(Source: ECI/ABP News/ABP Majha)
लॉकडाऊनमध्ये धावली पहिली विशेष ट्रेन; 1200 कामगार तेलंगाणाहून झारखंडला रवाना
देशात सुरू असलेल्या लॉकडाऊनमध्ये विशेष ट्रेन धावली आहे. तेलंगाणा सरकारने केलेल्या विनंतीनंतर केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने हैदराबादमधून हटियासाठी विशेष रेल्वे गाडी सोडण्याचा घेतला असून आज पहाटे साडेचार वाजता ही ट्रेन 1200 1200 कामगारांना घेऊन झारखंडसाठी रवाना झाली.
नवी दिल्ली : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. लॉकडाऊनमुळे देशातील सर्व ट्रेनही बंद करण्यात आल्या आहेत. त्यामुळे देशातील वेगवेगळ्या राज्यांमध्ये कामासाठी गेलेले कामगार तिथेच अडकून पडले आहे. अशातच शासनाने या कामगारांना आपापल्या राज्यांमध्ये परतण्यासाठी परवानगी दिली आहे. त्यासाठी विशेष रेल्वे सोडण्याची मागणीही रेल्वे मंत्रालयाने मान्य केली आहे. आज कामगारांना घेऊन जाण्यासाठी हैदराबादजवळील लिंगमपिल्ली येथून झारखंडमधील हटिया येथे जाण्यासाठी एक विशेष गाडी सोडण्यात आली. लॉकडाऊन जाहीर केल्यानंतर पहिल्यांदाच प्रवासी वाहतुकीसाठी रेल्वेची विशेष गाडी धावली आहे.
रेल्वे मंत्रालयाकडून याबाबतची माहिती देताना, या गोष्टीवरही जोर देण्यात आला की, 'सध्या ही अशा पद्धतीची एकमेव स्पेशल ट्रेन सोडण्यात आली आहे. भविष्यात काही ट्रेन सोडायच्या असतील तर त्याबाबत दोन संबंधित राज्यांची विनंती आणि रेल्वे मंत्रालयाचे निर्देश याच्यानंतरच काही प्लॅन तयार होऊ शकतो. तसेच पहाटे तेलंगणातून ही विशेष ट्रेन रवाना झाली. त्यात 24 डब्यांत 1200 मजूर होते अशीही माहिती रेल्वेनं दिली आहे. त्याआधी प्रत्येक प्रवाशांचं व्यवस्थित स्क्रीनिंग करण्यात आलं, सोशल डिस्टनसिंगच्या अटीही स्टेशनवर आणि ट्रेनमध्ये पाळण्यात आल्याचं रेल्वेच्या वतीनं सांगितलं आहे. योगायोगानं आजच जागतिक कामगार दिन आहे, त्याच दिवशी कामगारांसाठी ही विशेष ट्रेन धावली आहे.
एएनआयने दिलेल्या दिलेल्या वृत्तानुसार, तेलंगाणा सरकारने केलेल्या विनंतीनंतर केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने हैदराबादमधून हटियासाठी विशेष रेल्वे गाडी सोडण्याचा निर्णय घेतला आहे. लॉकडाऊनमुळे झारखंडमधील कामगार तेलंगाणामध्ये अडकले होते, त्यांना त्यांच्या राज्यात परत जाता यावे यासाठी ही विशेष ट्रेन सोडण्यात आली. यावेळी काही रेल्वे अधिकारी आणि पोलीस अधिकारी लिंगपिल्ली स्थानकावर उपस्थित होते.
गेल्या अनेक दिवसांपासून देशातील अनेक राज्यांतील मुख्यमंत्र्यांनी राज्यात अडकून पडलेल्या कामगारांना त्यांच्या राज्यात जाण्यासाठी विशेष ट्रेन सोडावी अशी मागणी केली होती. अखेर केंद्र सरकारने परवानगी देत अडकलेल्या कामगारांना मूळ राज्यांत परत पाठवण्यासाठी रेल्वे सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. अंदाजे 1200 मजुरांना घेऊन ही ट्रेन पहाटे साडेचार वाजता रवाना झाली आहे. तूर्तास या एकमेव ट्रेनसाठीच विचार केल्याचं रेल्वेने सांगितंल आहे. तरी एवढ्या दिवसांनी आपल्या घरी परतणाऱ्या कामगारांच्या चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहत होता.
संंबंधित बातम्या :
महाराष्ट्रातील विधानपरिषदेच्या 9 जागांसाठी 21 मे रोजी निवडणूक
जिल्हा मुख्यालयाच्या कामासाठी ठाण्याहून 30 कामगार पालघरमध्ये, ठेकेदारावर गुन्हा दाखल