Black Box : विमान, हेलिकॉप्टर दुर्घटनेत महत्त्वाचा असतो 'ब्लॅक बॉक्स'; नेमकं काय करतो काम?
Black Box : सीडीएस बिपीन रावत यांना घेऊन जाणाऱ्या हेलिकॉप्टर दुर्घटनेमागची नेमकी कारणं काय असा प्रश्न संपूर्ण देशाला पडलाय. आता त्याचं उत्तर मिळण्याची शक्यता आहे.
Black Box : तामिळनाडूतील कन्नूरमध्ये हवाई दलाचं एक हेलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त (IAF Chopper Crash) झालं. ज्यामध्ये देशाचे पहिले सीडीएस जनरल बिपीन रावत (CDS Bipin Rawat) त्यांच्या पत्नी मधुलिका रावत यांच्यासह 13 जणांचा मृत्यू झाला आहे. हेलिकॉप्टरमध्ये एकूण 14 जण होते. त्यापैकी केवळ एकजण बचावले आहेत. ग्रुप कॅप्टन वरुण सिंह हे बचावले आहेत. ते गंभीर जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. दरम्यान, लष्कराच्या बड्या अधिकाऱ्यांना घेऊन हवाई दलाचं IAF Mi-17V5 हेलिकॉप्टर कर्नाटक-तामिळनाडू सीमेवरील कुन्नूरकडे जात होतं. यामध्ये सीडीएस बिपीन रावत, त्यांची पत्नी, त्यांचा स्टाफसह भारतीय सैन्यदलातील बडे अधिकारी होते. जवळपास 14 जण या हेलिकॉप्टरमधून प्रवास करत होते. मात्र दुपारी साडेबाराच्या सुमारास खराब हवामानामुळे हेलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त झालं.
सीडीएस बिपीन रावत यांना घेऊन जाणाऱ्या हेलिकॉप्टर दुर्घटनेमागची नेमकी कारणं काय असा प्रश्न संपूर्ण देशाला पडलाय. आणि या प्रश्नाचं उत्तर मिळण्याची शक्यता वाढली आहे. कारण कुन्नूरमध्ये ज्या टेकडीवर हेलिकॉप्टर कोसळलं होतं, त्या ठिकाणी ब्लॅक बॉक्स सापडला आहे. दुर्घटनेसंदर्भातील तांत्रिक माहिती या ब्लॅक बॉक्समुळं समजू शकते.
प्रत्येक विमान किंवा हेलिकॉप्टर अपघातानंतर ब्लॅक बॉक्सची चर्चा होतेच. पण हा ब्लॅक बॉक्स म्हणजे काय? तो नेमका कसा असतो? त्याचं महत्त्व काय? या सर्व प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊया.
पाहा व्हिडीओ : वायूदलाच्या हेलिकॉप्टरचा व्हिडीओ कुन्नूरच्या पर्यटकांकडून जारी
ब्लॅक बॉक्स म्हणजे काय?
- एखाद्या विमान किंवा हेलिकॉप्टर अपघाताच्या कारणांचा शोध लावण्यासाठी दोन उपकरणं अतिशय महत्त्वाची असतात. एक म्हणजे हेलिकॉप्टरचं फ्लाईट डेटा रेकॉर्डर (एफडीआर) आणि कॉरपिट व्हॉईस रेकॉर्ड (सीव्हीआर), यालाच ब्लॅक बॉक्स म्हणतात.
- एका उपकरणामध्ये कॉकपिटमधील संभाषण रेकॉर्ड होतं, तर दुसऱ्या उपकरणात हेलिकॉप्टरशी संबंधित आकडे, उदाहरणार्थ वेग आणि उंचीचं मोजमाप होतं.
- नावानुसार याचा रंगही काळा असेल, असं वाटत असेल तर ते चुकीचं आहे. कारण ब्लॅक बॉक्सचा रंग नारिंगी असतो. या ब्लॅक बॉक्सवर आग किंवा पाण्याचा कोणताही परिणाम होत नाही. ब्लॅक बॉक्सची बॅटरी 30 दिवस टिकते. त्याच्या डेटाचा वापर अनेक वर्षांनंतरही करता येतो.
- ब्लॅक बॉक्स हा विमानाच्या मागील भागात बसवलेला असतो, कारण दुर्घटनेच्या परिस्थितीत हा भाग सर्वात सुरक्षित समजला जातो. ब्लॅक बॉक्स अनेक चाचण्यांमधून जातो. उदाहरणार्थ, ब्लॅक बॉक्स रेकॉर्डर 'एल-3 एफए 2100' 1110 अंश सेल्सिअस आगीत अनेक तास आणि 260 डिग्री सेल्सिअस तापमानात 10 तास राहू शकतो. इतकंच नाही तर मायनस 55 पासून प्लस 70 अंश सेल्सिअस तापमानातही ब्लॅक बॉक्स काम करतो.
- दुर्घटनेनंतर ब्लॅक बॉक्स मिळाल्यानंतर तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवला जातो. यात रेकॉर्ड झालेल्या डेटाद्वारे विमान दुर्घटनेच्या कारणांचा पत्ता लागतो.
ब्लॅक बॉक्स लावणारा ऑस्ट्रेलिया पहिला देश
विमानात ब्लॅक बॉक्स लावणं अनिवार्य करणारा ऑस्ट्रेलिया हा पहिला देश होता. 1960 मध्ये ऑस्ट्रेलियाने पहिल्यांदा विमानात ब्लॅक बॉक्स लावला होता. भारतात नागरी उड्डाण संचलनालयाने 1 जानेवारी, 2005 पासून सर्व विमान आणि हेलिकॉप्टरमध्ये सीव्हीआर आणि एफडीआर लावणं अनिवार्य केलं.
ब्लॅक बॉक्सचा शोध कोणी लावला?
ऑस्ट्रेलियाचे शास्त्रज्ञ डेव्हिड वॉरेन यांनी 1950 च्या दशकात ब्लॅक बॉक्सचा शोध लावला होता. मेलबर्नच्या वैमानिक संशोधन प्रयोगशाळेत काम करत होते. त्यावेळी कमर्शिअल एअरक्राफ्ट 'कॉमेट'चा अपघात झाला होता. या अपघाताचा तपास करणाऱ्या पथकात त्यांचा समोवश होता. विमान दुर्घटना होण्याआधीच्या घडामोडी रेकॉर्ड करता येईल का? असा विचार करुन त्यांनी फ्लाईट डेटा रेकॉर्डरवर काम करायला सुरुवात केली आणि त्यानंतर ब्लॅक बॉक्सचा शोध लागला. क्वीन्सलॅन्डमध्ये झालेल्या विमान अपघातानंतर ऑस्ट्रेलिया जगातील पहिला असा देश होता, ज्यानं कमर्शिअल विमानात ब्लॅक बॉक्स लावणं अनिवार्य केलं होतं.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- Bipin Rawat Death : सीडीएस जनरल बिपीन रावत यांच्या निधनानं शोक; कोण असतील देशाचे पुढचे सीडीएस?
- Bipin Rawat Helicopter Crash : 2015 मध्ये हेलिकॉप्टर क्रॅशमधून सुखरुप बचावले होते बिपिन रावत; काय होती ती दुर्घटना?
- CDS Bipin Rawat Death : सीडीएस जनरल बिपीन रावत यांच्यावर उद्या अंत्यसंस्कार, आज दिल्लीत दाखल होणार पार्थिव
- Bipin Rawat Helicopter Crash : बिपीन रावत यांनी केले होते सर्जिकल स्ट्राईक आणि म्यानमार ऑपरेशनचे नेतृत्व
- Madhulika Rawat : आयुष्यभर खंबीर पाठिंबा, शेवटच्या क्षणापर्यंत साथ, हेलिकॉप्टर दुर्घटनेत मधुलिका रावत यांचंही निधन!
देश-विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहा एबीपी माझा युट्यूब लाईव्ह