(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Corona Vaccine | केरळपाठोपाठ आता बिहारमध्येही मोफत कोरोना लस; मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
नितीश कुमार यांच्या मंत्रिमंडळ बैठकीनंतर हे स्पष्ट झालं आहे की बिहारमधील सामान्य लोकांना विनामूल्य कोरोनाची लस दिली जाणार आहे. आता लवकरच संबंधित विभागातून त्यासंबंधीत अधिसूचना जारी करण्यात येईल.
बिहार : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी मंगळवारी एक मोठा निर्णय घेतला आहे आहे. बिहार सरकारकडून राज्यातील जनतेला कोरोना विषाणूची लस विनाशुल्क दिली जाणार आहे. मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत 15 महत्त्वपूर्ण निर्णयांना मान्यता देण्यात आली. या बैठकीत नितीश सरकारच्या पुढील पंचवार्षिक कार्यक्रमाच्या योजनेस मान्यता देण्यात आली. या बैठकीत एनडीएने निवडणुकीत दिलेली आश्वासने पूर्ण करण्यासंदर्भात मंजूरी देण्यात आली.
मंत्रिमंडळाच्या या बैठकीत मोफत कोरोना लस, शिक्षण आणि तरूणांचे रोजगार, पदवी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना 50 हजार रुपये प्रोत्साहन रक्कम, जन्मत: हृदयात छिद्र असलेल्या लहान मुलांवर विनामूल्य उपचार यांसारखे महत्वाचे निर्णय घेण्यात आले.
नितीश कुमार यांच्या मंत्रिमंडळ बैठकीनंतर हे स्पष्ट झालं आहे की बिहारमधील सामान्य लोकांना विनामूल्य कोरोनाची लस दिली जाणार आहे. आता लवकरच संबंधित विभागातून त्यासंबंधीत अधिसूचना जारी करण्यात येईल.
बिहारच्या जनतेसाठी घेतलेले महत्त्वपूर्ण निर्णय
- मोफत कोरोना लस
- 20 लाखाहून अधिक लोकांना रोजगार
- प्रत्येक जिल्ह्यात एक मेगा स्किल सेंटर
- प्रत्येक शेतात सिंचनासाठी पाणी
- रस्त्यांवर सौर उर्जेवर चालणारे दिवे
- तांत्रिक शिक्षण हिंदी भाषेतही उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न
- प्रत्येक विभागातील साधन कक्ष व प्रशिक्षण केंद्र
- राजगीरमध्ये क्रीडा विद्यापीठाची स्थापना
- उत्तम तंत्रज्ञानाचा वापर करत सर्व शहरांमध्ये ओला आणि सुका कचरा व्यवस्थापनाची व्यवस्था
केरळमध्ये कोरोना लस मोफत दिली जाणार; मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांची घोषणा
केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी आज एक मोठी घोषणा केली आहे. कोरोना विषाणूची लस राज्यातील लोकांना विनाशुल्क दिली जाणार आहे. अनेक लसी उत्पादकांनी लसीच्या तातडीच्या वापरासाठी डीसीजीआयकडे परवानगी मागितली आहे. मात्र, अद्यापपर्यंत सरकारने कोणत्याही लसीला ग्रीन सिग्नल दिला नाही.
भारतात 8 कोरोना लसींवर क्लिनिकल ट्रायल सुरु
जगभरातील सर्वच लोक कोरोना व्हायरसवरील प्रभावी लसीकडे डोळे लावून बसले आहेत. अनेक देशांमध्ये कोरोनाच्या लसीकरणालाही सुरुवात झाली आहे. अशातच सर्व देशांचं लक्षं भारताकडे लागलं आहे. भारतात पुढिल काही दिवसांतच कोरोना वॅक्सिनच्या आपत्कालीन वापरासाठी मंजूरी दिली जाऊ शकते. भारतीय ड्रग्ज कंट्रोलरच्या वतीने देण्यात आलेल्या माहितीनुसार, कमीत कमी तीन वॅक्सिन आपत्कालीन वापरासाठी मंजूरी देण्यासाठी विचारात घेतल्या जात आहेत. पुण्यातील सीरम इंस्टिट्यूट आणि हैदराबादची औषध कंपनी भारत बायोटेकनं याआधीच ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (डीसीजीआय) कडे कोरोना लसीच्या आपत्कालीन वापरासाठी परवानगी मागितली आहे.
भारतात कोविड-19 वॅक्सिनच्या ट्रायलसंदर्भात सांगताना केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी सांगितलं की, भारतामध्ये 8 कोरोना वॅक्सिन वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये आहेत. एक कोविशिल्ड आहे, जी एस्ट्रेजेनिकाच्या सहयोगाने सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया तयार करत आहे. या लसीच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यांतील चाचणी सध्या सुरु आहे. सीरम इन्स्टिट्यूटच्या वतीने केंद्र सरकारकडे लसीच्या आपत्कालीन वापरासाठी परवानगी मागण्यात आली आहे.
संबंधित बातम्या :