Omicron Variant : भारतात ओमायक्रॉननं वाढवली धास्ती; लसीचा बुस्टर डोस आवश्यक? NITI Aayog म्हणतंय...
Omicron Variant : बंगळुरुमध्ये कोरोनाचा नवा व्हेरियंट ओमायक्रॉनचे दोन रुग्ण आढळले आहेत. तेव्हापासूनच चिंता वाढली आहे.
Omicron Variant : कोरोनाच्या नव्या व्हेरियंटनं संपूर्ण जगाची धाकधुक वाढवली आहे. अशातच भारतात कोरोनाचा नवा व्हेरियंट ओमायक्रॉन (Omicron) शिरकाव केला आहे. बंगळुरूमध्ये दोन जणांना नव्या व्हेरियंटची लागण झाल्याचं निष्पन्न झालं आहे. कोरोनाचा नवा व्हेरियंट ओमायक्रॉनमुळे लसीकरणात काही बदल करण्याची गरज आहे का? कोरोना लसीचा बुस्टर डोस किंवा तिसऱ्या डोसची गरज आहे का? लहान मुलांचं लसीकरण सुरु झालेलं नाही, त्यामुळे या व्हायरसपासून बचाव करण्यासाठी त्यांचं लसीकरण तात्काळ सुरु करण्याची गरज आहे का? यांसारखे अनेक प्रश्न सध्या उपस्थित करण्यात येत आहेत.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं जारी केलेल्या आकडेवारीनुसार, कोरोनाच्या नव्या व्हेरियंटबाबत अद्याप फारशी माहिती कळालेली नाही. जगभरातील शास्त्रज्ञ या व्हायरससंदर्भात अधिक माहिती मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. अशातच लसीकरणाबाबतचे निर्णय विज्ञान आणि वैज्ञानिक निकशांच्या आधारावर घेतले जातात. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानुसार, आतापर्यंत या व्हायरसबाबत मिळालेली माहिती पुरेशी नाही. याबाबत अधिक माहिती मिळवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. अशातच लसीचा आणखी एक डोस किंवा बुस्टर डोस डोस द्यावा की, नाही? याबाबतही ठामपणे काहीच सांगणं अशक्य आहे. लस किंवा उपचाराबाबत असे निर्णय सर्व पैलू, वैज्ञानिक पुरावे, संशोधन लक्षात घेऊन घेतले जातात.
नीति आयोगाचे सदस्य व्ही. के. पॉल यांची महत्त्वाची माहिती
नीति आयोगाचे सदस्य व्ही. के. पॉल यांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे, ओमायक्रॉनची वैशिष्ट्ये, त्याचा प्रभाव, त्याचे परिणाम हे सर्व सध्या पाहिले जात असून समजून घेतलं जात आहे. आज देशातच नाहीतर संपूर्ण जगात यामुळे लसीकरण किंवा उपचारांवर कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. आम्ही तुम्हाला जे सांगितलं ती सध्याची परिस्थिती आहे. व्हेरियंटबद्दल आणखी काही माहिती आल्यावर त्यावर निर्णय घेणे योग्य ठरेल.
व्ही. के. पॉल म्हणाले की, "लहान मुलांच्या लसीकरणावर सरकारचं म्हणणं आहे की, याबाबतचा कोणताही निर्णय वैज्ञानिक निकशांच्या आधारावर घेण्यात यावा, तेव्हाच जेव्हा संपूर्ण माहिती आपल्या हाती असेल. केवळ चिंतेचे स्वरूप घोषित करून असे निर्णय घाईघाईने घेतले जाऊ शकत नाहीत. हा एवढा मोठा निर्णय आहे की, यामुळे रणनीती कोणत्या दिशेने जाते, बूस्टर डोससाठी त्याचा परिणाम काय आहे, हे सर्व अभ्यास, त्याच्या वैज्ञानिक पैलूंचा बारकाईने अभ्यास करून, त्यावर बारीक लक्ष ठेवून काम सुरु आहे. याची तांत्रिक आणि वैज्ञानिक वर्तुळात चर्चा आहे. या सर्व गोष्टींवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. त्यामुळे समोर येणार्या वैज्ञानिक तथ्यांच्या आधारे निर्णय घेतला जाईल.
भारतात ओमिक्रॉन व्हेरियंटचा शिरकाव, कर्नाटकात व्हेरियंटचे दोन रुग्ण
गेल्या दोन वर्षांपासून कोरोना महामारीच्या (coronavirus) संकटाची चिंता सतावत असतानाच आता कोरोनाच्या नव्या ओमायक्रॉन व्हेरियंटने (omicron variant) आणखी चिंतेत भर घातली आहे. देशात ओमिक्रॉन व्हेरिएंटता शिरकाव झाला असून कर्नाटकात ओमिक्रॉनचे दोन रुग्ण आढळले आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आज पत्रकार परिषदेत ही बातमी दिली आहे.
आरोग्य मंत्रालयाच्या लव अग्रवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, जगातील 29 देशात 373 ओमायक्रॉनचे रुग्ण आढळले आहे. ओमायक्रॉन व्हेरियंट बीटा आणि डेल्टा व्हेरियंटपेक्षा जास्त वेगाने पसरत आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार, ओमायक्रॉनचे व्हेरियंटमध्ये आतापर्यंत 42 ते 52 म्युटेशन आढळळे आहे. आतापर्यंत आलेल्या अहवाला नुसार हा ओमायक्रॉनचा व्हेरियंट जास्त तीव्रतेचा नाही.
महत्त्वाच्या इतर बातम्या :