Mayawati : उत्तर प्रदेश निवडणुकीत RSS च्या 'या' प्रचारामुळे बसपाला फटका; मायावतींचा आरोप
Mayawati : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने केलेल्या प्रचारामुळे बसपाला फटका बसला असल्याचा आरोप बसप प्रमुख मायावती यांनी केला.
Mayawati : नुकत्याच झालेल्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत बहुजन समाज पक्षाला (बसप) मोठा धक्का बसला. निवडणुकीतील अपयशाबाबत मायावती यांनी मोठा दावा केला. राज्यात बसपाचे सरकार स्थापन न झाल्यास बहेनजी (मायावती) यांना राष्ट्रपती निवडून आणण्यासाठी भाजप प्रयत्न करणार असल्याचा प्रचार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने केला. त्यामुळे बसपाच्या पारंपरीक मतदाराने भाजपला मतदान केले असल्याचा आरोप मायावतींनी केला.
उत्तर प्रदेशमधील निवडणुकीनंतर बसपाची बैठक झाली. या बैठकीत पक्षाने आपल्या पराभवाची कारणीमीमांसा केली. मायावती यांनी म्हटले की, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रचारामुळे बसपला फटका बसला. बसपाचे सरकार न आल्यास भाजप मायावतींना राष्ट्रपती पदी निवडून आणेल. त्यामुळे भाजपला मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले. याचा फटका बसला असल्याचे त्यांनी सांगितले.
27-03-2022-BSP PRESS NOTE-PARTY MEETING pic.twitter.com/lv7rDmbhDk
— Mayawati (@Mayawati) March 27, 2022
मायावती यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार, देशाची राष्ट्रपती होणे दूर, मी त्या पदाचा विचारही करू शकत नाही. याआधी बसपाचे संस्थापक काशीराम यांनादेखील राष्ट्रपतीपदासाठी विचारणा झाली होती. मात्र, त्यांनी हा प्रस्ताव फेटाळून लावला. मी काशीराम यांच्या मार्गावरून चालणारी त्यांची शिष्या असल्याचे मायावतींनी सांगितले.
उत्तर प्रदेशची सत्ता एकहाती खेचणाऱ्या बसपाच्या कामगिरीकडे अनेकांचे लक्ष लागले होते. मागील लोकसभा निवडणुकीत बसपाला मागील मोठ्या अपयशाला सामोरे जावे लागले होते. पक्षाच्या भवितव्याच्या दृष्टीने बसपासाठी ही निवडणूक अतिशय महत्वाची होती. मात्र, बसपाची कामगिरी अतिशय सुमार राहिली. उत्तर प्रदेशच्या निवडणुकीच्या रिंगणातून बसपा मुख्य पटलावरून अदृष्य राहिले असल्याचे दिसून आले. बसपा प्रमुख मायावती यादेखील प्रचारात फारशा सक्रिय राहिल्या नाहीत. त्यामुळे बसपाने ही निवडणूक फारशी गांभीर्याने घेतली नसल्याची चर्चा होती.
दरम्यान, पाच राज्यातील विधानसभा निवडणुकानंतर आता राष्ट्रपती पदासाठीच्या निवडणुकीची चर्चा सुरू झाली आहे. पाच राज्यातील निवडणुकांच्या निकालानंतर आता राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीची समीकरणे काही प्रमाणात बदलणार आहेत. भाजपला आपला उमेदवार निवडून आणण्यासाठी इतर पक्षांची मदत घ्यावी लागू शकते.
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha