Corona Vaccine : चोरीछुपे कोरोनाचा बूस्टर डोस घेताय? मग इकडे लक्ष द्या, टास्क फोर्स म्हणतंय...
Corona Vaccine : कोरोना लसीचे दोन डोस घेतलेल्या काही नागरिकांनी लसीचा बूस्टर डोस घेतल्याचं समोर येत आहे. लोकांनी घाई गडबड करु नये, चोरीछुपे बूस्टर डोस घेण्याचं टाळावं असं कोविड टास्क फोर्सने म्हटलंय.
हैदराबाद : कोरोनाचे दोन डोस झालेल्यांना आता बुस्टर डोसचे वेध लागल्याचं दिसून येतंय. अमेरिकेसह अनेक देशांनी त्यांच्या नागरिकांना बुस्टर डोस देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे भारतातही कोरोना लसीचे दोन डोस घेतलेल्या लोकांकडून आता चोरीछुपे बुस्टर डोस घेत असल्याचं समोर आलं आहे. त्यावर आता लोकांनी घाई गडबड करु नये, चोरीछुपे बुस्टर डोस घेण्याचं टाळावं असं कोविड टास्क फोर्सच्या वतीनं सांगितलं आहे. या संदर्भात लवकरच धोरण जाहीर केलं जाणार असल्याची माहिती केंद्र सरकारच्या कोविड टास्क फोर्सने दिली आहे.
दोन डोस घेतलेली काही मंडळी भीतीपोटी चोरीछुपे तिसरा डोस घेत असल्याचं निदर्शनास आलं आहे. मात्र हे टाळण्याचं आवाहन टास्क फोर्सनं केलं आहे. कारण अशा प्रकारे चोरीछुपे तिसरा डोस घेणाऱ्यांची सरकारी पातळीवर कुठलीच नोंद ठेवली जात नाही आहे. भारतात सध्या प्रत्येक महिन्याला 30 ते 35 कोटी लसींचं उत्पादन सुरु आहे. त्यामुळं लशीच्या तुटवड्याची भीती न बाळगता तिसऱ्या डोसची घाई करु नका असं आवाहन कोविड टास्क फोर्सनं केलं आहे..
कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन डोस घेतलेल्यांनी बुस्टर डोस, म्हणजेच तिसरा डोस घेणं गरजेचं आहे का? आणि तिसरा डोस घ्यायचा झाला तर कधी घेतला पाहिजे, किती दिवसाच्या अंतरानं घेतला पाहिजे, या सगळ्या संदर्भात लवकरच धोरण जाहीर केलं जाणार आहे. केंद्र सरकारच्या कोविड टास्क फोर्सच्या सदस्यांनी ही माहिती दिली आहे.
देशातील कोरोनाच्या लसीकरणाचा 110 कोटींचा टप्पा पूर्ण झाला आहे. कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांनी आता बुस्टर डोस घ्यावा असं मत अनेकांनी व्यक्त केलं आहे. सिरमच्या सायरस पूनावाला यांनी दुसऱ्या डोसनंतर सहा महिन्यांनी कोविशील्डच्या तिसऱ्या किंवा बूस्टर डोसच्या गरजेवर भर दिला होता.
भविष्यात कोरोना व्हायरसचे अनेक म्युटेशन समोर येतील, अशा परिस्थितीत भारतीयांना कोरोना लसीच्या दुसऱ्या डोससोबतच बूस्टर डोसचीही गरज आहे असं मत अनेक तज्ज्ञांनी या आधीच व्यक्त केलं आहे.
संबंधित बातम्या :