Covid-19 Cases: धास्ती वाढली; एका आठवड्यापेक्षा कमी कालावधीत कोरोना रुग्णसंख्या दुप्पट
Covid-19: कोरोनानं पुन्हा एकदा डोकं वर काढलं आहे. देशात कोरोनाबाधितांच्या संख्येत एका आठवड्यापेक्षा कमी कालावधीत दुपटीनं वाढ झाली आहे.
Covid-19 Cases: देशात कोरोनाबाधितांचा (India Corona Updates) आकडा दिवसागणिक वाढतच चालला आहे. शनिवारी (1 एप्रिल) रोजी देशात कोरोनाच्या (Coronavirus) 3824 नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. दैनंदिन रुग्णांचा विचार केला तर ही 6 महिन्यांतील सर्वाधिक संख्या आहे. तसेच, गेल्या सात दिवसांत ज्या प्रकारे कोरोनाबाधितांमध्ये (Covid-19) वाढ होत आहे. ही वाढ कोरोनाच्या तिसऱ्या लाटेनंतरची सर्वाधिक वाढ आहे.
गेल्या आठवड्यात 26 मार्च-1 एप्रिल या कालावधीत भारतात 18,450 नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली होती. जी आधीच्या आठवड्यातील 8,781 पेक्षा दुप्पट आहे. कोरोना रुग्णांची संख्या दुप्पट होण्याची वेळ 7 दिवसांपेक्षा कमी राहिली आहे. गेल्यावेळी हे तिसऱ्या लाटेत घडले होते जेव्हा दैनंदिन आकडे आठवडाभरात दुप्पट होत होते. मात्र, या काळात कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूच्या संख्येत किंचित वाढ झाली आहे. ही दिलासादायक बाब आहे. गेल्या आठवड्यात कोरोनामुळे 36 जणांचा मृत्यू झाला होता. तर त्याआधी हा आकडा 29 होता.
केरळमध्ये सर्वाधिक वाढ
गेल्या सात दिवसांत रुग्णांची संख्या दुप्पट होण्यात सर्वात पहिला क्रमांक केरळचा लागतो. केरळमध्ये कोरोनाबाधितांमध्ये वाढ होत आहे. केरळमध्ये एका आठवड्यात कोरोनाबाधितांची संख्या 1333 वरून तिपटीनं वाढून 4000 वर पोहोचली आहे. गोवा, दिल्ली, हिमाचल प्रदेश, पंजाब, हरियाणा आणि उत्तर प्रदेश या राज्यांमध्ये सर्वात वेगवान वाढ झाली आहे. यापैकी बहुतांश राज्यांमध्ये मागील आठवड्याच्या तुलनेत कोरोना रुग्णांची संख्या तीन पटीनं वाढली आहे. हिमाचल प्रदेशमध्ये गेल्या आठवड्यात कोरोनाची प्रकरणे 409 वरून 1200 पर्यंत वाढली.
राज्यातही कोरोनाचा प्रादुर्भाव
गेल्या काही आठवड्यांपासून महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. मात्र, आता सध्या गुजरातमध्ये त्यात घट झाली आहे, तर महाराष्ट्रात कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत आहे. महाराष्ट्रातील साप्ताहिक आकडा 3323 आहे, जो गेल्या सात दिवसांत 1956 च्या तुलनेत 70 टक्के अधिक आहे. 2312 रुग्णसंख्येसह गुजरात पहिल्या तीन राज्यांमध्ये कायम आहे.गेल्या आठवड्यात दिल्लीत 1733 रुग्णांची वाढ झाली होती. जी मागील आठवड्यातील 681 रुग्णसंख्येपेक्षा अडीच पट जास्त आहे.
घाबरू नका, खबरदारी बाळगा
कोरोनाता वाढता धोका पाहता गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरण्याचं आवाहन नीती आयोगानं केलं आहे. तसेच सोशल डिस्टंसिग पाळा आणि शक्यतो गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळा, असं आवाहन आरोग्य मंत्रालयाकडून करण्यात येत आहे. घाबरुन जाणू नका, तर खबरदारी घ्या, असा सल्ला आरोग्य विभागानं दिला आहे.