(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Covid Vaccination | पहिल्या दिवशीच्या लसीकरणात गंभीर दुष्परिणाम नाहीत; स्वदेशी लसीवर शंका घेणाऱ्यांना अमित शहांचा टोला
Covid Vaccination: शनिवारी देशभरात एक लाख 91 हजार 181 आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोनाची लस देण्यात आली. यामध्ये कोणतेही दुष्परिणाम समोर आले नाहीत. यावरुन स्वदेशी लसीवर शंका घेण्याऱ्यांना अमित शाह यांनी टोला लगावला आहे.
नवी दिल्ली: देशात शनिवारी जगातल्या सर्वात मोठ्या लसीकरणाच्या कार्यक्रमाला शुभारंभ झाला. काल एका दिवसात देशभरातील एक लाख 91 हजार 181 आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोनाची लस देण्यात आली. पहिल्या दिवशी करण्यात आलेल्या लसीकरणामध्ये कोणतेही गंभीर दुष्परिणाम समोर आले नाहीत. एकीकडे सगळं जग भारताच्या लसीकरणाच्या या कार्यक्रमाचे कौतुक करत असताना देशात मात्र यावरुन राजकारण तापण्याची चिन्हं आहेत.
मंत्र्यांनी का नाही घेतली लस, विरोधी पक्षांचा प्रश्न देशातील लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात तीन कोटी लोकांना ही लस देण्यात येणार आहे. त्यामध्ये कोरोना योध्यांना प्राधान्य देण्यात येणार असल्याचंही सरकारनं स्पष्ट केलंय. त्याचवेळी यावरुन राजकारणाला सुरुवात झाल्याचं समोर येतंय. लसीकरणाच्या या कार्यक्रमावर काँग्रेसने काही प्रश्न उपस्थित केले. त्यानंतर समाजवादी पक्षानेही काँग्रेसचा सूर ओढत केंद्र सरकारवर टीका केली. काँग्रेस नेता मनिष तिवारी यांनी या लसीकरणाच्या कार्यक्रमावर प्रश्न उपस्थित करताना सरकारला विचारले की, "ही लस सुरक्षित आहे तर सरकारच्या मंत्र्यांनी का घेतली नाही?"
मनिष तिवारी म्हणाले की, "ज्या-ज्या देशात लसीकरणाला सुरुवात झाली आहे त्या-त्या ठिकाणच्या प्रमुखांनी सर्वप्रथम ती लस घेतल्याचं दिसून आलं आहे. त्यामुळे देशातील नागरिकांमध्ये एक सकारात्मक संदेश पोहचला. इंग्लंडमध्ये पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनीही सर्वप्रथम लस घेतली. त्यामुळे ती लस सुरक्षित असल्याचा संदेश नागरिकांपर्यंत गेला आहे."
मनिष तिवारी पुढे म्हणाले की, "इतर सर्व देशातही हीच पार पाडण्यात आली. आपल्या देशात हे चित्र पहायला मिळाले नाही. यावरुन एक प्रश्न पडतो की ही लस इतकी सुरक्षित आहे तर केंद्र सरकारच्या मंत्र्यांनी का घेतली नाही? असं झालं असतं तर नागरिकांमध्ये एक संदेश गेला असता.
केंद्र शासनाने दारिद्र रेषेखालील घटकांना कोरोना विरोधातील लस मोफत पुरवावी : राज्यमंत्री यड्रावकर
विरोधी पक्षांनी अशा प्रकारचे आरोप करताच त्याला भाजपने प्रत्युत्तर दिलं आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन आणि आरोग्य राज्य मंत्री अश्विनी चौबे यांच्यासोबत अनेकांनी कोरोनाची लस सुरक्षित असल्याचं सांगितलं आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले की, "कोरोनाविरोधात सर्वात यशस्वी लढाई भारताने लढली आहे. मला दु:ख आहे की काही लोक यामध्ये राजकारण करत आहेत. माझी या सर्वांना विनंती आहे की आपण सर्वांनी मिळून संपूर्ण देशाला या लसीच्या सुरक्षिततेबद्दल विश्वास दिला पाहिजे. संपूर्ण देशाला लसीकरणाच्या या अभियानात जोडलं पाहिजे.
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले की, "लसीकरणाच्या या कार्यक्रमाला सुरुवात झाली याचा आनंद आहे. या दोन स्वदेशी लसींच्या सोबतच आणखी चार लसी लवकरच उपलब्ध होणार आहेत. भारतातील या लसी लवकरच जगभरात निर्यात केल्या जातील."
कोरोनावरील लसीकरण सुरू होत असताना 'कोव्हॅक्सिन' विरोधात हायकोर्टात याचिका
काँग्रेसचे मनिष तिवारी यांनी या लसीकरणाच्या कार्यक्रमावर प्रश्न उपस्थित केले असतानाच पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंह यांनी मात्र ही लस सुरक्षित असल्याचं सांगितलं आहे. अमरिंदर सिंह यांनी लसीच्या बाबतीत अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन केलंय.
काल करण्यात आलेल्या लसीकरणानंतर अद्याप त्याचे कोणतेही गंभीर दुष्परिणाम समोर आले नसल्याने या स्वदेशी लसीबद्दल विश्वासार्हता वाढली आहे. देशातल्या वैज्ञानिकांनी केलेल्या वेगवेगळ्या स्तरावरील परिक्षणानंतर सरकारने या लसींच्या आपत्कालीन वापराला मंजूरी दिली आहे.
Exclusive : कोरोना लसीकरण कोणत्याही अडथळ्याविना, दोन्ही लशी सुरक्षित : आरोग्यमंत्री राजेश टोपे