(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Corona Vaccine : 'बायोलॉजिकल ई'च्या 5 ते 18 वयोगटातील मुलांसाठीच्या लसीच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या चाचणीसाठी DCGI ची मंजुरी
Biological E कंपनीच्या लसीची दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील चाचणी देशभरातील 10 ठिकाणी करण्यात येणार आहे. DCGI ने कोविड 19 सब्जेक्ट एक्स्पर्ट कमिटीच्या शिफारशीवरून या चाचणीला मंजुरी दिली आहे.
नवी दिल्ली : द ड्रग्ड कन्ट्रोलर जनरल ऑफ इंडियाने (DCGI) बुधवारी बायोलॉजिकल ई कंपनीच्या 5 ते 18 वयोगटातील मुलांसाठी असलेल्या लसीच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील चाचणीसाठी मंजुरी दिली आहे. या कंपनीकडून निर्मीण करण्यात येणारी ही लस स्वदेशी लस असून काही अटींच्या आधारे याच्या पुढच्या टप्प्याच्या चाचणीला मंजुरी देण्यात आल्याचं सूत्रांनी सांगितलंय.
बायोलॉजिकल ई कंपनीची ही लस 5 ते 18 वयोगटातील मुलांसाठी असणार आहे. या स्वदेशी लसीची निर्मिती हैदराबादच्या कंपनीकडून करण्यात येत असून त्याच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील चाचणीला मंजुरी मिळाली आहे. या लसीची दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील चाचणी देशभरातील 10 ठिकाणी करण्यात येणार आहे. DCGI ने कोविड 19 सब्जेक्ट एक्स्पर्ट कमिटीच्या शिफारशीवरून या चाचणीला मंजुरी दिली आहे.
स्वदेशी कंपनी झायडस कॅडिला (Zydus Cadila) कंपनीने कोविड -19 वरील लस झायकोव्ह-डी (ZyCov-D)च्या आपत्कालीन वापरासाठी ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (डीसीजीआय) कडे परवानगी मागितली आहे. कंपनीने म्हटले आहे की आतापर्यंत भारतातील 50 हून अधिक केंद्रांमध्ये कोविड -19 लससाठी क्लिनिकल ट्रायल केलं आहे. या लसीला मंजुरी मिळाली तर यामुळे केवळ प्रौढच नव्हे तर 12 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांना देखील लाभ होईल. ही लस इंजेक्शनच्या मदतीशिवाय फार्माजेट तंत्रज्ञानाद्वारे दिली जाईल. या तंत्राचा वापर केल्यास लसीनंतर दुष्परिणाम होण्याचा धोका कमी होईल. या लसीला मंजुरी मिळाली तर कोरोनाला रोखण्यासाठी ही जगातील पहिली डीएनए-आधारित लस असेल आणि देशातील पाचवी उपलब्ध लस असेल.
भारत बायोटेकच्या कोवॅक्सिन लसीच्या 2 ते 18 वयोगटातील दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील चाचणीचा डेटा तयार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तसेच पुण्याच्या सीरम इन्स्टिट्यूटच्या कोविशिल्ड लसीच्या 2 ते 17 वयोगटातील मुलांवरील दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील चाचणीसाठी जून मध्ये परवानगी देण्यात आली आहे.
देशातील कोरोनाच्या दुसऱ्या लाटेवर अद्याप नियंत्रण आले नसून रुग्णसंख्या काही कमी होताना दिसत नाही. त्यातच आता तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवण्यात येत असून यामध्ये बालकांना जास्त धोका असल्याचं सांगण्यात येतंय. या पार्श्वभूमीवर आता बायोलॉजिकल ई कंपनीच्या या स्वदेशी लसीच्या पुढील चाचणीला मंजुरी मिळाल्याने मोठा दिलासा ठरणार आहे.