नवी दिल्ली : कोरोना व्हायरसला प्रतिबंध करणाऱ्या भारत बायोटेक आणि झायडस कॅडिलाच्या लसींच्या मानवी चाचणीला परवानगी मिळणं म्हणजे कोरोनाच्या शेवटाची सुरुवात असल्याचं केंद्र सरकारने म्हटलं आहे.


भारतात दोन औषध कंपन्यांच्या लसींना मानवी चाचणीची परवानगी मिळाली आहे, त्याअगोदरचं त्याचं संशोधन पूर्ण झालं आहे.


भारतात एवढ्या लवकर कोरोना प्रतिबंधक लसींना मानवी चाचण्यांची परवानगी मिळण्यावर जगभरातून काही आक्षेप उमटले असले तरी जगभरात कोरोना व्हायरस प्रतिबंधात्मक लसीवर 140 ठिकाणी संशोधन सुरु आहे, त्यापैकी तब्बल 11 संशोधनांना मानवी चाचण्यांची परवानगी मिळाली आहे. त्यात दोन भारताच्या आहेत.


VIDEO | Web Exclusive | भारत बायोटेकच्या लसीसंदर्भात बेळगावच्या डॉ. अमित भाटे यांच्याशी संवाद 


कोरोना व्हायरस साथीच्या काळात भारताने औषध निर्मिती आणि संशोधन क्षेत्रात घेतलेली झेप यातून स्पष्ट होत असल्याचं केंद्र सरकारच्या वतीने सांगण्यात आलं आहे. मानवी चाचण्यांच्या कसोटीत कोणत्या कंपनीची किंवा देशाला यश मिळालं तरी त्या लसीच्या मोठ्या प्रमाणावरील उत्पादनासाठी त्यांना भारताकडेच यावं लागेल, असंही केंद्राच्या वतीने सांगण्यात आलं. एका अर्थाने कोरोना प्रतिबंधक लसींना मानवी चाचण्याची परवानगी मिळणं हे कोरोनाच्या शेवटाची सुरुवात असल्याचंही केंद्र सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाने स्पष्ट केलं आहे.


हैदराबादच्या भारत बायोटेक इंटरनॅशनल लिमिटेड Bharat Biotech International Limited या औषध कंपनीने आयसीएमआर म्हणजेच भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद ही वैद्यकीय क्षेत्रातील सर्वोच्च संस्था तसंच पुण्यातील एनआयव्ही म्हणजे राष्ट्रीय विषाणु विज्ञान संशोधन केंद्र यांच्या सहकार्याने कोरोनाला प्रतिबंध करणारी लस बनवली आहे. या लसीच्या मानवी चाचण्यांना परवानगी मिळाली आहे. दोन दिवसांपूर्वीच या लसीच्या परवानगी देताना आयसीएमआरने 15 ऑगस्टपर्यंत कोरोना प्रतिबंधक लस उपलब्ध करुन देण्याचं आवाहन भारत बायोटेक कंपनीला केलं आहे. हे पत्र सोशल मीडियात खूप व्हायरल झालं होतं. जेमतेम दीड महिन्यात लस बनवणं शक्य आहे का? मानवी चाचण्यांच्या सर्व टप्प्यांच्या संशोधनासाठी हा कालावधी अपूर्ण आहे, अशा चर्चाही मोठ्या प्रमाणात झाल्या.


ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया, म्हणजेच भारताचे औषध महानियंत्रकांनी भारत बायोटेक सोबतच कॅडिला हेल्थकेअर Cadila Healthcare समूहाच्या झायडस Zydus कंपनीच्या त्यांनी संशोधित केलेल्या लसीच्या मानवी चाचण्यांना परवानगी दिली आहे.


VIDEO | Covaxine | भारतातीय कोविड-19 लस 'Covaxin'ला क्लिनिकल ट्रायलची परवानगी 


भारत बायोटेकच्या कोरोना प्रतिबंधक लसीचं नाव कोवॅक्सिन Covaxin तर झायडस कॅडिलाच्या लसीचं नाव झायकोव-डी ZyCov-D असं आहे. या दोन लसींशिवाय मानवी चाचण्यांच्या टप्प्यात असलेल्या जगातील अन्य 11 लसींना मास प्रॉडक्शन म्हणजे मोठ्या प्रमाणावरील व्यावसायिक उत्पादनासाठी भारताचीच मदत घ्यावी लागेल, असं विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाने म्हटलं आहे.


गेल्या काही वर्षात भारताने औषध निर्मिती क्षेत्रात मिळवलेलं स्थान उल्लेखनीय आहे. जगभरातील वेगवेगळ्या लसींच्या निर्मितीचं केंद्र म्हणून भारताकडे पाहिलं जातं. युनिसेफला पुरवल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या व्हॅक्सिनमधील तब्बल 60 टक्के व्हॅक्सिन म्हणजेच लसींची निर्मिती भारतात झालेली असते.


संबंधित बातम्या




Corona Vaccine | भारतीय बनावटीची कोरोनाची लस 15 ऑगस्टपर्यंतची लॉन्च होण्याची शक्यता