Coronavirus | 90 टक्के मृत्यू हे 45 वर्षावरचे तर 50 टक्के नागरिक मास्क वापरत नाहीत, केंद्र सरकारच्या अहवालातून स्पष्ट
कोरोनामुळे (Corona) झालेल्या मृत्यूपैकी 90 टक्के मृत्यू हे 45 वर्षावरील आहेत तर 50 टक्के लोक मास्क वापरत नाहीत, तसेच अनेकजण कोरोनाच्या नियमांचे पालन करत नाहीत असं केंद्र सरकारच्या अहवालात मांडण्यात आलंय.
नवी दिल्ली : देशात आतापर्यंत कोरोनामुळे जेवढे मृत्यू झाले आहेत त्यापैकी 90 टक्के मृत्यू हे 45 वर्षावरील व्यक्तींचे आहेत. तसेच देशातल्या 90 टक्के लोकांना मास्क घालण्याचे महत्व माहीत असूनही केवळ 44 टक्केच लोक मास्कचा नियमित वापर करतात असं केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या एका सर्व्हेमध्ये सांगितलंय. गर्दी टाळणे, मास्कचा वापर करणे या नियमांचे काटेकोरपणे पालन नागरिकांकडून केलं जात नाही असंही या अहवालात सांगण्यात आलं आहे.
देशातल्या कोरोनाचा सर्वाधिक प्रादुर्भाव असलेल्या 12 राज्यांतील अधिकारी आणि 46 जिल्ह्यांतील जिल्हाधिकाऱ्यांची एक बैठक केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यावेळी या सर्व गोष्टींवर चिंता व्यक्त करण्यात आली. या 12 राज्यांत महाराष्ट्र, गुजरात, हरियाणा, तामिळनाडू, छत्तीसगड, मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल, दिल्ली, जम्मू काश्मिर, कर्नाटक, पंजाब आणि बिहार या राज्यांचा समावेश आहे.
देशातील केवळ 46 जिल्ह्यांत 71 टक्के कोरोनाचे रुग्ण आढळतात आणि 69 टक्के मृत्यूही याच 46 जिल्ह्यांत झाल्याचं दिसून आलंय.
गेल्या काही दिवसात देशात पुन्हा एकदा कोरोनाच्या रुग्णसंख्येत भर पडल्याचं पहायला मिळतंय. गेल्या 24 तासात देशात कोरोनाचे 62,258 नवे रुग्ण पहायला मिळाले. महाराष्ट्रात 36,902 तर पंजाबमध्ये 3,122 आणि छत्तीसगडमध्ये 2,665 रुग्ण पहायला मिळालंय.
कोरोनाचा एक रुग्णाच्या संपर्कात आल्यामुळे 30 दिवसात 406 नवे रुग्ण तयार होतायत असं केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचा अहवाल सांगतोय.
देशात आतापर्यंत जवळपास सहा कोटी लोकांना कोरोनाची लस देण्यात आली असून लसीकरणाच्या संख्येच्या बाबतीत भारताचा जगात तिसरा क्रमांक लागतोय. पहिल्या क्रमांकावर अमेरिका तर दुसऱ्या क्रमांकावर चीन आहे. सर्व राज्यांनी आपल्या कोरोनाच्या चाचणींची संख्या वाढवावी असं केंद्र सरकारने सर्व राज्यांना निर्देश दिले आहेत.
राज्यांनी होळी, शब-ई-बरात आणि इस्टरच्या सणांचा विचार करता कोरोनाच्या नियमांची कडक अंमलबजावणी करावी असे निर्देश केंद्र सरकारने सर्व राज्यांना दिले आहेत. केवळ कोरोनाच्या नियमांची कडक अंमलबजावणी केल्यास 70 टक्के कोरोना नियंत्रणात येऊ शकतो असं केंद्र सरकारच्या वतीनं राज्यांना सांगण्यात आलंय.
महत्वाच्या बातम्या :