प्लाझ्मा थेरपी अजून प्रायोगिक पातळीवर; आरोग्य मंत्रालयाची माहिती
गेल्या 24 तासांत कोरोनाबाधित 1543 रुग्ण आढळले आहेत. यासह देशात कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांची संख्या 29 हजार 435 वर पोहोचली आहे, अशी माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली.
नवी दिल्ली : कोरोना व्हायरस बाधित रुग्णांवर प्लाझ्मा थेरपीने उपचार केले जाऊ शकतात, यावर वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांची मतं वेगवेगळी आहेत. याबाबत केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केलं की, प्लाझ्मा थेरपी फायदेशीर असल्याचे अद्याप पुरावे नाहीत. याबाबत अजून संशोधन सुरु आहे. प्लाझ्मा थेरपीचा वापर योग्यरित्या केल्यास यामुळे रुग्णाच्या जीवालाही धोका निर्माण होऊ शकतो, असा इशारा आरोग्य मंत्रालयाने दिला आहे.
आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी म्हटलं की, प्लाझ्मा थेरपीवर बरीच चर्चा सुरु आहे. कोविड 19 साठी देशात काय तर जगभरात कोणतीही मान्यताप्राप्त थेरपी नाही. प्लाझ्मा थेरपीबद्दल कोणताही पुरावा सध्यातरी नाही की, त्याचा उपयोग कोरोनावर उपचार करण्यासाठी केला जाऊ शकतो. प्लाझ्मा थेरपी याबाबतीत अजूनही प्रायोगिक स्तरावर आहे. याबाबत आयसीएमआर (इंडियन काऊंसिल ऑफ मेडिकल रिसर्च) अभ्यास करत आहे. म्हणून हे महत्वाचे आहे की जोपर्यंत आयसीएमआर अभ्यास पूर्ण करत नाही, तोपर्यंत प्लाझ्मा थेरपीचा केवळ संशोधन किंवा चाचणीसाठीच वापर करावा. प्लाझ्मा थेरपी योग्यरित्या वापरत नसाल तर ते आपल्या जीवाला धोका देऊ शकते.
कोरोनाची देशभरातील आकडेवारी
गेल्या 24 तासांत कोरोनाबाधित 1543 रुग्ण आढळले आहेत. यासह देशात कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांची संख्या 29 हजार 435 वर पोहोचली आहे. आतापर्यंत कोरोनाबाधित 6 हजार 868 रुग्ण बरे झाले आहेत. बरे झालेल्या रुग्णांची संख्या 23.3 टक्के आहे. तर आतापर्यंत 934 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे, अशी माहिती लव अग्रवाल यांनी दिली.
देशभरात कोविड 19 या विषाणुंच्या प्रादुर्भावामुळे आतापर्यंत 937 जणांचा बळी गेला असून विषाणुंचा यशस्वी मुकाबला करुन बरे होणाऱ्यांची संख्या ही जवळपास 7026 आहे. म्हणजेच कोरोना विषाणुंच्या प्रादुर्भावातून बरे होण्याचा वेग कालच्या तुलनेत सुधारला आहे. आजच्या आकडेवारीनुसार हा रिकव्हरी दर 23.3 टक्के असल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केलंय. तसेच देशातल्या 17 जिल्ह्यात गेल्या 28 दिवसापासून एकही कोविड 19 चा रुग्ण आढळला नसल्याचंही केंद्रीय मंत्रालयाच्या आजच्या पत्रकार परिषदेत स्पष्ट करण्यात आलं.
देशात आता कोरोना व्हायरस विषाणुने बाधित रुग्णांची एकूण संख्या 29,974 असून त्यातून मृत 937 आणि बरे झालेले 7027 वगळले तर प्रत्यक्षात उपचार सुरु असलेले फक्त 22010 कोरोनाबाधित रुग्ण असल्याचंही आजच्या पत्रकार परिषदेत स्पष्ट करण्यात आलं. निती आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, देशभरातील सर्वाधिक रुग्णसंख्या असलेल्या 15 प्रमुख ठिकाणे केंद्र सरकारने निश्चित केले असून त्या ठिकाणच्या कोविड 19 च्या साथीवर कसं नियंत्रण मिळवलं जातं, यावर भारतातील कोरोना व्हायरसचं भवितव्य अवलंबून असेल. देशातील या 15 ठिकाणांमध्ये मुंबई, पुणे, अहमदाबाद, हैदराबाद, जयपूर, इंदूर आणि दिल्ली यासारख्या शहरांचा समावेश आहे. त्याशिवाय गंभीर स्थिती असलेल्या शहरांमध्ये ठाणे, बडोदा, कर्नूल, भोपाळ, जोधपूर, आग्रा, चेन्नई आणि सूरत या शहरांचा समावेश आहे.संबंधित बातम्या
- मुंबईतील इंटिरियर डिझायनरकडून कोरोना तपासणीसाठी 'स्मार्ट ओपीडी सिस्टिम'ची निर्मिती
- Lockdown | 10 मे पर्यंत राज्यातील परीक्षांचं चित्र स्पष्ट होईल : सुप्रिया सुळे
- 55 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना घरातच थांबण्याचे निर्देश