(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Pakistani Drone: भारत सीमेवर पुन्हा पाकिस्तानी ड्रोनचा शिरकाव, बीएसएफने हाणून पाडला
Pakistani Drone: पंजाबच्या फिरोजपूरमध्ये सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) जवानांनी आंतरराष्ट्रीय सीमेजवळ आकाशात घिरट्या घालणाऱ्या पाक ड्रोनवर सुमारे 100 गोळ्या झाडल्या. यानंतर ड्रोन आकाशातून थेट जमिनीवर पडला.
Pakistani Drone: पंजाबच्या फिरोजपूरमध्ये सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) जवानांनी आंतरराष्ट्रीय सीमेजवळ आकाशात घिरट्या घालणाऱ्या पाकिस्तानी ड्रोनवर (pakistani drone) गोळ्या झाडल्या. यानंतर ड्रोन आकाशातून थेट जमिनीवर पडला. ड्रोनसोबत कोणतेही साहित्य सापडलेले नाही. ड्रोन हेरॉईन किंवा शस्त्रास्त्रे सोडून परत येत असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. बुधवारी सकाळी बीएसएफ आणि पोलिसांनी संयुक्त शोध मोहीम सुरू केलं होत. गोळ्या झाडून पाडलेला ड्रोन बीएसएफ आणि पंजाब पोलिसांनी जप्त केला आहे.
बीएसएफ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, बटालियन-136 चे जवान सीमेवर कुंपणाजवळ गस्त घालत होते. त्यांना आकाशात ड्रोनचा आवाज ऐकू आला. या ड्रोनवर सुमारे 100 गोळ्यांशिवाय हॅन्ड ग्रेनेडनेही हल्ला करण्यात आला. उंची कमी असल्याने गोळी लागल्याने ड्रोन जमिनीवर पडला. माहिती मिळताच बीएसएफचे कार्यकारी डीआयजी अशोक कुमार, कमांडंट डॉ एसके सोनकर, एसएसपी सुरेंद्र लांबा, कमांडंट अमरजित सिंग आणि डेप्युटी कमांडंट गुरप्रीत सिंग घटनास्थळी पोहोचले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हे ड्रोन हेक्सा कॉप्टर आहे. असे ड्रोन खूप उंच उडू शकतात आणि जवळपास 100 किलो वजन वाहून नेऊ शकतात. तत्पूर्वी 3 नोव्हेंबरलाही बीएसएफच्या जगदीशच्या चौकीजवळ ड्रोन दिसला होता. बीएसएफच्या गोळीबारानंतर ड्रोन पाकिस्तानात परतले.
Punjab | Alert troops heard the sound of a drone at around 10.30 pm last night near intl border in Ferozepur dist. We fired towards drone &search operation was initiated. Drone was recovered in the morning. Further searches underway in the area: Ashok Kumar, DIG, BSF Ferozepur pic.twitter.com/cxePI3uDYH
— ANI (@ANI) November 9, 2022
दरम्यान, गुरुदासपूरमधील बीएसएफच्या 58 बटालियनच्या बीओपी चौतारा येथे तैनात असलेल्या जवानांनी पाकिस्तानी फुगे उडवून ते खाली पाडले. माहिती मिळताच बीएसएफचे डीआयजी प्रभाकर जोशी घटनास्थळी पोहोचले. यानंतर जवानांनी परिसरात शोधमोहीम सुरू केली. डीआयजी प्रभाकर जोशी यांनी सांगितले की, काल रात्री पोस्टावर तैनात बीएसएफ जवान योगेश यांना पाकिस्तानकडून एक वस्तू येताना दिसली. यानंतर जवान कृतीत उतरले आणि हॅन्ड ग्रेनेड फेकले. यानंतर जवान रामचंद्र यांनी गोळीबार करून उडणारी वस्तू जमिनीवर पडली. तपासात तो पाकिस्तानी फुगा असल्याचे निष्पन्न झाले.