Travel News : कोरोना काळातही तुम्ही कोणत्या देशांत प्रवास करु शकता?
आता कधी एकदा नियम शिथील होऊन आपण घराबाहेर पडतो आणि कधी प्रवास करु लागतो याकडेच सर्वजण डोळे लावून आहेत.
नवी दिल्ली : कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग सध्या अनेकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. असतं असतानाच देशातील कोरोनाबाधिकांचा आकडाही ही चिंता वाढवून जात आहे. कोरोनाच्या भीतीमुळं मागच्या वर्षीपासून सुरू असणारं लॉकडाऊन यंदाच्या वर्षीही सुरुच आहे, त्यामुळं आता कधी एकदा नियम शिथील होऊन आपण घराबाहेर पडतो आणि कधी प्रवास करु लागतो याकडेच सर्वजण डोळे लावून आहेत.
भारतात कोरोनाचं संकट काहीसं गंभीर असलं तरीही इतर राष्ट्रांमध्ये परिस्थिती नियंत्रणात आली असून, तेथे आता आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी देशांच्या सीमा काही प्रमाणात किंवा काही ठिकाणी पूर्णपणे खुल्या करण्यात आल्या आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रवास हा पूर्ववत नसणार हे मान्य, पण हा संसर्ग नियंत्रणात येत असल्याचं पाहून सर्वच नियमांचं पालन करत काही देश पर्यटन व्यवसायाला पुन्हा झळाली देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचं दिसत आहे. चला तर मग पाहूया अशाच देशांची यादी...
मालदीव- मालदीवमध्ये दक्षिण आशियाई देश वगळता इतर राष्ट्रांतील प्रवाशांना परवानगी देण्यात आली आहे. दक्षिण आशियाई देशांमध्ये भारत, नेपाळ, भूटान, अफगाणिस्तान, बांगलादेश, पाकिस्तान आणि श्रीलंका या देशांचा समावेश आहे. शिवाय मागील 14 दिवसांत या देशातून प्रवास केलेल्यांसाठीही हे नियम लागू आहेत. इतरत्र देशातून येणाऱ्या प्रवाशांसाठी इथे कोविड चाचणीचा निगेटीव्ह अहवाल आवश्यक असणार आहे, तर युके मधून प्रवास करणाऱ्यांना इथं 10 दिवस विलगीकरणात रहावं लागणार आहे.
थायलंड- थायलंडमध्ये प्रवासास अनुमती देण्यात आली असली तरीही इथे 14 दिवसांच्या विलगीकरणाचा नियम आहे.
SEYCHELLES- SEYCHELLES मध्ये लसीकरणाचे दोन्ही डोस घेतलेल्या आणि लसीकरणाला दोन आठवडे उलटून गेलेल्या प्रवाशांना इथं परवानगी देण्यात आली आहे. इथं येणाऱ्या प्रवाशांना आरटीपीसीआर चाचणीचा निगेटीव्ह अहवाल मात्र बंधनकारक असणार आहे.
ग्रीस - 14 मे पासून ग्रीसनं आंतरराष्ट्री प्रवाशांसाठी देशाच्या सीमा खुल्या केल्या. समुद्रकिनारे, संग्रहालयं इथे देशाकडून चाचणी आणि लसीकरण मोहिमही राबवण्यात येत आहे. इथे येणाऱ्या प्रवाशांसाठी पूर्ण लसीकरण आणि आरटीपीसीआर चाचणीचा निगेटीव्ह अहवाल आवश्यक असणार आहे.
ऑस्ट्रीया- 19 मे पासून ऑस्ट्रियामध्ये निर्बंध शिथिल करण्यात येत आहेत. इथं ऑस्ट्रेलिया, आयलंड, न्यूझीलंड, सिंगापूर, दक्षिण कोरिया या देशातील प्रवाशांना प्रवेश देण्यात येत आहे.
युके- red, green आणि amber अशा विभागांमध्ये देशातील परिसराची विभागणी केल्यानंतर युकेमध्येही प्रवासाची मुभा देण्यात येण्याची शक्यता आहे. तुर्तास रेड झोनमध्ये येणाऱ्या आणि युकेचं नागरिकत्त्व असणाऱ्या कोणाही व्यक्तीला देशात यायचं झाल्यास त्यांना हॉटेलमध्ये विलगीकरणात रहावं लागत आहे शिवाय दोनदा कोरोना चाचणीही करावी लागत आहे. रेड झोनमध्ये भारत, दक्षिण आफ्रिका, नांबिया, युएई या देशांचा समावेश आहे. ग्रीन झोन मधील देशांतून नागरिक युकेमध्ये येत असल्यास तिथं येण्याआधी 2 दिवसांपूर्वीचा कोरोना चाचणी अहवाल आवश्यक असणार आहे.
या देशांव्यतिरिक्त इटली, क्रोएशिया, टर्की, माल्टा यांसारख्या देशांतही काही निर्बंधांसह आंतरराष्ट्रीय प्रवाशांना परवानगी देण्यात आली आहे. काही देशांमध्ये विलगीकरणाचे नियम कठोर आहेत, तर कुठे कोरोना चाचणी अनिवार्य आहे. दक्षिण आशियाई देशांतून येणाऱ्या प्रवाशांना काही अधिक प्रमाणात या निर्बंधांचं पालन करावं लागणार आहे हे मात्र सध्या स्पष्ट होत आहे.
(कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बदलण्याऱ्या नियमांमुळं या देशांतही नियम बदलले जाऊ शकतात)