Karnataka Assembly Election 2023 : काँग्रेसकडून कर्नाटकात तिसरी उमेदवार यादी जाहीर; माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांना अथणीतून उमेदवारी
भाजपला रामराम करून आलेल्या माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांना अथणी मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. काँग्रेसने आतापर्यंत राज्यातील 224 पैकी 209 जागांवर उमेदवार जाहीर केले आहेत.
Karnataka Assembly Election 2023 : कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी (Karnataka Assembly Election 2023) काँग्रेसने (congress) शनिवारी (15 एप्रिल) 43 उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली. भाजपला रामराम करुन आलेल्या माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांना अथणी मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. कोलारमधून कोथूर जी मंजुनाथ यांना उमेदवारी देण्यात आली आहे. कोलार हे महत्त्वपूर्ण आहे कारण सिद्धरामय्या यांनी तेथून त्यांची दुसरी जागा म्हणून निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यांना याआधीच म्हैसूर जिल्ह्यातील वरुणामधून उमेदवारी देण्यात आली आहे.
काँग्रेसने आतापर्यंत राज्यातील 224 पैकी 209 जागांवर उमेदवार जाहीर केले आहेत. निवडणूक आयोगाने निवडणूक वेळापत्रक जाहीर करण्यापूर्वी कर्नाटक काँग्रेसने राज्याच्या विधानसभा निवडणुकीसाठी 124 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली होती. कर्नाटक निवडणुकीसाठी काँग्रेसच्या पहिल्या उमेदवार यादीवर प्रदेशाध्यक्ष अध्यक्ष डीके शिवकुमार म्हणाले की, "काँग्रेस पक्षाने यापूर्वीच केंद्रीय निवड समिती आणि स्क्रीनिंग समितीने नावे निश्चित केली होती."
सवदींनी पक्ष सोडल्याने भाजपला हादरा
दरम्यान, कर्नाटक विधानसभेसाठी भाजपने उमेदवारांची पहिली यादी जाहीर केल्यानंतर पहिला मोठा धक्का बसला होता. राज्याचे माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी (Laxman Savadi) यांनी भाजपच्या विधानपरिषद आमदारकीचा राजीनामा देण्याची घोषणा केली. पारंपरिक मतदारसंघ अथणी या ठिकाणाहून सवदी यांना भाजपने तिकीट नाकारल्यानंतर त्यांनी हे पाऊल उचललं. सवदी यांच्या जागी भाजपने महेश कुमठल्ली यांना तिकीट दिलं आहे. त्यामुळे कुमठल्ली आणि लक्ष्मण सवदी यांच्यामध्ये आता थेट लढत होईल. लक्ष्मण सवदी यांचा अथनी या त्यांच्या पारंपरिक मतदारसंघातून त्यावेळचे काँग्रेसचे उमेदवार महेश कुमठल्ली यांनी पराभव केला होता. त्यानंतर महेश कुमठल्ली यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. आता भाजपने त्यांनाच उमेदवारी दिली आहे. दुसरीकडे, लक्ष्मण सवदी हे भाजपचे जेष्ठ नेते होते. ते राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आणि भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष राहिले आहेत.
Congress releases third list of 43 candidates for Karnataka Assembly elections.
— ANI (@ANI) April 15, 2023
Former Deputy CM Laxman Savadi gets the ticket from the Athani constituency. Kolar seat given to Kothur G Manjunath. pic.twitter.com/5W7k5SERzE
राहुल गांधी उद्या कोलारला भेट देणार
दुसरीकडे, काँग्रेस नेते राहुल गांधी रविवारी कोलार येथे पक्षाच्या रॅलीला संबोधित करतील, त्याच ठिकाणी त्यांनी मोदी आडनावावर टीका केली होती ज्यासाठी त्यांना दोषी ठरवण्यात आले होते. त्यांचे संसद सदस्यत्वही काढून घेण्यात आले होते. राज्य काँग्रेसच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एआयसीसीचे माजी अध्यक्ष रविवारी सकाळी बंगळूरमध्ये पोहोचतील आणि कोलार येथे जातील आणि पक्षाने आयोजित केलेल्या 'जय भारत' रॅलीला संबोधित करतील. संध्याकाळी, राहुल गांधी बंगळूरमधील कर्नाटक PCC कार्यालयाजवळ नव्याने बांधलेल्या 'इंदिरा गांधी भवन' कार्यालयाचे उद्घाटन करतील.
एआयसीसीचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, कर्नाटकचे प्रभारी सरचिटणीस रणदीप सिंग सुरजेवाला, प्रदेशाध्यक्ष डीके शिवकुमार, विधिमंडळ पक्षाचे नेते आणि माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्यासह अनेक ज्येष्ठ काँग्रेस नेते या कार्यक्रमात सहभागी होण्याची शक्यता आहे.
इतर महत्वाच्या बातम्या