Corona Vaccination : कोरोना लसीकरणात भारताने अमेरिकेला मागे टाकलं; 32.36 कोटींचा टप्पा पार
भारताच्या देशव्यापी लसीकरण अभियानाने काल 32.36 कोटींचा टप्पा पार केला. आज सकाळी 7 वाजेपर्यंत उपलब्ध अहवालानुसार 43,21,898 सत्रांमध्ये, एकूण 32,36,63,297 लसी देण्यात आल्या आहेत.
नवी दिल्ली : कोरोनावर मात करायची असेल तर आज लस एकमात्र उपाय आहे. हे सरकारदेखील जाणून आहे. त्यामुळेच तिसऱ्या लाटेच्या भीतीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने लसीकरण मोहिमेचा वेग वाढवला आहे. डिसेंबरच्या आधी देशातील सर्व नागरिकांचं लसीकरण करण्याचं लक्ष ठेवलं आहे. कोरोना लसीकरणात एकूण लसी देण्यासंदर्भात अमेरिकेला मागे टाकत भारताने नवा मैलाचा टप्पा गाठला आहे. भारतात कोरोना लसीकरण अभियानाची सुरुवात 16 जानेवारी 2021 रोजी तर अमेरिकेत लसीकरण अभियानाला 14 डिसेंबर 2020 रोजी सुरुवात झाली.
भारताच्या देशव्यापी लसीकरण अभियानाने काल 32.36 कोटींचा टप्पा पार केला. आज सकाळी 7 वाजेपर्यंत उपलब्ध अहवालानुसार 43,21,898 सत्रांमध्ये, एकूण 32,36,63,297 लसी देण्यात आल्या आहेत. गेल्या 24 तासात 17,21,268 लसी देण्यात आल्या. कोरोना लसीकरणाच्या नव्या टप्प्याला 21 जून 2021रोजी सुरुवात झाली आहे. देशभरात लसीकरणाचा वेग आणि व्याप्ती वाढवण्यासाठी केंद्र सरकार वचनबद्ध आहे.
जगभरात लसीकरणात पुढे असलेले देश
- इंग्लंड- 7 कोटी 67 लाख 74 हजार 990 ( सुरुवात - 8 डिसेंबर 2020 )
- अमेरिका- 32 कोटी 33 लाख 27 हजार 328 ( सुरुवात - 14 डिसेंबर 2020 )
- इटली - 4 कोटी 96 लाख 50 हजार 721 ( सुरुवात - 27 डिसेंबर 2020 )
- जर्मनी - 7 कोटी 14 लाख 37 हजार 514 ( सुरुवात - 27 डिसेंबर 2020 )
- फ्रान्स - 5 कोटी 24 लाख 57 हजार 288 ( सुरुवात - 27 डिसेंबर 2020 )
- भारत - 32 कोटी 36 लाख 63 हजार 297 ( सुरुवात - 16 जानेवारी 2021)
देशातील कोरोनाची सद्यस्थिती
भारतात गेल्या 24 तासात 46,148 नव्या रुग्णांची नोंद झाली. सलग 21 दिवस 1 लाखापेक्षा कमी दैनंदिन रुग्णांची नोंद झाली आहे. भारतात सक्रीय रुग्णसंखेतही सातत्याने घट होत आहे. देशात आज सक्रीय रुग्णसंख्या 5,72,994 इतकी आहे. गेल्या 24 तासात सक्रीय रुग्णसंख्येत एकूण 13,409 इतकी घट झाली असून सध्या देशात केवळ 1.89 टक्के सक्रीय रुग्ण आहेत.
कोविड -19 संसर्गातून मोठ्या प्रमाणावर रुग्ण बरे होत असल्याने सलग 46 व्या दिवशी भारतात नव्या रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या अधिक आहे. गेल्या 24 तासात 58,578 रुग्ण बरे झाले. दैनंदिन नव्या रुग्णांच्या तुलनेत गेल्या 24 तासात जवळपास, 12 हजार (12,430) रुग्ण बरे झाले.
भारतात महामारीच्या सुरुवातीपासून ते आतापर्यंत एकूण 2,93,09,607 तर गेल्या 24 तासात 58,578 रुग्ण कोविड-19 संसर्गातून बरे झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचा कल सातत्याने सकारात्मक असून आता रुग्ण बरे होण्याचा एकूण दर 96.80 टक्के झाला आहे. गेल्या 24 तासात देशात 15,70,515 चाचण्या करण्यात आल्या. देशात आतापर्यंत एकूण 40.63 कोटींपेक्षा अधिक (40,63,71,279) चाचण्या करण्यात आल्या आहेत.
देशात एकीकडे चाचण्या वाढत असून दुसरीकडे साप्ताहिक पॉझिटीव्हीटी दरात घट कायम आहे. सध्या साप्ताहिक पॉझिटीव्हीटी 2.81 टक्के तर दैनंदिन पॉझिटीव्हीटी दर 2.94 टक्के आहे. सलग 21 व्या दिवशी हा 5 टक्के पेक्षा कमी आहे.