काँग्रेसच्या वर्किंग कमिटीच्या नावांची अखेर घोषणा; महाराष्ट्रातून अशोक चव्हाणांसह 'या' नेत्यांची वर्णी
Maharashtra Congress News: काँग्रेस कार्यकारिणीची यादी जाहीर झाली आहे. पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी त्यांच्या टीममध्ये 39 जणांचा समावेश केला आहे.
Congress Working Committee List: यंदाच्या वर्षात होणाऱ्या विधानसभा निवडणुका आणि पुढील वर्षी 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकांसाठी काँग्रेसनं आपली नवी टीम तयार केली आहे. काँग्रेसच्या नव्या कार्यकारिणीची म्हणजेच, काँग्रेस वर्किंग कमिटीची यादी जाहीर करण्यात आली आहे. त्यात सोनिया गांधी (Sonia Gandhi), राहुल गांधी (Rahul Gandhi) आणि मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge) यांच्यासह एकूण 39 सदस्यांचा समावेश करण्यात आला आहे. महाराष्ट्रातून अशोक चव्हाण, मुकुल वासनिक यांचा काँग्रेस वर्किंग कमिटीमध्ये समावेश करण्यात आला आहे. तर, रजनीताई पाटील, प्रणिती शिंदे, यशोमती ठाकूर यांसारख्या महाराष्ट्रातील महिल्या नेत्यांचाही समावेश करण्यात आला आहे.
त्याचबरोबर काँग्रेसवर नाराज असलेले आनंद शर्मा आणि शशी थरूर यांच्यासह G-23 च्या अनेक नेत्यांनाही या कार्यकारिणीत स्थान देण्यात आलं आहे. CWC ची बऱ्याच दिवसांपासून प्रतीक्षा होती. काँग्रेसमधील अनेक मोठे निर्णय या समितीकडून घेतले जातात. मात्र, या नव्या समितीत जुन्यापेक्षा फारसा बदल करण्यात आलेला नाही. यादी जाहीर करण्यापूर्वी गेल्या अनेक महिन्यांपासून बैठकांच्या फेऱ्या सुरू होत्या. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्यासोबत अनेक बैठका घेतल्या होत्या.
सोनिया राहुल आणि प्रियंका गांधी तिघेही काँग्रेस वर्किंग कमिटीमध्ये आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे, मल्लिकार्जुन खर्गे यांच्या विरोधात काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक लढवणारे G-23 मधील नेते शशी थरूर यांना काँग्रेस वर्किंग कमिटीमध्ये स्थान देण्यात आलं आहे. तर, काँग्रेस नेते ए. के. अँटोनी यांच्या मुलानं काही दिवसांपूर्वी काँग्रेसची साथ सोडत भाजपमध्ये प्रवेश केला. तरिही अँटोनी यांना देखील काँग्रेस वर्किंग कमिटीवर कायम ठेवलं आहे.
Congress president Mallikarjun Kharge constitutes the Congress Working Committee. pic.twitter.com/lsxTK8rcei
— ANI (@ANI) August 20, 2023
काँग्रेस वर्किंग कमिटीमध्ये महाराष्ट्रातून कोण-कोण?
1. मुकुल वासनिक
2. अशोकराव चव्हाण
3. अविनाश पांडे (महासचिव म्हणून)
4. रजनीताई पाटील (प्रभारी)
5. माणिकराव ठाकरे (प्रभारी)
कायम निमंत्रितांमध्ये :
6.चंद्रकांत हंडोरे
विशेष आमंत्रितांमध्ये :
7. प्रणिती शिंदे
8. यशोमती ठाकूर
काँग्रेस वर्किंग कमिटीत 'या' नेत्यांचा समावेश
CWC मध्ये मल्लिकार्जुन खर्गे, सोनिया गांधी, मनमोहन सिंह, राहुल गांधी, प्रियंका गांधी, एके अँटनी, अंबिका सोनी, अधीर रंजन चौधरी, दिग्विजय सिंह, चरणजीत सिंह चन्नी, आनंद शर्मा यांच्यासह एकूण 39 नेत्यांचा समावेश आहे. याशिवाय 32 स्थायी निमंत्रित, 9 विशेष निमंत्रित, युवक काँग्रेस, एनएसयूआय, महिला काँग्रेस आणि सेवादल अध्यक्षांनाही या कमिटीमध्ये स्थान देण्यात आलं आहे.
काँग्रेसच्या कार्यकारिणीत सचिन पायलट, शशी थरूर, अशोक चव्हाण, दीपक बावरिया यांच्या रूपाने नवी नावे पुढे आली आहेत. गौरव गोगोई, नासिर हुसेन, दीपा दास मुन्शी यांचाही CWC मध्ये समावेश करण्यात आला आहे. विशेष निमंत्रितांमध्ये पवन खेरा, सुप्रिया श्रीनाटे आणि अलका लांबा यांचा समावेश आहे.
दरम्यान, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे हे यापूर्वी सोनिया गांधींनी स्थापन केलेल्या समितीसोबत काम करत होते. आता जाहीर झालेल्या काँग्रेस कार्यकारिणीत पूर्वीच्या समितीच्या तुलनेत फारसा बदल झालेला नाही.