असल्याचे आपचे राज्यसभा सदस्य संजय सिंह यांनी म्हटले आहे. मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत अदानी प्रकरणावर चर्चा केली. त्याच दिवशी मी त्यांना म्हणालो की आता पुढील नंबर तुमचा आहे. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार डोक्यापासून ते पायापर्यंत भ्रष्ट असून अशा नोटिशीमुळे केजरीवाल यांचा भ्रष्टाचाराविरुद्धचा लढा थांबणार नाही.
चौकशीवर केजरीवाल काय म्हणाले?
अरविंद केजरीवाल यांनी आज सांगितले की, आम आदमी पक्ष देशासाठी आशेचा किरण म्हणून उदयास आला आहे आणि त्यामुळेच चिरडण्याचे प्रयत्न सुरू आहेत. ते म्हणाले की, गेल्या 75 वर्षात 'आप'प्रमाणे कोणत्याही पक्षाला लक्ष्य करण्यात आले नाही. कारण 'आप'ने लोकांमध्ये आशा निर्माण केली आहे की ते गरिबी संपवून शिक्षित करेल. आम्हाला टार्गेट करून ही आशा नष्ट करायची आहे.
ते पुढे म्हणाले की, मनीष सिसोदिया यांच्यावर त्यांचे 14 फोन फोडल्याचा आरोप आहे. मग ईडी म्हणत आहे की त्यापैकी 4 फोन त्यांच्याकडे आहेत आणि सीबीआय सांगत आहे की एक फोन त्यांच्याकडे आहे, जर त्यांनी फोन फोडले असतील तर त्यांना फोन कसे मिळाले. या लोकांनी खोटे बोलून केसेस केल्या आणि मद्य घोटाळा झाल्याचे सांगितले. केजरीवाल म्हणाले की, 100 कोटी रुपये घेतल्याचा आरोप आहे. त्यांनी विचारले हे पैसे कुठे आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या