एक्स्प्लोर
सीबीआयमधील अंतर्गत वादाचं मूळ असलेला मोईन कुरेशी कोण आहे?
सीबीआयच्या दोन्ही संचालकांना सुट्टीवर पाठवलं आहे. या प्रकरणाचं मूळ आहे ते म्हणजे मोईन कुरेशी प्रकरण. मोईन कुरेशी प्रकरण मोदींनी 2014 च्या लोकसभा निवडणुकीत प्रचाराचा मुद्दा बनवला होता. याच मोईन कुरेशीचा आताही संबंध आला आहे.
नवी दिल्ली : देशातील सर्वात मोठी तपास यंत्रणा सीबीआयच्या अंतर्गत वादाच्या दरम्यानच मोठी घडामोड घडली आहे. सीबीआयचे विशेष संचालक राकेश अस्थाना यांच्यावरील भ्रष्टाचाराच्या आरोपानंतर अस्थाना यांच्यासह सीबीआयचे संचालक आलोक वर्मा यांनाही सुट्टीवर पाठवण्यात आलं आहे. एम. नागेश्वर राव यांची तातडीने प्रभारी संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
सीबीआयमध्ये सध्या जो वाद सुरु आहे, त्याला क्रमांक एक आणि क्रमांक दोनच्या पदाचा वाद असल्याचं बोललं जातं. पण या प्रकरणाचं मूळ आहे, ते म्हणजे मांस व्यापारी मोईन कुरेशी प्रकरण. मोईन कुरेशी हा देशातला सर्वात मोठा मांस निर्यातक आहे, जो भारतातून जगातल्या अनेक देशांमध्ये मांस पाठवण्याचा व्यवसाय करतो.
प्रसिद्ध डून स्कूल आणि सेंट स्टीफेन्स स्कूलमध्ये शिक्षण झालेल्या उत्तर प्रदेशातील रामपूरचा रहिवासी मोईन कुरेशी दिल्लीत स्थायिक होता. 2014 मध्ये आयकर विभागाने मोईन कुरेशीच्या छतरपूर, रामपूर आणि इतर ठिकाणी मालमत्तेवर छापेमारी केल्यानंतर त्याचं नाव जगासमोर आलं.
या छापेमारीत कोट्यवधी रुपयांच्या रोकडीसह मांस निर्यात आणि कथित हवाला रॅकेटसंबंधित टेप सापडल्याचंही बोललं जातं.
मोईन कुरेशी आणि यूपीए 2 सरकार
मोईन कुरेशी प्रकरण समोर आलं तेव्हा 2014 ची लोकसभा निवडणूक तोंडावर होती. नरेंद्र मोदी यांनीही यूपीए 2 सरकारवर या प्रकरणावरुन हल्लाबोल सुरुच ठेवला होता. बीबीसीच्या वृत्तानुसार, एका प्रचारसभेत मोदींनी ‘10 जनपथच्या एका जवळच्या नेत्याचा’ (10 जनपथ मार्ग म्हणजे सोनिया गांधी यांचं निवासस्थान) या मांस निर्यात करणाऱ्या कंपनी आणि हवाला रॅकेटशी संबंध जोडला होता.
बीबीसी हिंदीच्या वृत्तानुसार, अगोदरच चुकीची धोरणं आणि भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे अडचणीत असलेल्या यूपीए 2 सरकारला परदेशातील एका गुप्तचर यंत्रणेने दुबईतून परदेशी बँकेत कोट्यवधी रुपयांच्या मनी ट्रान्सफरची सूचना दिली होती, शिवाय पैसे पाठवणारा भारतीय असेल, असंही म्हटलं होतं.
अकबरपूरमधील सभेत मोदी म्हणाले होते, की टीव्ही चॅनलने म्हटलंय, केंद्र सरकारमधील (यूपीए 2) चार मंत्र्यांचा या मांस निर्यात करणाऱ्या कंपनीसोबत आणि या हवाला कांडच्या उद्योगतही सहभाग आहे....
बीबीसी हिंदीच्या वृत्तानुसार, मोदींच्या त्या भाषणात एका गोष्टीचा उल्लेख नव्हता, ती म्हणजे छापेमारीपूर्वी एक गोष्ट समोर आली होती, की सीबीआयमधील मोठे अधिकारी आणि कार्पोरेट जगतातील अनेक जण मोईन कुरेशीच्या संपर्कात आहेत.
कोण आहे मोईन कुरेशी?
मोईन कुरेशीने 90 च्या दशकात रामपूरमधून एका कत्तलखान्याच्या माध्यमातून व्यवसाय सुरु केला. काही वर्षातच त्याने मोठे राजकीय नेते आणि अधिकाऱ्यांमध्ये आपली ओळख निर्माण केली आणि त्यानंतर देवाणघेवाण आणि फिक्सिंगचा व्यवसाय सुरु झाल्याचं बोललं जातं.
पुढच्या काही वर्षात मोईन कुरेशी सर्वात मोठा मांस व्यापारी बनला. त्याने 25 वेगवेगळ्या कंपन्या सुरु केल्या ज्यामध्ये एक बांधकाम कंपनी आणि फॅशन कंपनीचाही समावेश आहे.
कुरेशीविरोधात सुरु असलेल्या प्रकरणांची सध्या अंमलबजावणी संचालनालय म्हणजेच ईडीकडून चौकशी सुरु आहे.
पीटीआयच्या वृत्तानुसार, ईडीने दाखल केलेल्या एफआयआरमध्ये सीबीआयचे माजी संचालक ए. पी. सिंह यांचंही नाव होतं. ईडीला आयकर विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, कुरेशीने विविध लोकांकडून त्यांची कामं करुन देण्याच्या नावावर मोठा पैसा उकळला आहे.
मोईन कुरेशीविरोधात विदेशात 200 कोटी रुपये लपवल्याचीही चौकशी सुरु आहे. तो देशातील मोठी करचोरी करणाऱ्यांपैकी एक मानला जातो.
मुलीच्या लग्नातील उधळपट्टीमुळे चर्चेत
मोईन कुरेशी हा 2014 साली चर्चेत आला असं नाही. काही वर्षांपूर्वी त्याच्या मुलीच्या लग्नात निमंत्रित केलेला पाकिस्तानी गायक राहत फतेह अली खानला रिव्हेन्यू इंटिलिजेन्सने परत जाताना रोखलं होतं. त्याच वेळी मोईन कुरेशी चर्चेत आला होता.
टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, मोईन कुरेशीची मुलगी परनिया कुरेशी आणि अमेरिकन बँकर अर्जुन प्रसाद यांच्या लग्नात कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी करण्यात आली होती. एका कपड्याची किंमत ही 80 लाख रुपये होती, असं बोललं जातं.
या वृत्तानुसार नाईट क्लबच्या लाँचिंगवेळी प्रियांका गांधींचे पती रॉबर्ट वाड्रा आणि अर्जुन प्रसाद यांच्यात तणाव निर्माण झाला होता आणि नंतर हे लग्न मोडलं होतं.
परनिया कुरेशीने सोनम कपूरचा सिनेमा आयशासाठी कॉश्चूमही तयार केला होता आणि मुजफ्फर अलीचा सिनेमा ‘जानिसार’मध्ये महत्त्वाची भूमिकाही निभावली होती.
सीबीआयमधील सध्याचा वाद काय आहे?
हैदराबादमधील उद्योगपती सतीश बाबू सना यांच्या तक्रारीवरुन सीबीआयने आपल्या संस्थेतील दुसऱ्या क्रमांकाच्या अधिकाऱ्यावर लाच घेतल्याचा ठपका ठेवला आहे. अस्थाना यांना गेल्या वर्षी जवळपास तीन कोटी रुपये दिल्याचा दावा एफआयआरमध्ये करण्यात आला आहे. सना यांचा हा दावा सीआरपीसी कलम 164 नुसार न्यायदंडाधिकाऱ्यासमोर नोंदवण्यात आला, जो कोर्टालाही मान्य असेल.
मोईन कुरेशीकडून 50 लाख रुपये घेतल्याप्रकरणी सना हे देखील चौकशीच्या घेऱ्यात होते. या प्रकरणाच्या एसआयटीचं नेतृत्त्व अस्थाना यांच्याकडे होतं. सीबीआयचे विशेष संचालक आणि 1984 च्या बॅचचे गुजरात केडरचे भारतीय पोलीस सेवेतील अधिकारी अस्थाना मांस व्यापारी कुरेशीविरोधात सुरु असलेल्या प्रकरणाचा तपास करत आहेत. कुरेशीवर मनी लाँड्रिंग आणि भ्रष्टाचारासह अनेक आरोप आहेत.
अस्थाना यांचं स्पष्टीकरण
अस्थाना यांनी सीव्हीसी म्हणजेच केंद्रीय सतर्कता आयोगाला पत्र लिहून आपली बाजू मांडली आहे. सीबीआयच्या संचालकांनी अजय बस्सी नावाच्या एका अशा अधिकाऱ्याची लाचलुचपत प्रतिबंधक विभागात नियुक्ती केलीय, ज्याला नियम तोडण्यासाठी ओळखळं जातं. आपल्याला फसवण्यासाठी हा आरोप करण्यात आलाय, असं पत्रात त्यांनी म्हटलं आहे.
अस्थाना यांच्याकडे अनेक हायप्रोफाईल प्रकरणांची चौकशी आहे. ज्यामध्ये ऑगस्टा वेस्टलँड चॉपर घोटाळा आणि उद्योगपती विजय मल्ल्या कर्ज प्रकरणाचाही समावेश आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement