Covaxin Clinical Trial | 2 ते 18 वयोगटासाठी कोवॅक्सिनच्या चाचणीला परवानगी
कोरोनाची तिसरी लाट आल्यास त्यात लहान मुलांवर परिणाम होण्याची शक्यता वर्तवला आहे. त्यात आता 2 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांवर कोवॅक्सिन लसीची चाचणी करण्यास परवानगी देऊन सरकारने मोठं पाऊल उचललं आहे.
नवी दिल्ली : 2 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांवर भारत बायोटेकची कोवॅक्सिन या स्वदेशी कोरोना प्रतिबंधक लसीची क्लिनिकल चाचणी घेण्यास औषध महानियंत्रकांनी परवानगी दिली आहे. तज्ज्ञ समितीने 2 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांवर कोवॅक्सिन लसीच्या दुसऱ्या/तिसऱ्या टप्प्याच्या चाचणीसाठी शिफारस केली होती. त्याला आता डीसीजीआयकडून परवानगी मिळाली आहे. 525 स्वयंसेवकांवर ही चाचणी होणार आहे.
भारत सध्या कोरोनाव्हायरसच्या दुसऱ्या लाटेचा सामना करत आहे. सोबतच देशात लसीकरणही सुरु आहे. कोरोनाची तिसरी लाट आल्यास त्यात लहान मुलांवर परिणाम होण्याची शक्यता वर्तवला आहे. त्यात आता 2 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांवर कोवॅक्सिन लसीची चाचणी करण्यास परवानगी देऊन सरकारने मोठं पाऊल उचललं आहे.
ही क्लिनिकल ट्रायल 525 जणांवर होणार आहे. दिल्लीतील एम्स, पाटण्यातील एम्स आणि नागपूरच्या मेडिट्रिना मेडिकल सायन्स इन्स्टिट्यूटमध्ये होणार आहे. कोरोना लसीशी संबंधित समितीच्या शिफारशींनुसार, भारत बायोटेकला तिसऱ्या टप्प्यातील चाचणी सुरु करण्याआधी दुसऱ्या टप्प्याचा डेटा उपलब्ध करावा लागेल.
मुलांवर कोवॅक्सिनची चाचणी कशी होणार?
डीसीजीआयने ज्या शिफारशीला मंजुरी दिली, त्यानुसार चाचणीत 525 स्वयंसेवक असतील. त्यांचं वय 2 ते 18 वर्षांच्या दरम्यान असेल. इंजेक्शनद्वारे लसीचे डोस दिले जातील. पहिला डोसनंतर 28 दिवसांनंतर दुसरा डोस देण्यात येईल. कोवॅक्सिनच्या सामान्य चाचणीमध्येही दोन डोसदरम्यान 28 दिवसांचं अंतर होतं.
भारतातील दोन लसी सध्या केवळ 18 वर्षांवरील नागरिकांसाठी वापरल्या जात आहेत. देशात सीरम इन्स्टिट्यूटची कोविशील्ड आणि भारत बायोटेकची कोवॅक्सिन लस वापरली जात आहे.
भारत बायोटेकच्या विनंतीवर सीडीएससीओची चाचणीसाठी शिफारस
2 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांमध्ये सुरक्षा आणि रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासोबतच इतर गोष्टींचं आकलन करण्यासाठी कोवॅक्सिन डोसच्या दुसऱ्या/तिसऱ्या टप्प्याच्या चाचणीसाठी परवानगी देण्याची विनंती भारत बायोटेकने केली होती. केंद्रीय औषध मानक नियंत्रण संस्था म्हणजेच सीडीएससीओच्या कोविड-19 विषयक तज्ज्ञ समितीने मंगळवारी (11 मे) भारत बायोटेकच्या विनंतीवर विचारविनिमय केला. त्यानंतर समितीने प्रस्तावित दुसऱ्या/तिसऱ्या टप्प्यातील चाचणीसाठी परवानगी देण्याची शिफारस केली होती. त्यानंतर औषध महानियंत्रकांनी काल (12 मे) कोवॅक्सिनच्या चाचणीसाठी परवानगी दिली.