केरळमध्ये पुन्हा कोरोनाचा उद्रेक! दोन दिवसांचा लॉकडाऊन जाहीर, केंद्रीय टीम दौरा करणार
Kerala Covid 19 Cases: केरळमध्ये कोरोना संसर्ग वाढत असल्यामुळे केंद्र सरकार एनसीडीसी संचालकांच्या अध्यक्षतेखाली सहा सदस्यीय टीम पाठवत असल्याचे केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मंडावीया यांनी सांगितले.

Kerala Lockdown: केरळमधील कोरोनाच्या नवीन रुग्णांमध्ये होणारी प्रचंड वाढ लक्षात घेता राज्य सरकारने 31 जुलै ते 1 ऑगस्टला संपूर्ण लॉकडाऊन लादण्याचा निर्णय घेतला आहे. केरळमध्ये बुधवारी कोरोनाच्या 22,056 नवीन रुग्णांची नोंद झाली तर 131 रुग्णांचा मृत्यू झाला. सध्या राज्यात 1,49,534 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 31,60,804 रुग्ण संसर्गातून बरे झाले आहे तर 16,457 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
केरळमध्ये कोरोना संसर्ग पुन्हा वाढत असल्याने केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सहा सदस्यांची टीम राज्यात पाठविण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मंडावीया यांनी ट्वीट केले की, “केंद्र सरकार एनसीडीसी संचालकांच्या अध्यक्षतेखाली सहा सदस्यीय टीम केरळला पाठवित आहे. केरळमधील कोविड प्रकरणांची संख्या अजूनही जास्त असल्याने ही टीम कोविड व्यवस्थापनात राज्याला मदत करणार आहे.
मंत्रालयाच्या निवेदनात म्हटले आहे, की हे पथक राज्याच्या आरोग्य अधिकाऱ्यांसोबत काम करणार आहे, कोरोना परिस्थितीचा आढावा घेईल आणि व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी आवश्यक सूचना करेल.
राज्यात कोरोना संसर्गाची सरासरी दैनंदिन प्रकरणे 17,443 पेक्षा जास्त आहेत. राज्यात संसर्ग दरही सर्वाधिक म्हणजे 12.93 टक्के आणि साप्ताहिक दर 11.97 टक्के आहे. सहा जिल्ह्यांमध्ये संक्रमणाचे आठवड्याचे प्रमाण 10 टक्क्यांपेक्षा जास्त आहे. केरळमध्ये शनिवारी कोरोनाच्या 17,466 नवीन प्रकरणांची नोंद झाली. सोमवारी 11,586 तर मंगळवारी 22,129 नवीन रुग्ण आढळले.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
