Cryptocurrency : आरबीआयची डिजिटल करन्सी क्रिप्टोकरन्सीपासून वेगळी कशी? जाणून घ्या
भारतातील डिजिटल करन्सी ही क्रिप्टोकरन्सीपेक्षा वेगळी असून त्यावर आरबीआयचे नियंत्रण असणार आहे. त्यामुळे मनी लॉंड्रिंग आणि टेरर फंडिंगसाठी त्याचा वापर करण्यात येऊ शकणार नाही.
नवी दिल्ली : येत्या हिवाळी अधिवेशनामध्ये खासगी क्रिप्टोकरन्सीवर बंदी आणणारे विधेयक सादर केले जाणार आहे. त्यामुळे क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांमध्ये भीती पसरली आहे. त्यामुळे प्रमुख क्रिप्टोकरन्सीमध्ये जवळपास 15 टक्क्यांची घट झाल्याचं दिसून आलं आहे. बिटकॉईनमध्ये 17 टक्क्यांची घट झाली आहे. भारतात सुरु होणारी डिजिटल करन्सी ही CBDC या प्रकारातील असेल.
काय आहे CBDC?
क्रिप्टोकरन्सी ही डिजिटल करन्सी आहे. यावर कोणत्याही सरकारचे नियंत्रण नाही, तसेच याला अनेक देशांनी अद्याप मान्यता दिली नाही. त्यामुळे आरबीआय आता डिजिटल करन्सी ही CBDC म्हणजे सेंट्रल बॅंक डिजिटल करन्सी या माध्यमातून याची सुरुवात करणार आहे. त्यामुळे याला भारत सरकारची मान्यता असेल आणि त्यावर आरबीआयचे नियंत्रणही असेल.
CBDC आणि क्रिप्टोकरन्सीमध्ये काय फरक आहे?
आरबीआयने सांगितलं आहे की, क्रिप्टोकरन्सीला कोणतेही ठराविक मू्ल्य नाही. तसेच ते कोणत्याही कमोडिटी प्रकारात बसत नाही. तसेच याची कर्ज वा इतर प्रकारात देवाण-घेवाण करता येत नाही. भारतात अस्तित्वात येणारे डिजिटल करन्सी यापेक्षा वेगळे असते. त्याला आरबीआयची मान्यता असणार आहे. त्यामुळे याचा मनी लॉंड्रिंग किंवा टेरर फंडिंगसाठी वापर करता येणार नाही.
भारतात क्रिप्टोकरन्सी विधेयक सादर होणार
संसदेचे हिवाळी अधिवेशन येत्या 29 नोव्हेंबरपासून सुरु होणार आहे. त्यामध्ये एकूण 26 विधेयकं सादर करण्याची तयारी सरकारकडून करण्यात आली आहे. यामध्ये क्रिप्टोकरन्सी अॅन्ड रेग्युलेशन ऑफ ऑफिशिअल डिजिटल करन्सी बिल 2021 हे विधेयक सादर करण्यात येणार आहे.
डिजिटल स्वरुपात रुपया सुरु होणार
भारतात क्रिप्टोकरन्सी सुरु करण्यासाठी आरबीआयने तयारी सुरु केली आहे. भारतातील ही डिजिटल करन्सी व्हर्चुअल असेल. मात्र देशाचे मूळ चलन हे रुपयाच असेल. म्हणजे डिजिटल स्वरुपात हा रुपया असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आरबीआयचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी पुढील वर्षी डिसेंबरपर्यंत सीबीडीसीएसद्वारे (CBDC) सॉफ्ट लॉन्चची शक्यता वर्तवली होती. मात्र, याबाबत निश्चित कालमर्यादा दिलेली नाही. आरबीआयकडून त्याचा एक नियोजनबद्ध आराखडा तयार करण्यात येत आहे.
संबंधित बातम्या :
- Winter Session : मोजके अपवाद वगळून खाजगी क्रिप्टोकरन्सीवर भारतात बंदी? संसदेच्या आगामी अधिवेशनात 26 विधेयकं पटलावर
- Cryptocurrency : क्रिप्टोकरन्सीचा प्रकार म्हणजे चीट फंड सारखा, लवकरच फुगा फुटणार; रघुराम राजन यांचा इशारा
- Cryptocurrency: तुमच्याकडेही क्रिप्टोकरन्सी असली तरी घाबरण्याची गरज नाही!
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha