Exclusive : कोण होणार काँग्रेसचा अध्यक्ष? सुशीलकुमार शिंदे यांच्यासह सोनिया आणि राहुल गांधींची 'या' दोन नावांना पसंती
Congress President Election : काँग्रेस अध्यक्षपदासाठी गांधी परिवाराबाहेरील नेत्यांमध्ये राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचे नाव सर्वाधिक चर्चेत आहे.
Congress President Election : काँग्रेस अध्यक्षपदासाठी 17 ऑक्टोबरला निवडणूक होणार असून 19 ऑक्टोबरला मतमोजणी होणार आहे. परंतु, अद्याप काँग्रेसचा अध्यक्ष कोण होणार याबाबात सस्पेंस आहे. अध्यक्षपदासाठी गांधी परिवाराबाहेरील नेत्यांमध्ये राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचे नाव सर्वाधिक चर्चेत आहे. मात्र पक्षाच्या विश्वसनीय सूत्रांकडून एबीपी न्यूजला मिळालेल्या माहितीनुसार माजी गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांच्या नावाला सोनिया गांधी यांची पसंती आहे. तर राहुल गांधी यांची राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी पक्षाची धुरा सांभाळावी अशी इच्छा आहे.
शिंदे आणि खर्गे हे दोघेही अत्यंत अनुभवी नेते आहेत आणि गांधी घराण्याचे विश्वस्त मानले जातात. यासोबतच दोन्ही नेते दलित समाजातील आहेत. काँग्रेसची कमान त्यांच्याकडे सोपवून गांधी घराणे एकेकाळी काँग्रेसचा मतदार असलेल्या वर्गाला मोठा राजकीय संदेश देऊ शकते.
सुशीलकुमार शिंदे हे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत, तर खर्गे हे कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आहेत. कर्नाटकात पुढील वर्षाच्या सुरुवातीला निवडणुका होणार आहेत. या दोन्ही नेत्यांनी वायाची 80 ओलांडले असले तरी 2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी असा वयोवृद्ध नेता काँग्रेसमध्ये नवा उत्साह निर्माण करू शकेल का, हा मोठा प्रश्न नक्कीच निर्माण होणार आहे.
काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी राहुल गांधी तयार नसतील आणि वयोमानामुळे शिंदे, खर्गे देखील तयार नसतील तर अशोक गेहलोत काँग्रेसचे अध्यक्ष होण्याची दाट शक्यता असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. यापूर्वी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी पुढच्या अध्यक्षाबाबत अनेक ज्येष्ठ नेत्यांशी सल्लामसलत केली होती. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी पुन्हा एकदा राहुल गांधींना पक्षाच्या अध्यक्षपदावर परतण्याचा सल्ला दिला आहे. शिवाय त्यांच्याकडे अध्यक्षपदाची जबाबदारी दिल्यास त्यांच्या जागी सीपी जोशी यांना राजस्थानचे मुख्यमंत्री करावे, असेही त्यांनी हायकमांडला स्पष्ट केले.
सीपी जोशी सध्या राजस्थान विधानसभेचे अध्यक्ष आहेत. गेहलोत यांनी जोशी यांचे नाव पुढे करून सचिन पायलट यांना धडा शिकविण्याचा प्रयत्न केला असला तरी काँग्रेस हायकमांडची कोंडी केली आहे. ज्यांननी गेल्या काही वर्षांत पायलट यांना धीर धरण्याचा सल्ला दिला होता. मात्र, अध्यक्षपदासाठी खर्गे, शिंदे किंवा गेहलोत यांच्यापैकी कोण अर्ज भरणार याची प्रतीक्षा करावी लागणार आहे. 24 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर दरम्यान नामांकन प्रक्रिया चालणार आहे.
पक्षातील नेत्यांचा एक मोठा वर्ग राहुल गांधींचे मन वळवण्याचा प्रयत्न करत आहे. पण राहुल आपला विचार बदलतील अशी आशा कमी आहे. दुसरीकडे गांधी घराण्याबाहेरील उमेदवाराच्या विरोधात त्यांच्या बाजूने उमेदवार उभा केला जाईल, असे काँग्रेसमधील बंडखोर नेत्यांच्या संकेतांवरून स्पष्ट झाले आहे.