लोकसभा अध्यक्षपदासाठी एनडीएला पाठिंबा, पण एका अटीवर; राहुल गांधींनी ठेवली मोदींसमोर अट
Rahul Gandhi on PM Modi : संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना फोन करुन राजनाथ सिंह यांनी लोकसभा अध्यक्षपदासाठीच्या एनडीएच्या उमेदवाराला पाठींबा द्यावा, अशी विनंती केली.
Rahul Gandhi on NDA Candidate For Lok Sabha Speaker: नवी दिल्ली : लोकसभा अध्यक्षांच्या निवडीसाठी (Lok Sabha Speaker Election) एनडीएच्या उमेदवाराला (NDA Candidate) पाठींबा देऊ, पण लोकसभेचं उपाध्यक्ष पद विरोधकांना मिळालं पाहिजे, अशी अट काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी एनडीए सरकारसमोर ठेवली आहे.
काँग्रेस नेते राहुल गांधी म्हणाले की, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge) यांना संरक्षण मंत्री राजनाथ सिंह (Rajnath Singh) यांचा फोन आला. फोनवरुन राजनाथ सिंह यांनी लोकसभा अध्यक्षपदासाठीच्या एनडीएच्या उमेदवाराला पाठींबा द्यावा, अशी विनंती केली. आम्ही विनंती मान्य करुन एनडीएच्या उमेदवाराला पाठींबा देऊ, पण लोकसभेचं उपसभापति पद मात्र विरोधकांना मिळालं पाहिजे. मल्लिकार्जुन खरगे यांना फोन परत करणार असल्याचं राजनाथ सिंह यांनी काल सांगितलं होतं. मात्र त्यांनी फोन केला नाही. सहकार्य हवं, असं पंतप्रधान मोदी सांगत आहेत. मात्र, आमच्या नेत्याचा अपमान केला जात आहे. सरकारचा हेतू स्पष्ट नाही.
दुसरीकडे, समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनीही विरोधक सभापतीपदासाठी पाठिंबा देण्यास तयार असल्याचं स्पष्ट केलं आहे. मात्र उपसभापतीपद आम्हाला मिळावं हीच आमची मागणी स्पष्ट आहे. मात्र, याबाबत अद्याप कोणतंही स्पष्ट उत्तर मिळालेलं नाही, असंही त्यांनी सांगितलं.
लोकसभा अध्यक्षपदासाठी ओम बिर्ला एनडीएचे उमेदवार
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एनडीएनं ओम बिर्ला यांना लोकसभा अध्यक्षपदाचं उमेदवार बनवलं आहे. ते आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. बुधवारी सभापतीपदाची निवडणूक होणार आहे. जर विरोधकांनी सभापतीपदासाठी एनडीएच्या उमेदवाराला पाठिंबा दिला, तर निवडणूक होणार नाही. विरोधकांना उपसभापतीपद हवं असून ते सभापतीपदासाठी उमेदवार देण्याच्या बाजूनं नसल्याचं सांगण्यात येत आहे. सरकारच्या वतीनं राजनाथ सिंह सातत्यानं विरोधकांशी चर्चा करत आहेत.
काँग्रेसच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राजनाथ सिंह यांनी मल्लिकार्जुन खर्गे यांच्याशी बोलून सभापती निवड बिनविरोध करण्याचं आवाहन केलं आहे आहे. राजनाथ सिंह म्हणाले की, सभापती बिनविरोध निवडण्याची परंपरा कायम ठेवली पाहिजे. मात्र, राजनाथ सिंह यांनी अद्याप या नावाचा खुलासा केलेला नाही. नाव समोर आल्यानंतर खर्गे इंडिया आघाडीच्या उर्वरित पक्षांशी चर्चा करतील. सभापतींची बिनविरोध निवड होण्याची शक्यता आहे.
लोकसभा अध्यक्षपदासाठी आज दुपारी 12 वाजेपर्यंत अर्ज भरला जाणार आहे. लोकसभा अध्यक्षपदाची निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी भाजपचे प्रयत्न सुरु आहेत. तर लोकसभेचं उपाध्यक्ष विरोधी पक्षाला मिळावं, अशी INDIA आघाडीची मागणी आहे. दरम्यान, लोकसभा अध्यक्षपदासाठी ओम बिर्ला, डी पुरंदेश्वरी यांची नावं चर्चेत आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे, जर भाजपनं उपाध्यक्षपद दिलं नाही तर अध्यक्षपदासाठी INDIA आघाडी उमेदवार उतरवण्याची शक्यता असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे.