Blast In Mohali : मोहालीत इंटेलिजंस ऑफिसबाहेर रॉकेट हल्ला; संपूर्ण परिसरात हाय अलर्ट, तपास सुरु
Blast In Mohali : पंजाबमधील मोहालीत पोलिसांच्या इंटेलिजन्स युनिटच्या मुख्यालयावर झालेल्या रॉकेट हल्ल्यात दहशतवादी कट असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
![Blast In Mohali : मोहालीत इंटेलिजंस ऑफिसबाहेर रॉकेट हल्ला; संपूर्ण परिसरात हाय अलर्ट, तपास सुरु Blast In Mohali attack on intelligence office building in mohali is possibility of terrorist conspiracy Marathi News Blast In Mohali : मोहालीत इंटेलिजंस ऑफिसबाहेर रॉकेट हल्ला; संपूर्ण परिसरात हाय अलर्ट, तपास सुरु](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/05/10/807b9f71070acdac4f91d5da0917d2ed_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Blast In Mohali : पंजाबमधील मोहालीत पंजाब पोलिसांच्या इंटेलिजन्स युनिटच्या मुख्यालयाच्या इमारतीवर रॉकेट हल्ला झाला. सोमवारी संध्याकाळी उशिरा झालेल्या रॉकेट हल्ल्यानं संपूर्ण पंजाब हादरलं. या रॉकेट हल्ल्याबाबत मुख्यमंत्री भगवंत मान यांनी डीजीपींकडून संपूर्ण प्रकरणाची माहिती घेतली आहे. त्याचबरोबर पंजाब पोलिसांनीही चौकशी सुरु केली आहे. अचानक झालेल्या रॉकेट हल्ल्यानंतर मोहालीत आणि आजूबाजूच्या परिसरात कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दरम्यान, हा रॉकेट हल्ला म्हणजे, दहशतवादी कट असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
सध्या मोहालीचे एसपी (मुख्यालय) रविंदर पाल सिंह यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिलेल्या माहितीनुसार, अचानक झालेल्या रॉकेट हल्ल्याची चौकशी सुरू आहे. दुसरीकडे, हा दहशतवादी हल्ला आहे असं म्हणता येईल का? असं विचारल्यावर ते म्हणाले की, या शक्यतेकडे दुर्लक्ष करता येणार नाही. आम्ही त्याची चौकशी करत आहोत. रविंदर यांच्या बोलण्यावरुन स्पष्ट झालं आहे की, हा रॉकेट हल्ला म्हणजे, दहशतवादी कट असण्याची शक्यता समोर ठेवूनच पोलीस तपास करत आहेत.
एसपी (मुख्यालय) रविंदर पाल सिंह यांनी सांगितलं की, मुख्यालयाबाहेर रॉकेट हल्ला झाला. त्याची तीव्रता जास्तच होती. पण या हल्ल्यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. तसेच, कोणतंही नुकसान झालेलं नाही. पंजाब पोलीस आणि एफएसएल टीमचे वरिष्ठ अधिकारी तपास करत असल्याचं त्यांनी सांगितलं.
दरम्यान, मोहाली येथील पंजाब पोलिसांच्या इंटेलिजन्स युनिटच्या मुख्यालयाच्या इमारतीवर रॉकेट प्रोपेल्ड ग्रेनेडनं (RPG) हल्ला करण्यात आला. यादरम्यान प्रचंड मोठा आवाज झाला आणि आजूबाजूचा परिसर हादरला. हल्ल्याची तीव्रता एवढी होती की, इमारतीच्या दुसऱ्या मजल्याच्या खिडक्यांच्या काचा फुटल्या. मोहाली पोलिसांनी (Mohali Police) जारी केलेल्या निवेदनानुसार, एसएएस नगरमधील पंजाब पोलीस इंटेलिजेंस मुख्यालयात संध्याकाळी 7:45 वाजता भीषण स्फोट झाला आणि या घटनेत अद्याप कोणतीही जीवितहानी किंवा मालमत्तेचे नुकसान झालेलं नाही.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)