Brij Bhushan Sharan Singh: 'महिला कुस्तीपटूंवर अत्याचार करण्याची एकही संधी सोडली नाही', बृजभूषण सिंह यांच्याविरोधात दिल्ली पोलिसांचा कोर्टात दावा
Brij Bhushan Sharan Singh: दिल्ली पोलिसांनी भाजप खासदार ब्रिजभूषण यांच्या बाबतीत ताजिकिस्तानमधील आशियाई चॅम्पियनशिप दरम्यानच्या काही घटनांचा हवाला कोर्टात दिला.
नवी दिल्ली : भारतीय कुस्ती महासंघाचे (WFI) माजी अध्यक्ष आणि भाजपचे खासदार बृजभूषण शरण सिंह (Brij Bhushan Sharan Singh) यांना लैंगिक शोषणाच्या आरोपाखाली न्यायालयामध्ये हजर राहण्यासाठी एक दिवसाची सूट दिली आहे. तर यावेळी दिल्ली पोलिसांनी न्यायालयामध्ये म्हटलं की, 'बृजभूषण सिंह यांनी महिला कुस्तीपटूंचे शोषण करण्याची एकही संधी सोडली नाही.' तर त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी पुरसे पुरावे असल्याचा युक्तिवाद देखील यावेळी पोलिसांनी राऊस अव्हेन्यू न्यायालयाच्या अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकारी (ACMM) हरजीत सिंग जसपाल यांच्यासमोर केला.
दिल्ली पोलिसांनी कोर्टात काय म्हटलं?
दिल्ली पोलिसांनी भाजप खासदार बृजभूषण शरण सिंह यांच्याविरुद्ध ताजिकिस्तानमधील काही घटनांचा हवाला कोर्टात दिला. तसेच या घटना त्यांच्या कृती प्रतिबिंबित करतात असा दावा देखील कोर्टात केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ताजिकिस्तानमध्ये एका कार्यक्रमादरम्यान बृजभूषण सिंह यांनी एक महिला कुस्तीपटूला जबरदस्तीने मिठी मारली आणि त्यानंतर ही मिठी वडिलांप्रमाणे असं सांगत त्यांच्या कृत्याचे समर्थन केले.
ताजिकिस्तानमधील आशियाई चॅम्पियनशिप दरम्यान बृजभूषण सिंह यांनी परवानगीशिवाय महिला कुस्तीपटूचा शर्ट उचलला आणि तिच्या पोटाला अनुचित रित्या स्पर्श केल्याचा आरोप करण्यात आला आहे. तर या घटना भारताबाहेर जरी घडल्या असल्या तरी त्यांच्या या प्रकरणाशी संबंध असल्याचा युक्तिवाद दिल्ली पोलिसांनी यावेळी केला आहे.
पुढील सुनावणी 7 ऑक्टोबर रोजी
पीडित महिलांनी या घटनांवर प्रतिक्रिया दिली की नाही हा मुद्दाच नाही, तर त्यांच्यावर अन्याय झाला आहे हा महत्त्वाचा मुद्दा आहे, असं दिल्ली पोलिसांनी म्हटलं आहे. दरम्यान या प्रकरणाची सविस्तर सुनावणी ही ७ ऑक्टोबर रोजी घेण्यात येईल. मागील सुनावणी दरम्यान दिल्ली पोलिसांनी न्यायालयामध्ये म्हटलं होतं की, बृजभूषण सिंह यांच्यावर करण्यात आलेल्या आरोपांमधून सरकारने स्थापन केलेल्या चौकशी समितीने देखील त्यांना दोषमुक्त केले नाही. तर यावेळी दिल्ली पोलिसांनी डब्ल्यूएफआयच्या कार्यालयामधील एका घटनेचा देखील उल्लेख केला आहे. तसेच त्यांच्यावरील कारवाईसाठी दिल्ली हे योग्य अधिकारक्षेत्र असल्यांच यावेळी पोलिसांनी म्हटलं आहे.
बृजभूषण सिंह यांच्यावर काही महिला कुस्तीपटूंनी लैंगिक शोषण केल्याचे आरोप केले आहेत. त्याचपार्श्वभूमीवर दिल्लीतील जंतर- मंतर येथे आंदोलन देखील केले होते. तर त्यांच्या आरोपांवर योग्य ती कारवाई नक्की करण्यात येईल असं आश्वासन सरकारकडून कुस्तीपटूंना देण्यात आलं होतं. पण अद्यापही बृजभूषण सिंह यांच्याविरोधातील चौकशी सुरु आहे. त्यामुळे या प्रकरणात ते दोषी ठरणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.