(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Corona Cases Update : देशात 24 तासांत 10,549 नव्या कोरोनाबाधितांची नोंद, 488 रुग्णांचा मृत्यू
Corona Cases Update : देशात गेल्या 24 तासांत 10,549 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर 488 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
Corona Cases Update : देशात कोरोनाच्या प्रादुर्भावात मोठी घट झाली असली तर धोका मात्र अद्याप टळलेला नाही. देशात गेल्या 24 तासांत 10,549 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर 488 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आजच्या आकडेवारीनंतर कोरोना महामारीपासून आतापर्यंतच्या एकूण कोरोनाबाधितांची संख्या 34,555,431 वर पोहोचली आहे. तर सक्रिय रुग्णांची संख्या (Active Cases) 110,133 असल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाच्या वतीनं देण्यात आली आहे. गेल्या 24 तासांत 9,868 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत एकूण 33,977,830 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. ताज्या आकडेवारीनुसार, कोरोनामुळे आतापर्यंत 467,468 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एकीकडे जिथे कोरोनाबाधितांच्या संख्येत घट झाली आहे. तर दुसरीकडे देशात लसीकरण मोहीम सुरु आहे. गेल्या 24 तासांत 83,88,824 रुग्णांचं लसीकरण करण्यात आलं आहे. आतापर्यंत देशात एकूण 1,20,27,03,659 लसीकरण पार पडलं आहे.
कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटपासून सावध राहा
कोरोनाच्या एका नवा व्हेरिएंट दक्षिण आफ्रिकेत आढळल्याने चिंता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. कोरोनाच्या नव्या व्हेरिएंट संदर्भात नवीन माहिती देताना दक्षिण आफ्रिकेच्या शास्त्रज्ञांनी सांगितले की, दक्षिण आफ्रिकेत मल्टिपल म्युटेशन क्षमता असलेला कोरोनाचा एक नवा व्हेरिएंट आढळला आहे. दक्षिण आफ्रिकेतील कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्यानंतर या नव्या व्हेरिएंटची माहिती समोर आली आहे. वायरोलॉजिस्ट ट्यूलिओ जी ओलिवेरा यांनी एका पत्रकार परिषदेत ही माहिती आली आहे. "दुर्दैवाने आम्हाला कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटची माहिती मिळाली आहे. जो दक्षिण आफ्रिकेतील वाढत्या कोरोना संक्रमणाचे कारण आहे."
महाराष्ट्रात गेल्या 24 तासांत 848 कोरोनाबाधितांची नोंद, 50 जणांचा मृत्यू
महाराष्ट्रात गेल्या 24 तासांत 848 नवे कोरोनाबाधित आढळून आले. तर, 50 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झालीय. याशिवाय, 987 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यात आतापर्यंत एकूण 64 लाख 79 हजार 396 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. ज्यामुळं राज्यातील रुग्ण बरं होण्याचं प्रमाण 97.68 टक्क्यांवर पोहचलंय. राज्यात सध्या 9 हजार 187 रुग्ण सक्रीय आहेत.
राज्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येवर नियंत्रण मिळवण्यात सरकारला मोठं यश आलंय. राज्यातील मृत्युदर 2.12 टक्के इतका आहे. राज्यात आतापर्यंत तपासण्यात आलेल्या सहा कोटी 50 लाख 47 हजार 491 जणांची कोरोना चाचणी करण्यात आलीय. त्यापैकी 66 लाख 33 हजार 105 जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आलाय. राज्यात सध्या 90 हजार 538 जण होम क्वारंटाईनमध्ये आहेत. तर, 1 हजार 65 रुग्ण वैद्यकीय संस्थेत उपचार घेत आहेत.