Loksabha Election 2024 : म्हणून किरण सामंतांना लोकसभेसाठी वाव, पण निर्णय नारायण राणेंशी चर्चा करुनच घेतला जाईल, दीपक केसरकरांकडून चर्चांना पूर्णविराम?
Loksabha Election 2024 : रत्नागिरी सिंधुदुर्गच्या मतदारसंघावरुन महायुतीमध्ये संभ्रम असल्याच्या चर्चा सुरु होत्या. पण दीपक केसरकरांनी या चर्चांना आता पूर्णविराम दिल्याचं म्हटलं जात आहे.
सिंधुदुर्ग : केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांच्याशी चर्चा करुनच रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात (Ratnagiri Sindhudurg Lok Sabha Constituency) उमेदवाराचा निर्णय घेतला जाईल. पण निलेश राणे (Nilesh Rane) हे सध्या आमदारकीसाठी प्रयत्न करत असल्याने किरण सामंतांना (Kiran Samant) लोकसभेसाठी वाव असल्याचं दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी म्हटंल. मागील अनेक दिवसांपासून रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघात किरण सामंत यांच्या उमेदवारीच्या चर्चा आहेत. पण या मतदारसंघात उमेदवार हा भाजपचाच असेल अशी स्पष्टोक्ती देखील नारायण राणेंनी केली होती. त्यामुळे या मतदारसंघावरुन महायुतीत संभ्रम असल्याच्या चर्चा होत्या.
काही दिवसांपूर्वी उदय सामंतांच्या प्रतिक्रियेमुळे या जागेचाही तेढ महायुतीत निर्माण झाल्याची चिन्हं होती. मी मुख्यमंत्र्यांकडे किरण सामंत यांच्या जागेसाठी मागणी केलीये. त्यामुळे कार्यकर्त्यांनी तयारी लागा असं वक्तव्य उदय सामंतांनी केलं होतं. त्यानंतर शालेय मंत्री दीपक केसरकर यांनी देखील उदय सामंतांच्या या वक्तव्याला दुजोरा दिला होता. पण नारायण राणेंनी या जागेवर भाजपचाच उमेदवार निवडणूक लढवले असं वक्तव्य केलं. त्यामुळे महायुतीत संभ्रमाच्या चर्चांनी जोर धरला. पण दीपक केसरकर यांनी आता केलेल्या वक्तव्यामुळे या सर्व चर्चांना पूर्णविराम मिळाला असल्याचं म्हटलं जात आहे.
दीपक केसरकरांनी नेमकं काय म्हटलं?
केंद्रिय मंत्री नारायण राणे यांच्याशी चर्चा केल्याशिवाय कोणताही निर्णय या मतदासंघात होणार नसल्याची प्रतिक्रिया शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिली. भाजप सेना युती बाळासाहेब ठाकरेंनी केली होती आणि ती घट्ट युती आहे. निवडणुका जवळ आल्याने उमेदवार तयारी करत आहेत. सेच पूर्वीचे या मतदारंघातील उमेदवार म्हणजे निलेश राणे हे कुडाळ मालवण मतदारसंघात आमदारकीची तयारी करत असल्याने किरण सामंत यांना कुठेतरी वाव असल्याचं दीपक केसरकरांनी म्हटलं. या मतदारसंघात नेहमीच शिवसेनेचा उमेदवार विजयी झालेला आहे आणि ती परंपरा यापुढे कायम राहील. बाळासाहेबांनी निर्माण केलेल्या युतीत जशी दुधात साखर विरघळते तशी अजित पवारांची राष्ट्रवादी मिळाली, असं दीपक केसरकर यांनी म्हटलं.
काही दिवसांपूर्वी निलेश राणे यांनी राजकारणातून निवृत्त होण्याचा निर्णय फडणवीसांच्या सांगण्यावरुन मागे घेतला होता. त्यामुळे यंदाच्या लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपकडून निलेश राणे यांना उमेदवारी मिळण्याच्या शक्यता देखील नाकारता येत नाहीत. पण या सगळ्यावर महायुती म्हणून एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार काय निर्णय घेणार हे पाहणं गरजेचं असले.