(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Covaxin : कोवॅक्सिन घेतलेल्या भारतीयांच्या आंतरराष्ट्रीय प्रवासाला ब्रेक? WHO कडून आपत्कालीन लसींच्या यादीत समावेश नाही
यामध्ये बहुतांश राष्ट्रांनी कोरोनाच्या लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी देशात प्रवेश देण्यास मान्यता दिली आहे. पण...
Covaxin : कोरोना विषाणूचा संसर्ग फोफावत असल्याचं पाहून अनेक राष्ट्रांनी प्रतिबंधात्मक लसींचा वापर वाढवत लसीकरण मोहिमेला वेग दिला. यानंतर आता काही देशांमध्ये कोरोना बऱ्याच अंशी नियंत्रणात येत असल्याचं पाहायला मिळत आहे. याच धर्तीवर आता काही राष्ट्रांनी सशर्त आंतरराष्ट्रीय प्रवासास मान्यता दिली आहे. यामध्ये बहुतांश राष्ट्रांनी कोरोनाच्या लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी देशात प्रवेश देण्यास मान्यता दिली आहे. पण, भारतामध्ये भारत बायोटेकनं तयार केलेल्या कोवॅक्सिन या लसीचे दोन्हीही डोस घेतलेल्यांना मात्र यापासून मुकावं लागू शकतं. किमान काही महिनेतरी कोवॅक्सिन घेतलेल्यांना आंतरराष्ट्रीय प्रवास शक्य नसल्याचंच चित्र सध्या स्पष्ट दिसत आहे.
कोवॅक्सिनची लस घेतलेल्यांना आंतरराष्ट्रीय प्रवासाची मुभा न मिळण्यामागे महत्त्वाचं कारण आहे. बहुतांश देशांमध्ये त्यांच्या प्रशासनानं मान्यता दिलेल्या किंवा जागतिक आरोग्य संघटनेकडून मान्यता मिळत आपत्कालीन वापरासाठीच्या यादीत समाविष्ट करण्यात आलेल्या लसी घेतलेल्या प्रवाशांना प्राधान्य देण्यात येत आहे. पण, जागतिक आरोग्य संघटना अर्थात डब्ल्यूएचओच्या यादीत अद्यापही कोवॅक्सिनचा समावेश करण्यात आलेला नाही. त्यामुळंच ही अडचण उदभवत आहे.
Travel News : कोरोना काळातही तुम्ही कोणत्या देशांत प्रवास करु शकता?
आतापर्यंत WHO च्या यादीत सीरम इन्स्टिट्युट ऑफ इंडियाची कोविशील्ड, मॉडर्ना, फायझर, अस्ट्राझेन्का, (अमेरिका आणि नेदरलँड्समध्ये) जेन्सेन, सिनोफार्म/ बीबीआयपी अशा लसींचा समावेश करण्यात आला आहे. पण, यामध्ये कुठेही कोवॅक्सिनची वर्णी लागलेली नाही. जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार भारत बायोटेकनं या यादीत आपल्या लसीचा समावेश करण्यासाठी पुढाकार घेतला आहे, पण अद्यापही काही महत्त्वाची माहिती आवश्यक असल्याचं म्हटलं जातं आहे.
मे महिन्याच्या अखेरीस किंवा जून महिन्यात याचसंदर्भात एक महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. ज्यानंतर कंपनी जागतिक आरोग्य संघटनेकडे डोसियर देणार. प्रत्येक पायरीमध्ये काही आठवड्यांचा कालावधी लागू शकतो. त्यामुळं किमान काही आठवडे तरी कोवॅक्सिन घेतलेल्या भारतीयांच्या आंतरराष्ट्रीय प्रवासावर बंधनं असणार आहेत.