Karnataka Election 2023 : हलाल आणि हिजाबवरुन कर्नाटकमधील वाद अनावश्यक, मी समर्थन करत नाही; भर निवडणुकीत माजी सीएम येडियुरप्पांचे थेट बोल
कर्नाटकात हलाल आणि हिजाबवरुन चांगलेच रणकंदन झाले आहे. येडियुरप्पा यांनी केलेल्या वक्तव्याने अनेक राजकीय अर्थ सुद्धा काढले जात आहेत. येडियुरप्पा म्हणाले की, हिंदू आणि मुस्लिमांनी एकोप्याने राहावे.
Karnataka Election 2023 : कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजपला दिवसागणिक हादरे बसत असतानाच माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी हलाल आणि हिजाबवरुन (BS Yediyurappa On Hijab) स्पष्ट भाष्य केल्याने राजकीय भूवया उंचावल्या आहेत. येडियुरप्पा यांनी इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या मुलाखतीमध्ये आपलं मत मांडलं आहे. कर्नाटकात हलाल आणि हिजाबवरुन चांगलेच रणकंदन झाले आहे. त्यामुळे निवडणुकीमध्येच येडियुरप्पा यांनी केलेल्या वक्तव्याने अनेक राजकीय अर्थ सुद्धा काढले जात आहेत. येडियुरप्पा म्हणाले की, हिंदू आणि मुस्लिमांनी एकोप्याने राहावे.
'मी अशा गोष्टींचे समर्थन करणार नाही'
पक्षाने हिजाब आणि हलालचा मुद्दा कसा हाताळला? या प्रश्नावर येडियुरप्पा यांनी इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, "मी अशा गोष्टींचे समर्थन करणार नाही. ही भूमिका मी सुरुवातीपासून घेतली आहे. हे असे मुद्दे होते जे आवश्यक नव्हते. मी अशा गोष्टींचे समर्थन करणार नाही. कर्नाटकात 10 मे रोजी मतदान होत असताना येडियुरप्पा यांनी हे वक्तव्य केले आहे. भाजप आमदार यशपाल सुवर्णा यांनी कर्नाटकातील कॉलेज कॅम्पसमध्ये हिजाब घालण्याची मागणी करणाऱ्या विद्यार्थ्यांविरोधात आवाज उठवला होता आणि हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहोचले होते."
गेल्या वर्षी कर्नाटकात हिजाब आणि हलालवरुन वाद उफाळून आला होता. भाजपचे तत्कालीन सरचिटणीस सीटी रवी यांच्यासह पक्ष आणि पदाधिकाऱ्यांनी "आर्थिक जिहाद" चा मुकाबला करण्याच्या उपाययोजनांचे समर्थन केले होते. तेव्हा विरोधकांनी म्हटले की, मतदारांचे ध्रुवीकरण करण्यासाठी भाजपने फुटीरतावादी राजकारणाचा वापर करण्याचा हा आणखी एक प्रयत्न आहे.
इतर धार्मिक कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी गेलं पाहिजे
निमंत्रण असूनही मुख्यमंत्री बसवराज बोम्मई चर्चच्या समारंभात सहभागी होत नसल्याबद्दल येडियुरप्पा म्हणाले की, "मी ख्रिश्चन आणि मुस्लिम समारंभांना उपस्थित राहायचो. अगदी इतर सामुदायिक कार्यक्रमामध्येही सहभागी झालो होतो. बोम्मईंना त्यांनी आमंत्रण दिले असल्यास त्यांच्यासाठी जायला हवे. अशा कार्यक्रमांना अधिक महत्त्व दिले पाहिजे. त्यांनी अशा कार्यक्रमांना जावे."
'याचा पक्षाला फटका बसणार नाही'
भाजप संसदीय मंडळाचे सदस्य असलेले 80 वर्षीय येडियुरप्पा निवडणुकीच्या राजकारणापासून दूर आहेत. राज्यात सुरु असलेल्या बंडखोरीला त्यांनी कमी महत्त्व दिले. ते म्हणाले की, "बंडखोरीचा भाजपवर काहीही परिणाम होणार नाही. काही मतदारसंघात बंडखोर बाहेर पडल्याने फरक पडू शकतो, पण पक्षाला त्याचा काहीही फरक पडणार नाही."
'भाजपला पूर्ण बहुमत मिळेल'
भाजपचे दिग्गज नेते आणि राज्याचे चार वेळा मुख्यमंत्री राहिलेल्या येडियुरप्पा यांनी स्पष्ट केले की त्यांचा मुलगा बीवाय विजयेंद्र हा भाजपचा उमेदवार असावा आणि शिकारीपुरा येथे त्यांचा उत्तराधिकारी व्हावा अशी त्यांची इच्छा आहे. ते म्हणाले की, "पंतप्रधान मोदींची लोकप्रियता, त्यांच्या कल्याणकारी योजना आणि त्यांच्या स्वत:च्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात घेतलेले सामाजिक कल्याणकारी उपक्रम तसेच बोम्मई सरकारच्या उपाययोजनांमुळे भाजपला पूर्ण बहुमत मिळेल."
इतर महत्वाच्या बातम्या