(Source: ECI/ABP News/ABP Majha)
केंद्र सरकारनं लॉन्च केलं 'पीएम दक्ष पोर्टल'; रोजगाराला प्रोत्साहन देण्यासाठी मिळणार कौशल्य प्रशिक्षण
PM-DAKSH portal-app : आता कोणीही 'पीएम-दक्ष' पोर्टलला भेट देऊन कौशल्य विकास प्रशिक्षणाशी संबंधित सर्व माहिती एकाच ठिकाणी मिळवू शकतं.
PM-DAKSH portal-app : केंद्रीय सामाजिक न्याय आणि हक्क मंत्री वीरेंद्र कुमार यांनी 7 ऑगस्ट रोजी 'पीएम-दक्ष पोर्टल आणि अॅप' लाँच केलं. मागासवर्गीय, अनुसूचित जाती आणि सफाई कर्मचाऱ्यांकरता कौशल्य विकास योजना सुलभ करण्यासाठी हे अॅप सुरु करण्यात आलं आहे. 'पंतप्रधान दक्ष आणि कुशल संपन्नता हितग्राही (पीएम-दक्ष) योजना' सामाजिक न्याय आणि हक्क मंत्रालयाकडून 2020-21 पासून लागू करण्यात येणार आहे. या योजनेतंर्गत योग्य लोकांना यासंदर्भातील सर्व प्रशिक्षण दिलं जाईल. म्हणजेच, या योजनेतंर्गत सरकार सरकारी ट्रेनिंग इंस्टीट्यूट देणार असून ज्याची स्थापना सरकारचं मंत्रालय किंवा इतर विश्वासार्ह संस्थांद्वारे करण्यात येईल.
आता कोणत्याही व्यक्तीला 'पीएम-दक्ष' पोर्टलवर जाऊन कौशल्य विकास प्रशिक्षण (Skill development training) यासंदर्भातील कोणतीही आवश्यक माहिती मिळवता येणार आहे. याव्यतिरिक्त केवळ एका क्लिकवरच, कोणीही आपल्या आजूबाजूला होणाऱ्या कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रमांबाबत माहिती मिळवू शकणार आहे. त्याचप्रमाणे या प्रशिक्षणासाठी अगदी सहज अर्जही करता येणार आहे.
काय आहे पीएम दक्ष योजना?
पंतप्रधान कार्यक्षमता आणि कौशल्य संपन्न हितग्राही (पीएम-दक्ष) योजना सामाजिक न्याय आणि हक्क मंत्रालयाच्या वतीनं 2020-21 पासून लागू करण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत पात्र लक्ष्य गटांना कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम, कौशल्य सुधारणा, अल्पकालीन प्रशिक्षण कार्यक्रम, दीर्घकालीन प्रशिक्षण कार्यक्रम आणि उद्योजकता विकास कार्यक्रम (ईडीपी) प्रदान केले जाणार आहेत. यासाठीच पीएम-दक्ष पोर्टल आणि अॅप फायदेशीर ठरणार आहे.
काय आहे योजनेची वैशिष्ट्ये?
वीरेंद्र कुमार यांनी बोलताना सांगितलं की, काही प्रमुख वैशिष्ट्यांमध्ये अनुसूचित जाती, मागासवर्गीय आणि सफाई कर्मचार्यांसाठी कौशल्य विकासाशी संबंधित सर्व माहितीची उपलब्धता समाविष्ट आहे. तसेच, प्रशिक्षण संस्थेत नोंदणीची सुविधा आणि एखाद्याच्या आवडीच्या कार्यक्रमानुसार रजिस्ट्रेशनच्या सुविधेचा समावेश आहे. वैयक्तिक माहितीशी संबंधित इच्छित कागदपत्रं अपलोड करण्याची सुविधा, प्रशिक्षण कालावधी दरम्यान चेहरा आणि डोळा स्कॅनिंगद्वारे आपली उपस्थिती नोंदवण्याची सुविधा आणि प्रशिक्षणादरम्यान फोटो आणि व्हिडीओ क्लिपद्वारे देखरेख इत्यादी सुविधांचा समावेश आहे.