Faisal Patel : माझ्यासमोरील सर्व पर्याय खुले; अहमद पटेलांच्या मुलाचे काँग्रेस सोडण्याचे संकेत
Congress : हायकमांडकडून कोणतेही प्रोत्साहन मिळत नसल्याने आपल्यासमोरील सर्व पर्याय खुले असल्याचं फैजल पटेल यांनी सांगितलं आहे.
अहमदाबाद: पाच राज्यामध्ये मोठ्या पराभवाला सामोरं जावं लागल्यानंतर आता काँग्रेसला गुजरातमध्येही मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. काँग्रेसचे दिवंगत नेते अहमद पटेल यांचा मुलगा फैजल पटेल आता काँग्रेसला रामराम ठोकण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. वाट पाहून थकलोय, हायकमांडकडून कोणतीही प्रतिक्रिया आली नाही, त्यामुळे आता सर्व पर्याय खुले असल्याचं फैजल पटेल यांनी सांगितलंय.
फैजल पटेल हे अहमद पटेल यांचे चिरंजीव आहेत. त्यांनी एक ट्वीट केलं असून त्यामध्ये म्हटलंय की, "वाट पाहून थकलोय, हायकमांडकडून कोणतेही प्रोत्साहन नाही, त्यामुळे आता सर्व पर्याय खुले आहेत."
Tired of waiting around. No encouragement from the top brass. Keeping my options open
— Faisal Patel (@mfaisalpatel) April 5, 2022
या वर्षाच्या अखेरीस गुजरातमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. गेल्या निवडणुकीमध्ये अहमद पटेल यांनी गुजरात काँग्रेसची रणनीती ठरवली होती. त्यावेळी काँग्रेसने भाजपला चांगलंच जेरीस आणलं होतं. आता जर फैजल पटेल यांनी काँग्रेस सोडली तर पक्षासाठी हा मोठा धक्का असेल अशी चर्चा आहे.
नुकतंच आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी गुजरातचा दौरा केला आहे. त्यानंतर फैजल पटेल यांचे ट्वीट आल्याने त्याची चांगलीच चर्चा केली होतेय. फैजल पटेल हे आता आम आदमी पक्षामध्ये प्रवेश करणार का अशी चर्चाही केली जातेय. काही महिन्यांपूर्वी त्यांनी अरविंद केजरीवाल यांचीही भेट घेतली होती.
दरम्यान, राजकारणात येण्याविषयी आपण आताच काही सांगणार नाही, पण भरुच आणि नर्मदा जिल्ह्याचा दौरा आपण करत आहोत असं काही दिवसांपूर्वीच फैजल पटेल यांनी सांगितलं होतं.
महत्त्वाच्या बातम्या: