Corona Vaccination: कोणत्या कंपनीची कोरोना लस घ्यायची हा अधिकार नागरिकांना आहे का? सरकारचं उत्तर...
देशात सध्या 'कोविशिल्ड' आणि 'कोवॅक्सीन' या दोन लसीला DCGIने मान्यता दिली आहे.
नवी दिल्ली : देशात कोरोना लसीकरण सुरू होण्यास आता काही तास शिल्लक आहेत. आतापर्यंत देशातील विविध शहरांमध्ये लसीची पहिली बॅच देशातील 14 ठिकाणी पोहोचली आहे. देशात सध्या 'कोविशिल्ड' आणि 'कोवॅक्सीन' या दोन लसीला DCGIने मान्यता दिली आहे. दरम्यान, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाला विचारण्यात आले की, राज्यांना किंवा नागरिकांना दोन्ही लसांपैकी कोणतीही एक लस निवडता येणार आहे का?
या प्रश्नाचं उत्तर देताना केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण म्हणाले की, जगातील अनेक देशांमध्ये एकाच वेळी वेगळवेगळ्या लसी उपलब्ध आहेत. परंतु जगात कुठेही लाभार्थ्याला त्याच्या आवडीची लस घेण्याचा पर्याय मिळत नाही. म्हणजेच मिळेत ती लस घ्यावी लागणार आहे, त्यासाठी पर्याय दिला जाणार नाही.
कोरोना लसीचा डोस घेतल्यानंतर 14 दिवसांनी त्याचा परिणाम दिसून येईल. कोविड 19 च्या संदर्भात लोकांनी मार्गदर्शक सूचनांचं पालन करण्याचं आवाहनही आरोग्य मंत्रालयाने यावेळी केले. देशात दोन लसींना परवानगी देण्यात आली आहे तर इतर चार लसींना लवकरच मंजुरी दिली जाऊ शकते. या लसी लवकरच वापरासाठी उपलब्ध होतील, अशी माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली.
पुण्याहून कोरोना वॅक्सिनची पहिली बॅच रवाना; देशभरातील 13 ठिकाणी आज लस पोहोचवणार
आरोग्य मंत्रालयाचे सचिव राजेश भूषण पुढे म्हणाले की, कोविड 19 च्या संसर्गाची स्थिती जगभर चिंताजनक आहे, मात्र भारतात कोरोनाच्या रुग्णांमध्ये दिवसेंदिवस घट होत आहे. मात्र आपण काळजी घेणे आवश्यक आहे. सद्यस्थितीत देशात 2.2 लाखांपेक्षा कमी अक्टिव्ह रुग्ण आहेत. संपूर्ण देशात केवळ महाराष्ट्र आणि केरळमध्ये 50 हजारांहून अधिक अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.
सरकारकडून कोरोना लसींंच्या 6 कोटी डोसची ऑर्डर; आज गुजरातमध्ये पहिली बॅच होणार दाखल
गेल्या 24 तासांत देशभरात एका दिवसातील नव्या 12,584 रुग्णांची नोंद झाली. 18 जून 2020 रोजी एका दिवसातील नव्या रुग्णांची संख्या 12,881 होती. दैनंदिन मृत्युदरातही सातत्याने घट झाली आहे. गेल्या 24 तासांत 167 दैनंदिन मृत्यूची नोंद झाली. भारतातील सक्रीय रुग्णसंख्या आज 2,16,558 इतकी कमी आहे. एकूण पॉझिटिव्ह प्रकरणांमध्ये सक्रिय रुग्णांचे प्रमाण 2.07% इतके कमी झाले आहे. गेल्या 24 तासांत एकूण सक्रिय प्रकरणांमध्ये, 5,968 ने घट झाली आहे.
पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटमधून कोविशिल्ड लसीच्या पहिल्या बॅचचे ट्रक रवाना