(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Beta आणि Delta व्हेरिएंटवर Covaxin लस अधिक प्रभावी, अभ्यासातून स्पष्ट
Coronavirus vaccine : एकूण 37 लोकांचा अभ्यास करण्यात आल्यानंतर असं समोर आलं आहे की Covaxin ही लस भारतातील Delta आणि Beta या व्हेरिएंटवर अधिक प्रभावी आहे.
नवी दिल्ली : हैदराबादच्या भारत बायोटेकची लस कोवॅक्सिन ही भारतात सापडणाऱ्या डेल्टा व्हेरिएंट आणि बीटा व्हेरिएंटवर अधिक प्रभावी असल्याचं समोर आलं आहे. पुण्याच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी, इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च आणि भारत बायोटेकने एका संयुक्तपणे केलेल्या अभ्यासातून ही गोष्ट समोर आली आहे.
डेल्टा व्हेरिएंट हा भारतातील कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला जबाबदार आहे. त्यामुळे भारतात कोरोनाची रुग्णसंख्या आणि मृतांच्या आकड्यात मोठी वाढ झाली आहे. तर बीटा व्हेरिएंट हा पहिल्यांदा दक्षिण आफ्रिकेत सापडला होता.
या तीन संस्थांनी केलेला अभ्यास अद्याप प्रकाशित करण्यात आला नाही. या अभ्यासासाठी कोरोनातून बरे झालेले 20 रुग्ण आणि दोन्ही डोस घेऊन 28 दिवस झालेले 17 लोकांच्या सँपल घेण्यात आले होते. कोवॅक्सिनची ही लस या दोन व्हेरिएंटविरोधात अधिक प्रभावी असल्याचा दावा या अभ्यासात करण्यात आला आहे.
जागतिक आरोग्य संघटनेने भारतात सापडलेल्या कोरोना व्हायरसचं नामकरण केलं आहे. भारतात सापडलेला B.1.617.1 हा कोरोना व्हेरिएंट 'कप्पा' आणि B.1.617.2 हा व्हेरिएंट आता 'डेल्टा' या नावाने ओळखला जाणार आहे. हे दोन व्हेरिएंट सर्वप्रथम भारतात सापडले होते. त्यानंतर सध्या 44 हून जास्त देशांत त्यांचा प्रसार झाला आहे.
यामध्ये डेल्टा हे व्हेरिएंट कप्पाच्या तुलनेत आणि जगातील इतर व्हेरिएंटच्या तुलनेत 50 टक्के जास्त वेगाने पसरत असल्याचं समोर आलं आहे. भारतातील दुसऱ्या लाटेला प्रामुख्याने डेल्टा हा व्हेरिएंट जबाबदार आहे. त्यामुळे मृतांची सख्या मोठ्या प्रमाणात वाढली. देशातील जवळपास प्रत्येक राज्यात हा व्हेरिएंट सापडला असून दिल्ली, महाराष्ट्र, गुजरात, आंध्र प्रदेश, ओडिशा आणि तेलंगनामध्ये याचे प्रमाण जास्त आहे.
जागतिक आरोग्य संघटनेनं भारतात सापडलेला कोरोना डेल्टा व्हेरिएंट हा सर्वाधिक धोकादायक असून तो एक चिंतेचा विषय असल्याचं सांगितलं आहे.
महत्वाच्या बातम्या :