Covid-19 : वाढता धोका! देशात 20 हजार 557 नवीन कोरोनाबाधित, 44 रुग्णांचा मृत्यू
Coronavirus Cases in India : देशातील कोरोनाचा आलेख वाढत आहे. गेल्या 24 तासांत देशात 20 हजार 557 नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाली असून 44 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
Coronavirus Cases in India : देशातील एकीकडे कोरोनाचा आलेख वाढत आहे, तर दुसरीकडे मंकीपॉक्स विषाणूचा संसर्गही वाढतोय. गेल्या 24 तासांत देशात 20 हजार 557 नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाली असून बुधवारी 44 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. हे प्रमाण आधीच्या दिवसाच्या तुलनेत अधिक आहे. आधीच्या दिवशी म्हणजे मंगळवारी 18 हजार 313 कोरोना रुग्णांची नोंद आणि 57 रुग्णांचा मृत्यू झाला होता. देशात बुधवारी दिवसभरात 19 हजार 216 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
नव्या रुग्णांच्या तुलनेत मृत्यूचे प्रमाण घटले
देशात नवीन कोरोनाबाधितांच्या तुलनेत मृत्यूचं प्रमाण घटलं आहे. मंगळवारी दिवसभरात 57 रुग्णांचा मृत्यू झाला होता, तर बुधवारी दिवसभरात 44 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मृत्यूच्या प्रमाणात किंचित घट झाली आहे. देशातील सक्रिय रुग्णांची संख्या 1 लाख 46 हजार 323 इतकी झाली आहे. सध्या देशातील सक्रिय रुग्णांचे प्रमाण 0.33 टक्के आहे. देशातील कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.47 टक्के आहे.
#AmritMahotsav#Unite2FightCorona#LargestVaccineDrive
— Ministry of Health (@MoHFW_INDIA) July 28, 2022
𝗖𝗢𝗩𝗜𝗗 𝗙𝗟𝗔𝗦𝗛https://t.co/GZsSFIiEaC pic.twitter.com/VOSgooUiXu
महाराष्ट्रात बुधवारी 2138 कोरोना रुग्णांची नोंद
राज्यात बुधवारी 2138 कोरोनाच्या नव्या रुग्णांची भर पडली आहे. तर बुधवारी दिवसभरात एकूण 2269 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. नव्याने नोंद झालेल्या रुग्णांपैकी सर्वाधिक रुग्ण हे पुणे जिल्ह्यातील आहे. महाराष्ट्रात बुधवारी दिवसभरात आठ कोरोनाबाधित मृत्यूची नोंद झाली आहे. राज्यातील मृत्यूदर हा 1.84 टक्के इतका झाला. तर आतापर्यंत राज्यामध्ये 78,77,288 कोरोनाबाधित बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे कोरोना रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 97.98 टक्के इतकं झालं आहे.
मुंबईतील सर्वात मोठी कोविड सेंटर्स बंद होणार
मुंबईमधील मोठी कोविड सेंटर बंद करण्याचा निर्णय पालिकेनं घेतला आहे. कोरोना रुग्णांची संख्या घटल्यामुळे ‘जम्बो सेंटर’ बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पहिल्या टप्प्यात तीन केंद्रे यापूर्वीच बंद करण्यात आली आहेत. तर दुस-या टप्प्यात आता पाच केंद्रे बंद करणार आहेत. मात्र, सेव्हन हिल्स रुग्णालयासह विविध रुग्णालयांमध्ये ‘कोविड’ उपचार सुविधा कार्यरत राहणार आहे. वांद्रे - कुर्ला संकुल, रिचर्डसन्स ऍण्ड क्रुडास भायखळा, रिचर्डसन्स ऍण्ड क्रुडास मुलुंड, एन. एस. सी. आय. वरळी आणि मालाड येथील ‘जम्बो कोविड केअर केंद्रे’ बंद करण्याचा निर्णय पालिकेनं घेतला आहे.