(Source: ECI/ABP News/ABP Majha)
COVID-19 | भारतातील 'या' 7 राज्यांमध्ये कोरोनाचा प्रादू्र्भाव नियंत्रणात; आतापर्यंत एकही मृत्यू नाही
एकीकडे भारतातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. तर दुसरीकडे देशातील काही राज्यांना कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात यश आलं आहे.
नवी दिल्ली : देशात कोरोना बाधितांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. एकीकडे देशातील कोरोनाचा प्रादूर्भाव वाढत आहे, तर दुसरीकडे अशीही काही राज्य आणि केंद्र शासित प्रदेश आहेत, ज्यांमध्ये कोरोनाचा प्रादूर्भाव अजिबात दिसून येत नाही. तसेच कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्याही जास्त आहे. देशात अशी एकूण सात राज्य आहेत, जिथे एकूण कोरोना बाधितांची संख्या फक्त 40 आहे. तसेच या सात राज्यांमध्ये आतापर्यंत कोरोनामुळे एकही मृत्यू झालेला नाही.
ज्या सात राज्यांमध्ये सध्या कोरोनाची स्थिती नियंत्रणात आहे त्या राज्यांमध्ये अरुणाचल प्रदेश, गोवा, लदाख, मणिपूर, मिझोरम, पद्दुचेरी आणि त्रिपुरा यांचा समावेश होतो. या सर्व राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांमध्ये परिस्थिती इतर राज्यांच्या तुलनेत नियंत्रणात आहे.
पाहा व्हिडीओ : स्थानिक प्रशासन,राज्य सरकार आपल्या जबाबदारीचं पालन करत आहेत : पंतप्रधान मोदी
अरुणाचल प्रदेश आणि मिझोरममध्ये आतापर्यंत प्रत्येकी एक कोरोनाग्रस्त आढळून आला आहे. तर अरुणाचल प्रदेशमध्ये ज्या व्यक्तीला कोरोनाची लागण झाली होती, त्यालाही कोरोनामुक्त करण्यात यश आलं आहे. तर मणिपूर आणि त्रिपुरामध्ये प्रत्येकी दोन रूग्ण समोर आले आहेत. आता या दोन्ही राज्यांमध्ये एकही कोरोना बाधित रूग्ण नाही.
जगभरातील पर्यटकांचं आकर्षण असलेल्या गोव्यात एकूण 7 रूग्ण आढळून आले होते. परंतु, आता हे सातही रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर गोव्यामध्ये आता कोणीही कोरोना बाधित रूग्ण नाही. पद्दुचेरीमध्ये एकूण 7 कोरोनाग्रस्त रूग्ण होते, त्यातील 3 जण कोरोनामुक्त झाले आहेत. याव्यतिरिक्त लदाखमध्ये 20 लोकांना या व्हायरसचा संसर्ग झाला होता. परंतु, आतापर्यंत 14 लोक पुर्णपणे बरे होऊन आपल्या घरी परतले आहेत.
Narendra Modi | ... म्हणून जगभरात भारताचं कौतुक होतंय : पंतप्रधान मोदी
देशभरातील या सात राज्यांमध्ये देशातील इतर राज्यांच्या तुलनेत परिस्थिती नियंत्रणात आहे. या राज्यांतील सरकारनेही कोरोनाशी लढण्यासाठी पूर्णपणे तयारी केली आहे. तर केंद्र सरकारकडून लॉकडाऊनचं सक्तीने पालन करण्यासाठी देण्यात आलेल्या नियमांचंही सक्तीने पालन केलं जात आहे. सध्या देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 28 हजारांजवळ पोहोचला असून आतापर्यंत 826 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर 5913 लोक कोरोनामुक्त झाले आहेत.
संबंधित बातम्या :
देशात कोरोनाबाधित रुग्ण सापडण्याचा वेग मंदावला; डबलिंगही तब्बल 9 दिवसांवर Coronavirus | विद्यार्थ्यांना दिलासा, IIT, IIIT ची ट्यूशन फी यंदा वाढणार नाही!