नवी दिल्ली : कोरोना व्हायरसवर प्रतिबंध घालण्यासाठी सध्या जगभरात लस शोधण्याचं काम सुरु आहे. अनेक देशांनी कोरोनावर प्रभावी लस शोधल्याचा दावाही केला होता. यातच योगगुरु बाबा रामदेव यांनी देखील कोरोनावर औषध निर्माण केल्याचा दावा एबीपी माझाच्या माझा कट्टा कार्यक्रमात केला होता. त्यानंतर बाबा रामदेव यांनी कोरोना व्हायरसवरील 'कोरोनिल' हे आयुर्वेदिक औषध लॉन्च केले होते. त्यानंतर अनेक या औषधावरून अनेक वाद निर्माण झाले होते. अशातच पतंजली योग पिठाने आपल्या दाव्यावरून यू-टर्न घेतला आहे. कोरोनिल हे औषध उपचारासाठी नाही, तर रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारं असल्याचं पतंजलीकडून सांगण्यात आलं आहे.
आचार्य बालकृष्ण यांनी सांगितले की, 'क्लिनिकल ट्रायल केल्यानंतर जो निष्कर्ष आला तो आम्ही संपूर्ण देशाला सांगितला. आम्ही असं म्हणालो नाही की, हे औषध कोरोनावर उपचार म्हणून वापरलं जाऊ शकतं. आम्ही असं म्हणालो होतो की, या औषधाच्या क्लिनिकल ट्रायल दरम्यान, कोरोना बाधित रुग्ण कोरोनामुक्त झाले होते. यामध्ये काहीच शंका घेण्यासारखं नाही.'
बालकृष्ण यांनी सांगितले की, 'अनेकांचं असं म्हणणं आहे की, क्लिनिकल ट्रायल खोटं आहे. कोणी म्हणतयं आम्ही केलेला दावा खोटा आहे. आम्ही कधीच नाही म्हमालो की, आम्ही कोरोनाचं औषध तयार केलं आहे. आम्ही हे म्हणालो की, 'आम्ही तयार केलेल्या औषधाच्या क्लिनिकल ट्रायलमध्ये कोरोनाचे रुग्ण बरे झाले आहेत.'
पतंजलीचा दावा काय होता?
23 जून रोजी पतंजलीचे योगगुरु बाबा रामदेव आणि आचार्य बालकृष्ण यांनी एक पत्रकार परिषद घेतली होती. यावेळी रामदेव बाबा म्हणाले की, संपूर्ण सायंटिफिक डॉक्यूमेंटच्या आधारे श्वासारी वटी, कोरोनिल ही कोरोनावरील एविडेंस बेस असलेलं पहिलं आयुर्वेदिक औषध आहे. पतंजलीच्या मते, हा रिसर्च संयुक्तपणे पतंजली रिसर्च इंस्टीट्यूट (पीआरआय) हरिद्वार, नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ मेडिकल सायंस (NIMS), जयपूरने केला आहे. या औषधाची निर्मिती दिव्य फार्मसी, हरिद्वार आणि पतंजली आयुर्वेद लिमिटेड, हरिद्वारकडून केली जात आहे.
पुढे बोलताना बाबा रामदेव म्हणाले की, 'आज पतंजली परिवारासाठी मोठा दिवस आहे. पहिली आयुर्वेदिक, क्लिनिकल कंट्रोल्ड, ट्रायल, एविडेंस आणि रिसर्चवर आधारित औषध पंतंजली रिसर्च सेंटर आणि NIMSच्या संयुक्त प्रयत्नांनी तयार करण्यात आलं आहे. या औषधाचे आम्ही दोन ट्रायल घेतले आहेत. 100 लोकांवर क्लिनिकल स्टडी करण्यात आली. त्यामध्ये 95 लोकांनी सहभाग घेतला होता. 3 दिवसांमध्ये 69 टक्के रुग्ण बरे झाले, तर 7 दिवसांमध्ये 100 टक्के रुग्ण बरे झाले.
माझा कट्टा कार्यक्रमात केला होता दावा
कोरोनावर औषध सापडलं असल्याचा दावा रामदेव बाबा यांनी 13 जून रोजी केला होता. या औषधानं रुग्ण बरं होण्याचं प्रमाण जवळपास 99.99 टक्के आहे, असा दावा योगगुरु रामदेवबाबांनी केला होता. बाबांच्या दाव्यानुसार त्यांच्याकडे आयुर्वेदिक औषधांच्या संशोधनासाठी 500 वैज्ञानिकांची मोठी टीम कार्यरत आहे. केवळ कोरोनाच नव्हे तर वेगवेगळ्या रोगांवर औषध शोधण्याचं प्रमाण सातत्यानं पतंजली करतेय, असं रामदेव बाबा त्यावेळी म्हणाले होते.
महत्त्वाच्या बातम्या :
पतंजलीकडून कोरोनावरील औषध 'कोरोनिल' लॉन्च, Covid 19 वर प्रभावी असल्याचा दावा