(Source: Poll of Polls)
Sputnik V in India: भारतात स्पुटनिक V लसींचं उत्पादन करणार 'ही' कंपनी, वर्षाला 10 कोटी डोस निर्मितीचं टार्गेट
देशात स्पुटनिक व्ही चे उत्पादन आता सुरु होणार असून रशियाच्या आरडीआयएफच्या सहकार्याने पॅनासिया बायोटेक भारतात स्पुतनिक व्हीची निर्मिती करणार आहेत.
नवी दिल्ली : भारतात लसीकरणाच्या मोहिमेत आता रशियाच्या स्पुटनिक व्ही लसीचा समावेश झाला आहे. नागरिकांना आता रशियाची स्पुटनिक-व्ही लस देखील दिली जाणार आहे. या वर्षी ऑगस्ट महिन्यापासून देशात स्पुटनिकचे उत्पादन सुरू होणार आहे, अशी माहिती रशियामधील भारताचे राजदूत डीबी वेंकटेश वर्मा यांनी दिली होती. देशात स्पुटनिक व्ही चे उत्पादन आता सुरु होणार असून रशियाच्या आरडीआयएफच्या सहकार्याने पॅनासिया बायोटेक भारतात स्पुतनिक व्हीची निर्मिती करणार आहेत. भारतातील पॅनेसिया बायोटेक आता दर वर्षी स्पुटनिक व्ही लसीचे 100 दशलक्ष म्हणजेच 10 कोटी डोस तयार करेल, असं स्पुटनिक कंपनीनं सांगितलं आहे.
वर्मा यांनी सांगितलं होतं की, मे महिन्याच्या अखेरपर्यंत भारताला स्पुतनिकच्या 30 लाख डोसचा पुरवठा करण्यात येणार आहे. जून महिन्यात वाढवून 50 लाखापर्यंत पुरवठा होण्याची अपेक्षा आहे. देशात यावर्षी स्पुटनिक-व्हीच्या 85 कोटीहून अधिक लस तयार केल्या जातील.
भारतात रशियाची लस स्पुटनिक-व्हीची किंमत निश्चित केली गेली आहे. याची किंमत 948 रुपये असेल यावर पाच टक्के जीएसटी लागल्यानंतर त्याच्या एका डोसची किंमत 995 रुपये असेल. रशियन लस स्पुटनिक-व्हीची पहिली खेप 1 मे रोजी भारतात आली. कसौलीच्या सेंट्रल फार्मास्युटिकल लॅबोरेटरीकडून 13 मे 2021 रोजी ही लस मंजूर झाली होती.
कोरोनाव्हायरसच्या संसर्गाविरूद्ध रशियन Sputnik V लस वापरण्यास अधिकृत मान्यता देणारा भारत जगातील 60 वा देश ठरला आहे. जगातील एकूण लोकसंख्येच्या, काही अब्ज किंवा 40 टक्के लोकसंख्या असलेल्या देशांमध्ये आता या लसीच्या वापरास मंजुरी मिळाली आहे.
रशियाची कोरोना लस Sputnik V कोवॅक्सिन आणि कोविशिल्डच्या तुलनेत जास्त परिणामकारक असल्याचा दावा केला जातोय. रशियाच्या गमालेया रिसर्च इन्स्टिट्यूटने दावा केलाय की Sputnik V लस ही 91.6 टक्के प्रभावी आहे. कोविशिल्ड ही 80 टक्के तर कोवॅक्सिन ही 81 टक्के प्रभावी असल्याचं सांगण्यात येतंय. भारतात सध्या या दोन लसींचा वापर कोरोनाच्या लसीकरणाच्या कार्यक्रमामध्ये केला जातोय. या दोन लसींचे महिन्याला सात कोटी डोसचे उत्पादन करण्यात येतंय. Sputnik V लस आल्यानंतर या लसींवरची निर्भरता कमी होईल असंही सांगण्यात येतंय.