(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Corona Vaccination : आता 6 ते 12 वर्षे वयोगटातील मुलांनाही दिली जाणार लस, DCGI कडून COVAXIN ला मान्यता
Corona Vaccination : आता 6 ते 12 वर्षे वयोगटातील मुलांनाही लस दिली जाणार आहे, DCGI कडून COVAXIN ला मान्यता देण्यात आल्याची बातमी समोर येत आहे
Corona Vaccination : देशातील वाढत्या कोरोना प्रकरणांमध्ये, मुलांच्या लसीकरणाशी संबंधित एक चांगली बातमी समोर येत आहे. आता 6 ते 12 वर्षे वयोगटातील मुलांना कोरोनाची लस मिळणार आहे. DCGI कडून कोवॅक्सिनला मान्यता देण्यात आल्याचं समजत आहे.
गेल्या तीन आठवड्यांत मुलांमध्ये फ्लूसारखी लक्षणे
मार्च महिन्याच्या सुरुवातीला 12 ते 15 वर्षे वयोगटातील मुलांना कोविड लसीकरण करण्यात आले होते. आता DCGI ने 6 ते 12 वर्षे वयोगटातील मुलांना कोवॅक्सीन लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोना विषाणूच्या तिसऱ्या लाटेत लहान मुलांवर फारसा परिणाम झाला नाही, परंतु आता लहान मुले देखील कोरोनाचा नवीन प्रकार XE च्या कचाट्यात सापडत आहेत. शाळा सुरू झाल्यानंतर या प्रकरणांमध्ये वाढ होण्याची भीती आहे. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, गेल्या तीन आठवड्यांत मुलांमध्ये फ्लूसारखी लक्षणे वाढली आहेत. त्याचवेळी, मंजुरी मिळाल्यानंतर, सरकार लवकरच एक मार्गदर्शक तत्त्व जारी करणार असल्याचं बोललं जातंय. ज्यामध्ये हे लसीकरण देशात केव्हा आणि कसे सुरू करावे हे सांगितले जाईल.
लहान मुलांमध्ये XE व्हेरिएंटची लक्षणे
देशात सध्या जीवघेण्या कोरोना व्हायरसच्या (Covid-19) प्रादुर्भावात घट झाली आहे. दररोज देशात एक हजारांहून कमी प्रकरणं नोंदवली जात आहेत. त्यानंतर दोन वर्षांनंतर देशातील कोरोनाशी संबंधित सर्व निर्बंध संपले आहेत. तरीही फेस मास्क वापरणं आवश्यक आहे. कोरोनाच्या घटत्या रुग्णसंख्येत कोरोनाच्या XE या नव्या व्हेरियंटनं चिंता वाढवली आहे. दरम्यान, लहान मुलांचा एक मोठा वर्ग अद्याप लसीकरण झाले नसल्यामुळे, त्यांना विषाणूची लागण होण्याची शक्यता आहे. "लहान मुलांमधील लक्षणे साधारणपणे सौम्य असतात आणि त्यात ताप, नाक वाहणे, घसा दुखणे, अंगदुखी आणि कोरडा खोकला यांसारख्या वरच्या श्वसनमार्गाच्या लक्षणांचा समावेश होतो," असे डॉ. अवी कुमार, वरिष्ठ सल्लागार, पल्मोनोलॉजी,यांनी एका खासगी वृत्तपत्राला मुलाखत देताना म्हटले आहे.
चांगले पोषण आणि निरोगी जीवनशैलीची गरज
तज्ज्ञांनी सांगितले की, पालकांनी त्यांच्या मुलांना निरोगी जीवनशैली, वेळेवर खाणे-झोपणे, स्वच्छता पद्धतींचे पालन करणे, तसेच लसीकरणास पात्र असलेल्या मुलांनी ते लवकरात लवकर घ्यावे याची खात्री करणे अत्यंत आवश्यक आहे. पालकांनी आणि शिक्षकांनी चांगले पोषण आणि निरोगी जीवनशैली देण्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे, ज्यामुळे मुलांमध्ये रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होईल. घरामध्ये तसेच शाळेच्या आवारात प्राथमिक स्वच्छतेची काळजी देखील घेतली पाहिजे, ज्यात स्वच्छता आणि हात धुण्याच्या पद्धतींचा समावेश आहे. "हे ओमिक्रॉनचेच उत्परिवर्तन असल्याने, लसीमुळे नवीन प्रकारावर परिणाम होण्याची शक्यता आहे. लसीसाठी पात्र असलेल्या मुलांनी त्यांची लस घेतले पाहिजे, कारण ते या संसर्गाच्या गंभीर स्वरूपापासून संरक्षण करेल,"
गेल्या 24 तासांत 2,483 नवीन कोरोना रुग्णांची नोंद
देशात कोरोनाचा कहर कायम आहे. देशात गेल्या 24 तासांत 2,483 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली असून 1399 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच सोमवारी दिवसभरात 1,970 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. देशातील सक्रिय रुग्णांची संख्या 15 हजार 636 झाली आहे.
आतापर्यंत 187 कोटींहून अधिक लसी देण्यात आल्या
देशव्यापी लसीकरणात आतापर्यंत 187 कोटीहून अधिक कोरोना प्रतिबंधात्मक लसी देण्यात आल्या आहेत. सोमवारी दिवसभरात देशात 22 लाख 83 हजार 224 कोरोना लसी देण्यात आल्या. भारतात आतापर्यंत 187 कोटी 95 लाख 76 हजार 423 कोरोनाच्या लसी देण्यात आल्या आहेत.