Rahul Gandhi : '2024 मध्ये भाजपचा पराभव करणारच', लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांचं मोठं वक्तव्य
Congress : काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे सध्या लडाखच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी एका कार्यक्रमादरम्या लोकसभा निवडणुकांविषयी मोठं वक्तव्य केलं आहे.
भारत : काँग्रेसचे (Congress) नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी आगामी लोकसभा निवडणुकांच्या (Loksabha Election) संदर्भात मोठं वक्तव्य केलं आहे. लडाखमध्ये कार्यकर्त्यांशी संवाद साधताना राहुल गांधी यांनी म्हटलं आहे की, 'मी तुम्हाला मी खात्री देतो की, 2024 च्या लोकसभा निवडणुकांमध्ये आम्ही भाजपचा पराभव करु.' तसेच मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगढ आणि तेलंगणाच्या निवडणुकांमध्ये देखील काँग्रेसचा विजय होणार असल्याचा विश्वास राहुल गांधी यांनी व्यक्त केला आहे.
काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे सध्या लडाखच्या दौऱ्यावर आहेत. त्यांच्या या दौऱ्यादरम्यान ते वेगवेगळ्या लोकांशी संवाद साधत आहे. अनेक लोकांची भेट देखील घेतली आहे. यावेळी एका तरुणाने राहुल गांधी यांना भाजपला कसं हरवणार असा प्रश्न विचारला. यावर उत्तर देताना राहुल गांधी यांनी म्हटलं की, 'काँग्रेस 2024 च्या निवडणुकांमध्ये काँग्रेस भाजपला नक्की हरवणार.'
राहुल गांधींचा भाजपवर निशाणा
राहुल गांधी यांनी यावेळी भाजपवर जोरदार निशाणा देखील साधला. तर भाजपने सर्व घटकांनाना ताब्यात घेतलं असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे. यावर बोलतांना त्यांनी म्हटलं की, 'आपल्याला एक गोष्ट समजायला हवी की एक राजकीय पक्ष दुसऱ्या राजकीय पक्षासोबत लढू शकतो. पण सध्या भारतात तसं चित्र नाही. आज भाजपने सर्व घटकांनाना आपल्या नियंत्रणाखाली ठेवलं आहे.'
तुम्हाला असं खरचं वाटतं का की आपल्या देशात माध्यम ही निष्पक्ष आहे असा सवाल देखील राहुल गांधी यांनी उपस्थित केला आहे. 'भाजपने भारतातील सर्व घटकांना आपल्या नियंत्रणात ठेवलं आहे, मग ते माध्यम असो, लोकशाही असो किंवा निवडणुका असो', असं राहुल गांधी म्हणाले आहेत.
तर भाजपचा पराभव झाला असता...
जर भाजपने अगदी कोणावरही कोणत्याही प्रकारचा दबाव न आणता निवडणुका लढवल्या असत्या तर त्यांचा नक्कीच पराभव झाला असता असा दावा देखील राहुल गांधी यांनी केला आहे. त्यामुळे 2024 मध्ये काँग्रेस आणि इंडिया आघाडी भाजपचा पराभव करणार असल्याचा विश्वास राहुल गांधी यांनी व्यक्त केला आहे.
राहुल गांधी हे 17 आणि 18 ऑगस्ट अशा दोन दिवसांच्या लडाखच्या दौऱ्यावर गेले होते. पंरतु 18 ऑगस्ट रोजी त्यांचा दौरा हा 25 ऑगस्टपर्यंत वाढवण्यात आल्याचं सांगण्यात आलं. राहुल गांधी यांनी यावेळी लडाखच्या लोकांमध्ये त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. कारगिलमधील आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांचा हा दौरा महत्त्वाचा मानला जात आहे.