(Source: ECI/ABP News/ABP Majha)
350 कोटींशी माझा अथवा काँग्रेसचा संबंध नाही, IT छापेमारीनंतर धीरज साहूंची पहिली प्रतिक्रिया
Income Tax Raid : काँग्रेसचे राज्यसभा खासदार धीरज प्रसाद साहू यांच्या विविध ठिकाणी गेल्या आठव्यात आयकर खात्याने छापेमारी केली. या छापेमारीमध्ये धीरज साहू यांच्याकडे 350 कोटी रुपये असल्याचे उघड झाले.
Dhiraj Sahu On Income Tax Raid : काँग्रेसचे राज्यसभा खासदार धीरज प्रसाद साहू यांच्या विविध ठिकाणी गेल्या आठव्यात आयकर खात्याने छापेमारी केली. या छापेमारीमध्ये धीरज साहू यांच्याकडे 350 कोटी रुपये असल्याचे उघड झाले. धीरज साहू यांच्याकडील पैसे मोजण्यासाठी दोन ते तीन दिवस लागले. नोटा मोजायला मशीनही कमी पडल्या होत्या. यावर सत्ताधारी भाजपने काँग्रेसवर निशाणा साधला. पण आता या प्रकरणाबाबत धीरज साहू यांनी प्रतिक्रिया दिली आहे. हे पैशासोबत माझा अथवा काँग्रेसचा संबंध नसल्याचं साहू यांनी सांगितलेय.
खासदार धीरज साहू यांनी आयकर विभागाच्या (IT) छाप्याबाबत एएनआय या वृत्तसंस्थेला प्रतिक्रिया दिली. यामध्ये त्यांनी सत्ताधाऱ्यांचे आरोप फेटाळले. ते म्हणाले की, जप्त करण्यात आलेल्या पैशांमध्ये काँग्रेस किंवा अन्य कोणत्याही विरोधी पक्षाचा पैसा नाही. या प्रकरणी विनाकारण बदनामी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्या पैशाशी माझा काहीही संबंध नाही, असे धीरज साहू यांनी सांगितले. "हा माझ्या कुटुंबाचा पैसा आहे. आमचं कुटुंब खूप मोठं आहे, त्यामुळे हा पैसा त्यांचाच आहे. हा पैसा बेकायदेशीर असल्याचे अद्याप प्राप्तिकराकडून सांगण्यात आलेले नाही. अशा स्थितीत या पैशाबाबत काहीही सांगणे घाईचे ठरेल, असे साहू म्हणाले.
आयकर विभागाने धीरज साहू यांच्या रांची येथील निवासस्थानावर त्यांच्या कुटुंबाच्या मालकीच्या ओडिशातील दारू कंपनीविरुद्ध कारवाईचा एक भाग म्हणून छापा टाकला होता. ज्या ठिकाणी आयटीने छापा टाकला ते साहू यांचे संयुक्त कुटुंब निवासस्थान आहे. यामध्ये 350 कोटींहून अधिक रक्कम वसूल केली आहे.
एएनआयला दिलेल्या स्पष्टीकरणाबाबत काय म्हणाले ?
#WATCH | Delhi | First reaction of Congress MP Dhiraj Prasad Sahu on I-T raids and recovery of hundreds of crores of rupees in cash from premises linked to him.
— ANI (@ANI) December 15, 2023
He says, "...What is happening today makes me sad. I can admit that the money that has been recovered belongs to my… pic.twitter.com/TgpMXhCC2B
धीरज साहू काय म्हणाले ?
धीरज साहू म्हणाले की, "आज जे काही घडत आहे ते अतिशय दु:ख देणारे आहे. जप्त केलेले पैसे माझ्या फर्मचे आहेत, हे मी मान्य करू शकतो. जी रोकड जप्त करण्यात आली, ती माझ्या दारू फर्मची आहे. ते पैसे माझे नाहीत, माझ्या कुटुंबाचे आणि इतर संबंधित कंपन्याचे आहेत. IT ने नुकताच छापा टाकला आहे. मी सर्व गोष्टींचा हिशेब देईन."
280 लोक आठवडाभर मोजत होते पैसे -
धीरज साहू यांच्या झारखंड, ओढिशा आणि पश्चिम बंगाल येथील नऊ ठिकाणी आयकर विभागाच्या अधिकाऱ्याने छापेमारी केली. तेथे कपाटभरुन नोटा जप्त केल्या. 280 कर्मचाऱ्यांचे पथक आठवडाभर या नोटा मोजत होते. नोटा मोजणारी मशीनही बंद पडली होती. धीरज साहू यांच्याकडून तब्बल 253 कोटींपेक्षा अधिक रक्कम जप्त केल्याची माहिती मिळाली. या प्रकरणानंतर भाजपने काँग्रेसवर हल्लाबोल केला. पंतप्रधान मोदींपासून सर्वांनीच काँग्रेसवर निशाणा साधला.