Cyclone Sitrang : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचं क्षेत्र तयार, चक्रीवादळात रूपांतरित झालं 'सीतरंग'
Cyclone In Bay Of Bengal : बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे 'सीतरंग' वादळाचं रुपांतर चक्रीवादळात झालं आहे.
Cyclone In Bay Of Bengal : बंगालच्या उपसागरावरील (Bay Of Begal) खोल दाबाचे क्षेत्र रविवारी संध्याकाळी चक्रीवादळात रूपांतरित झाले आणि बांगलादेश किनारपट्टीकडे सरकत आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) ही माहिती दिली. थायलँडनं (Thailand) या चक्रीवादळाला 'सीतरंग' (Sitrang) असं नाव दिलं आहे. आयएमडीनुसार, मंगळवारी सकाळी चक्रीवादळ बांगलादेशातील टिकोना बेट आणि सनद्वीप (Sandwip) यांच्यामध्ये धडकू शकते.
हवामान विभागानं सांगितलं की, रविवार, 23 ऑक्टोबर 2022 रोजी सायंकाळी 5.30 वाजता चक्रीवादळ पश्चिम बंगालमधील सागर बेटापासून 580 किमी दक्षिणेकडे आणि बांगलादेशातील बारिसालपासून 740 किमी दक्षिण-नैऋत्य दिशेनं सरकत होतं. IMD च्या मते, चक्रीवादळाच्या प्रभावामुळे ओडिशा आणि पश्चिम बंगालच्या काही भागांत मुसळधार पाऊस पडू शकतो. पश्चिम बंगालच्या किनारी भागांत मुसळधार पाऊस आणि 100 किमी प्रतितास वेगानं वाऱ्याची शक्यता आहे.
मुसळधार पावसाचा अंदाज
भारतीय हवामान खात्यानं (IMD) यापूर्वी अंदाज वर्तवला होता की, रविवारी सकाळी सागर बेटाच्या दक्षिणेला 700 किमी अंतरावर असलेली हवामान परिस्थिती वायव्य दिशेकडे सरकत आहे आणि सोमवारी ती पुन्हा उत्तर-पूर्वेकडे वळेल आणि टिकोना बेटामार्गे बांगलादेश किनारपट्टी पार करेल असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. हवामान खात्यानं एका बुलेटिनमध्ये सांगितलं होतं की, सोमवारी दक्षिण 24 परगणा आणि उत्तर 24 परगणा तसेच, पूर्व आणि पश्चिम मिदनापूरच्या किनारी जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. दुसरीकडे कोलकाता, हावडा आणि हुगळीत सोमवार आणि मंगळवारी रिमझिम पाऊस कोसळू शकतो.
सीतारंग चक्रीवादळाचा दिवाळीत कहर
ऐन दिवाळीत पावसानं धुमाकूळ घातल्यानं सर्वचजण हैराण आहेत. मुसळधार पावसानं तर बळीराजाच्या तोंडचा घास हिरावला गेला आहे. तसेच, देशभरात यंदा तब्बल दोन वर्षांनी निर्बंधमुक्त दिवाळी साजरी केली जात आहे. त्यामुळे सातत्यानं कोसळणाऱ्या पावसानं काही प्रमाणात का होईना, दिवाळीच्या आनंदावर विरजण पडलं आहे.
मान्सून संपूर्ण महाराष्ट्रातून माघारी
राज्यात मनसोक्त बरसलेल्या मान्सूनने रविवारी निरोप घेतला आहे. शेतकऱ्यांसाठी मोठी दिलासादायक बातमी आहे. सध्या रब्बी पिकांच्या काढणीचा हंगाम सुरु असून मान्सून परतल्याने आता दिवाळीत पाऊस नसणार आहे. मुंबई, पुण्यासह संपूर्ण महाराष्ट्रातून माघारी परतला आहे. तसेच महाराष्ट्रासह देशातून देखील मान्सून परतला आहे.